रनां, (जोझेफ) अर्नेस्त : (२८ फेब्रुवारी १८२३–२ ऑक्टोबर १८९२). फ्रेंच इतिहासकार, धर्मपंडित आणि सेमिटिक भाषापंडित. जन्म फ्रान्ममधील त्रगिए ह्या गावी. कॅथलिक धर्मोपदेशक होण्याच्या हेतूने त्याने आरंभी त्रेगिए येथे आणि नंतर पॅरिसमधील धर्मशिक्षणसंस्थांमध्ये – विशेषतः सँ स्युल्पीस ह्या संस्थेत-शिक्षण घेतले. तेथे असताना बायबलच्या मागे ईश्वरी प्रेरणा आहे किंवा कसे ह्याबद्दल त्याच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे धर्मोपदेशकाची शपथ घेणे त्याला शक्य झाले नाही. १८४५ साली रोमन कॅथलिक चर्चपासून त्याने फारकत घेतली. त्यानंतर त्याने ‘एकॉल नॉर्माल स्युपेरिअर’ ह्या प्रशिक्षणसंस्थेची ‘आग्रेजे द-फिलोझोफी’ ही तत्त्वज्ञानातली पदवी संपादन केली (१८४८). यूरोपात आव्हेरोईझ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इब्न रुश्द ह्या तत्त्ववेत्त्याच्या तत्त्वज्ञानाविषयी संशोधन करून त्याने लिहिलेला प्रबंध आव्हेरोएस ए आव्हेरोईस्म (इं. शी. आव्हेरोईझ ॲड आव्हेरोईझम) १८५२ मध्ये प्रसिद्ध झाला. ह्याच प्रबंधावर काम करण्याकरिता १८४९ साली रनांने इटलीला भेट दिली होती. १८५१ मध्ये ‘बिब्लियोतॅक नासियॉनाल’ ह्या फ्रान्सच्या राष्ट्रीय ग्रंथसंग्रहालयातील हस्तलिखित विभागात त्याला नोकरी मिळाली. १८६०-६१ ह्या कालखंडात फिनिशिया व पॅलेस्टाइन येथे पुरातात्विक संशोधनार्थ फ्रेंच शासनाने पाठविलेल्या अभ्यासकांचे त्याने नेतृत्व केले. १८६२ मध्ये कॉलेज द फ्रांस ह्या पॅरिसच्या विख्यात शिक्षणसंस्थेत हिब्रू भाषेच्या अध्यासनावर त्याची नेमणूक करण्यात आली. मानवी संस्कृतीच्या इतिहासात ज्यूंनी कोणती भूमिका बजावली, ह्यासंबंधी जी जाहीर व्याख्याने तो ह्या पदावर असताना देत होता, ती परंपरागत विचारांच्या विरुद्ध असल्याचा दावा करून फ्रेंच सरकारने बंद केली. १८६३ मध्ये लेझोरिजीन द्यु क्रिस्तियानिस्म (१८६३–८३ इं. शी. द हिस्टरी ऑफ द ऑरिजिन्स ऑफ क्रिश्चॅनिटी) ह्या ग्रंथाचा पहिला भाग व्ही द जेझ्यू (इं. भा. लाइफ ऑफ जीझस, १८६९) प्रसिद्ध झाला. मृदू मनाचा, उदात्त नैतिक शिकवण देणारा परंतु एक मानव म्हणूनच रनांने ह्या ग्रंथात ख्रिस्ताचे चित्र उभे केले आहे. चर्चने ह्या ग्रंथाचा तीव्र निषेध केलाच परंतु रनांला कॉलेज द फ्रांसमधील आपले अध्यासनही गमवावे लागले. ‘द हिस्टरी ऑफ द ऑरिजिन्स ऑफ क्रिश्चॅनिटी’ ह्या ग्रंथाचे, सूची खंड धरून एकूण आठ भाग आहेत. ख्रिस्ती धर्मपरंपरेचा उद्गम, चर्चची स्थापना, ख्रिस्ती धर्माने ग्रीकांवर मिळविलेला विजय इत्यादींबाबतचे चिकित्सक विवेचन रनांने ह्या ग्रंथात केले आहे. ख्रिस्ती धर्मपरंपरेतील थोर व्यक्त्तिमत्त्वांची चरित्रे उभी करीत हे विवेचन केलेले असून एक प्रकारचा मानसशास्त्रीय दृष्टिकोणही त्यातून प्रतीत होतो. शास्त्रीय दस्तऐवज म्हणून ह्या ग्रंथाचे मोल वादातीत नसले, तरी त्याने यूरोपच्या वैचारिक जीवनात खळबळ उडवून दिली होती. १८७० साली फ्रान्समध्ये रक्त्तशून्य क्रांती घडून आल्यानंतर रनांला कॉलेज द फ्रांसच्या सेवेत पुन्हा घेण्यात आले आणि १८८३ साली तो ह्या शिक्षणसंस्थेचा प्रमुख झाला.
