रमाबाई, पंडिता : (२३ एप्रिल १८५८–५ एप्रिल १९२२). स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्ता, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. लक्ष्मीबाई ऊर्फ अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता-पिता. तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील मंगलोरजवळ माळहेरंजी येथे राहणाऱ्या ह्या चित्पावन ब्राह्मण दांपत्यापोटी माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत रमाबाईंचा जन्म झाला. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. लक्ष्मीबाईंस व रमाबाईंस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. तसेच रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले. रमाबाईंच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे सर्व मुलांना घेऊन तीर्थयात्रेला पायी निघावे लागले. या तीर्थयात्रेच्या १५-१६ वर्षांच्या कालखंडात रमाबाईंना आई-वडिलांपासून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले. १८७७ साली दुष्काळात रमाबाईंचे आई-वडील वारले. रमाबाईंनी संस्कृतमध्ये तर प्रावीण्य मिळविले होतेच पण मराठी, हिंदी, बंगाली आणि कन्नड भाषाही त्या अस्खलितपणे बोलू शकत होत्या. १८७८ साली त्यांचे बंधू श्रीनिवासशास्त्री यांच्यासह प्रवास करीत त्या कलकत्त्याला आल्या. तेथे मात्र त्यांच्या विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ ह्या बिरुदावली बहाल करण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ‘पंडिता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या रमाबाई ह्या आज एकमेव महिला होत. बंगाली स्त्रियांनीही त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले. कलकत्ता येथे त्यांचा केशवचंद्र सेन यांच्याशी संबंध आला आणि हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काहूर उठले. तत्पूर्वीही त्या हिंदू धर्माविषयी साशंक झाल्याच होत्या. रमाबाईंचा अशा रीतीने सर्वत्र सत्कार होत असतानाच त्यांच्या बंधूंचा मृत्यू झाला (१८८०). त्या आता एकाकी झाल्या. परंतु कलकत्त्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या शूद्र जातीतील पदवीधर व पुरोगामी विचारांच्या वकिलाने मागणी घातल्यानंतर त्यांच्याशी त्यांनी विवाह केला (१८८०). ह्या विवाहाने मोठे वादळ उठवले. वैवाहिक जीवन फार काळ त्यांना लाभू शकले नाही. कारण थोड्याच दिवसांत अल्पशा आजाराने बिपिन बिहारीदास मरण पावले.
त्यांचे पती ४ फेब्रुवारी १८८२ रोजी वारल्यानंतर त्या ३१ मे १८८२ रोजी आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हीस घेऊन पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बाल-विवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रूढी यांतून समाजास मुक्त्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा’ ची स्थापना केली. स्त्रीधर्मनीति (१८८२) हे पुस्तक त्यांनी याच साली लिहिले. १८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीति ह्या पुस्तकाच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वाँटिज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाच्या शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ सप्टेंबर १८८३ रोजी वाँटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
आनंदीबाई जोशी यांच्या ६ मार्च १८८६ रोजी होणाऱ्या पदवीदान समारंभास हजर राहता यावे म्हणून त्या फेब्रुवारी १८८६ मध्ये अमेरिकेस गेल्या. हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त्त होणारी ‘बालोद्यान शिक्षणपद्धती’ त्यांनी शिकून घेतली व त्यासंबंधी मराठी पुस्तके लिहिली. अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वूमन (१८८७-८८) हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. १८८९ साली यूनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले. हिंदुस्थानातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी अमेरिकनांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ व इतरही काही संस्था निर्माण केल्या.
