रथयात्रा : देवतोत्सवाच्या विशिष्ट दिवशी देवतेच्या उत्सवमूर्तीस रथात विराजमान करून जी मिरवणूक काढली जाते तिला रथयात्रा वा रथोत्सव म्हणतात. ‘रथ’ शब्दाचा दुसरा अर्थ ‘वीर’ वा ‘शूर’ असाही आहे. देवतांनी दैत्यांवर जे विजय मिळविले, त्याप्रीत्यर्थ लोकांनी त्यांच्या गौरवार्थ आनंदोत्सवपूर्वक मिरवणूक काढल्याचे निर्देश पुराणांत आढळतात. विजयी शूर-वीरांच्याही मिरवणुका रथांतून निघत असत. भविष्यपुराणात ब्रह्मदेवाच्या रथयात्रेची (१·१८·३–१७) तर देवीपुराणात दुर्गेच्या रथयात्रेची माहिती आली आहे. भविष्योत्तरपुराणात (१३४·४४–७१) तयार करावयाचा रथ, उत्सवमूर्तीची त्यात स्थापना, मिरवणूक इत्यादींबाबतची माहिती आली आहे. वेदकाली देवांचे वाहन म्हणून रथास अनन्यसाधारण महत्त्व होते. अनेक अश्व जोडलेल्या इंद्राच्या रथाची वर्णनेही वैदिक वाङ्ममयात आढळतात. आर्यांच्या सेनेचे रथ हे एक अत्यंत महत्त्वाचे अंग होते. रथ तयार करणाऱ्यांचा (रथकार) प्राचीन काळी एक व्यवसायात्मक स्वतंत्र वर्गच होता.

जगन्नाथाची रथयात्रा, पुरी (ओरिसा)महायान बौद्धांनी बुद्धमूर्तीची पूजा-अर्चा सुरू केली व तिला राजोपचारही ते अर्पण करू लागले. विजयी राजांप्रमाणे रथातून विजययात्रा जशी काढत, तसेच उपचार बुद्धमूर्तीसही करण्यात येऊ लागले आणि यातून रथयात्रेचा उगम झाला असावा. जेथे जेथे महायान पंथाचा प्रसार झाला, तेथेतेथे सुवर्णाच्या बुद्धमूर्तीची रथयात्रा काढण्याची प्रथा पसरत गेली. वैशाखी अष्टमीस निघालेल्या पाटलिपुत्रनगरीतील बुद्धाच्या रथयात्रेचे तपशीलवार वर्णन फाहियान (पाच वेशतक) या चिनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे. लोकांच्या आरोग्य व सुखासाठी मार्गशीर्ष शुक्लपक्षात सूर्याची रथयात्रा करावी, असे हे माद्रीच्या चतुर्वर्ग चिंतामणीत म्हटले आहे. माघ शुद्ध सप्तमीस सूर्याचे चित्र काढून रथाचे दान व पूजा करण्याचे व्रतही हिंदूंमध्ये आचरले जाते. या व्रतास रथसप्तमी, भानुसप्तमी, रथांकसप्तमी  व रथांगसप्तमी अशी ही नावे आढळतात. कोनार कयेथील प्रख्यात सूर्यमंदिर हे भव्य रथाकारच आहे. तसेच महाबलीपुर येथील ‘पांडवरथ’ म्हणून ओळखले जाणारे मंदिरही प्रसिद्ध आहे.

अनेक देवस्थानांतून देवस्थानाच्या स्थितीनुसार लहान-मोठे रथ तयार करून ठेवलेले असतात व त्या त्या देवतोत्सवाच्या प्रसंगी ते सजवून-श्रृंगारून त्यात उत्सवमूर्ती ठेवतात. भक्त्तगण स्वतः तो रथ ओढतात. अश्व, हत्ती वा बैल जोडूनही रथाची मिरवणूक काढतात. ज्या मार्गाने रथ जावयाचा असेल तो मार्ग सडासंमार्जन करून, रांगोळ्या तसेच पताकादींनी सजवितात. या रथास बहुधा चार, आठ, बारा, सोळा अशी चाके असतात. रथाचा आकार मंदिराचे गर्भगृह व शिखर यांच्यासारखा असतो. रथ ध्वजपताका, पुष्पमालादींनी सुशोभित करतात. तांबे, पितळ, सोने-रूपे या धातूंचाही त्याच्या अलंकरणात कमीअधिक वापर केलेला असतो. बहुतेक ठिकाणी रथात उत्सवमूर्ती ठेवून रथाच्या पुढच्या बाजूस बांधलेल्या लांब दोरखंडाला धरून भक्त्तगण तो रथ ओढतात. रथापुढे ऐपतीनुसार व प्रथेनुसार वाजंत्री लावून, आतषबाजी करून मिरवणूक निघते. दक्षिण भारतात रथापुढे देवदासी नृत्य करतात. पुरोहित, वैदिक गण रथामागे मंत्रगान, भजनादी म्हणत चालतात. दक्षिणेत शिवाच्या रथयात्रेत शैव धर्मग्रंथ तेवारम्‌मधील निवडक भाग गातात. रथापुढे व चाकाखाली नारळ फोडतात, गुलाल-बुक्का उधळला जातो, देवतेचा मोठ्याने जयजयकार करतात. संथ गतीने ही रथयात्रा पुढे सरकते. मार्गात भाविक देवतेला पुष्पमाला, पूजाद्रव्य वाहतात. उत्सवप्रसंगी देवतेची यात्राही भरते. ठराविक ठिकाणापर्यंत हा रथ नेऊन शेवटी तेथे उत्सवमूर्तीची विशेष पूजा-अर्चा-आरती वगैरे होऊन तो रथ पुन्हा मूळ देवस्थानात आणला जातो.

वैष्णवांमध्ये पुरी येथील जगन्नाथाची रथयात्रा सर्वांत मोठी व प्रसिद्ध आहे. [⟶ जगन्नाथाचा रथ]. अक्रूराने कृष्णास व बलरामास गोकुळातून रथात बसवून मिरवत मथुरेत आणले. त्या दिवसापासून रथयात्रेची प्रथा सुरू झाली अशी वैष्णवांची धारणा आहे. उत्सवप्रसंगी ⇨पालखीतून तसेच सरोवरातील जोडनौकेतून वा सुखासन इ. वाहनांतून काढण्यात येणाऱ्या देवतेच्या मिरवणुकीचे प्रकारही रथयात्रेतूनच निघाले असावेत.

सुर्वे, भा. ग.