एव्हाना त्याला फार मोठी ख्याती प्राप्त झाली होती. इपॉलित आदॉल्फ तॅन, गाँकूर बंधू, सँत-बव्ह, ग्यूस्ताव्ह फ्लोबेअर ह्यांच्यासारख्या विचारवंतांच्या आणि साहित्यिकांच्या बरोबर त्याचे नाव घेतले जात होते. १८९० मध्ये लाव्हनीर द ला सिंयास (इं. भा. द फ्यूचर ऑफ सायन्स) हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. विज्ञान आणि बुद्धिमंत अभिजनवर्ग मनुष्यमुक्त्तीचा मार्ग मोकळा करतील हा आपला विश्वास ह्या ग्रंथांत त्याने व्यक्त्तविला आहे. इस्त्वार द्यु पप्ल दिझ्राएल (१८८८–९३, इं. भा. हिस्टरी ऑफ द पीपल ऑफ इझ्राएल, १८८८–९६) हा त्याचा आणखी एक उल्लेखनीय ग्रंथ. ज्यू धर्म नाहीसा झाला, तरी त्याच्या प्रेषितांची स्वप्ने एक दिवस खरी होतील आणि स्वर्गाच्या संकल्पनेवाचून ह्या जगात न्याय अवतरेल, असा विचार त्याने त्यात मांडला आहे.
रनांचे अन्य काही ग्रंथ असे : द्राम फिलोझोफीक (१८७८–८६, इं. शी. फिलॉसॉफिकल ड्रामा), दियालॉग एक फ्राग्मां फिलोझोफीक (१८८८, इं. शी. फिलॉसॉफिकल डायलॉग ॲड फ्रॅग्मेंट्स) आणि एग्झामा द काँसियांस फिलोझोफीक (१८९०, इं. शी. एक्झामिनेशन ऑफ द फिलॉसॉफिकल मोरालिटी). त्याची विज्ञाननिष्ठा आणि तो करीत असलेला निःपक्षपांती बुद्धिवादाचा पुरस्कार त्याच्या उपर्युक्त्त निबंधग्रंथांतून दिसतो. जुर्नाल दे देबा ह्या नियतकालिकासाठी रनांने वैचारिक निबंधलेखन केले होते. ते एत्यूद दिस्वार रलिजिअझ (१८५७) आणि एसॅ द् मॉराल ए द् क्रितीक (१८५९) ह्या ग्रंथांत अंतर्भूत केले गेले आहेत.
सुव्हनीर दांफांस ए द् जनॅस (१८८३, इं. भा. रिकलेक्शन्स ऑफ माय यूथ, १८८३), काइए (१९०६, इं. शी. नोटबुक) आणि नुव्हो काइए (१९०७, इं. शी. न्यू नोटबुक) हे त्याचे ग्रंथ आत्मचरित्रात्मक होत. ह्यांपैकी ‘नोटबुक’ व ‘न्यू नोटबुक’ ह्या दोन ग्रंथांत धर्मादी विषयांवरील आपल्या विचारांची जडणघडण कशी झाली, हे त्याने मार्मिकपणे सांगितले आहे.
रनांला राजकारणातही स्वारस्य होते. आरंभी त्याचे विचार उदारमतवादी होते आणि काही काळ घटनात्मक राजेशाहीचा तो पुरस्कर्ता होता. फ्रँको-जर्मन युद्धात फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर त्याचे विचार अधिकारशाहीकडे झुकले होते.
त्याची फ्रेंच अकादमीवर १८७८ मध्ये निवड झाली होती. पॅरिस येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Chadbourne, Richard M. Ernest Renan, New York, 1968.
2. Chadbourne, Richard M. Ernest Renan as an Essay st, Oxford, 1957.
सरदेसाय, मनोहरराय