अमेरिकेहून १ फेब्रुवारी १८८९ रोजी परत आल्यानंतर ११ मार्च रोजी मुंबईला विधवांकरता ‘शारदा सदन’ नावाची संस्था त्यांनी काढली. त्यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाकरिता स्त्रीप्रतिनिधित्वाचा पुरस्कार केला. केशवपनाविरुद्ध त्यांनी प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीस पाठिंबाही दिला. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणण्यात आले. ‘शारदा सदन’ मध्ये प्रत्येक मुलीला धर्माचे स्वतंत्र दिले होते. तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र केडगाव (जि. पुणे) येथे न्यावे लागले. २४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगावला ‘मुक्तिसदना’ चे उद्घाटन करण्यात आले. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यात ३०० हून अधिक उच्चवर्णीय स्त्रिया होत्या. तत्पूर्वी १८९८ साली रमाबाई जानेवारी ते ऑगस्ट ह्या कालावधीत पुन्हा अमेरिकेत जाऊन आल्या. त्यांच्या सांगण्यावरून रमाबाई असोसिएशन बंद करण्यात येऊन ‘अमेरिकन रमाबाई असोसिएशन’ ही नवी संस्था स्थापन करण्यात आली व ‘शारदा सदन’ ही संस्था ख्रिस्ती संस्था म्हणून काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अमेरिकेहून परत आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचे क्षेत्र वाढविले. ‘कृपासदना’ला जोडून एक रुग्णालय बांधण्यात आले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन’, ‘शारदा सदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून निरनिराळ्या गटांचे लोक राहत.
आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईंनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ‘मुक्त्तिसदना’त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या साह्याने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता ‘सायं घरकुला’ची व्यवस्था त्यांनी केली. १९१९ साली रमाबाईंना त्यांच्या ह्या कार्याबद्दल ‘कैसर-ई-हिंद’ हे सुवर्ण पदक मिळाले.
दुसऱ्यांकरिता अविरत कष्ट करणाऱ्या या समाजसेविकेचे व्यक्त्तिगत जीवन मात्र फार दुःखी होते. शेवटच्या काळात त्यांची एकुलती एक मुलगी मनोरमा ही मिरज येथे वारली (२४ जुलै १९२१) व त्यानंतर लवकरच केडगाव येथे रमाबाईंचेही निधन झाले.
रमाबाई आपल्या वडिलांप्रमाणेच काळाच्या पुढे होत्या. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्रजी, संस्कृत यांबरोबरच तुळू आणि हिब्रू ह्या भाषाही अवगत होत्या. अत्यंत बुद्धिवान असलेल्या या महिलेचे अंतःकरण अत्यंत उदार व दीनदुबळ्या स्त्रियांकरिता सतत तळमळणारे होते. वैयक्त्तितक दुःखाची किंवा अडचणींची पर्वा त्यांनी कधीच केली नाही. त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणजे भूतदयेचे प्रतीक असलेला येशू ख्रिस्त स्वीकारला दीनदुबळ्यांच्या सेवेचे व्रत स्वीकारले पण कुठलाही विशिष्ट ख्रिस्ती धर्मपंथ त्यांनी स्वीकारला नाही. त्या धर्माने ख्रिस्ती झाल्या पण त्यांनी हिंदू समाज व संस्कृती मात्र सोडली नाही. शेवटपर्यंत त्या शाकाहारी राहिल्या त्यांनी सतत खादी वापरली व आश्रमवासींनाही ती वापरावयास लावली. स्त्रियांच्या उद्धाराकरिता त्यांनी आजन्म व अथकपणे केलेले प्रयत्न त्यांच्या समर्मित जीवनाचेच एक अंग होते. ज्या व्यक्त्तींनी आपल्या सेवेने भारताची प्रतिष्ठा वाढविली त्यांमध्ये रमाबाईंचे स्थान वैशिष्टापूर्ण आहे.
वर उल्लेखिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त्त त्यांनी लिहिलेली इतर काही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत : इबरी (भाषेचे) व्याकरण (१९०८) नवा करार (१९१२) मूळ ग्रीक व हिब्रू भाषांतून असलेल्या बायबलचे मराठी भाषांतर, प्रभू येशू चरित्र (१९१३) भविष्यकथा (२ री आवृ. १९१७), अ टेस्टिमनी, मुक्त्ति प्रेअर बेल अँड न्यूज लेटर्स, फॅमिन – एक्स्पिरिअन्स इन इंडिया इत्यादी.
संदर्भ : 1.Dyre, Helen. Pandita Ramabai , 1900
२.टिळक, दे. ना. महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई, नासिक, १९६०.
३. साठे ताराबाई, अपराजिता रमा, पुणे, १९७५.
खोडवे, अ. ह. कुलकर्णी, मा. गु.
“