रणनीति : (टॅक्टिक्स). रणनीती म्हणजे रणभूमीवरील डावपेच, असे स्थूलमानाने म्हणता येईल. सामान्यपणे असे डावपेच हे एका व्यापक सैनिकी व्यूहतंत्राचा (स्ट्रॅटेजी) एक भाग असतात. युद्धमीमांसेत व्यूहतंत्र ही संकल्पना व्यापक अर्थाची असून रणनीती ही त्या व्यापक संकल्पनेची एक घटक असते. युद्धांचे समग्र व सर्वांगीण नियोजन असा व्यूहतंत्राचा अर्थ होतो. मात्र रणनीतीमध्ये विशिष्ट अशा संभाव्य रणक्षेत्रात सैन्याचा, शस्त्रास्त्रांचा व इतर युद्धसामग्रीचा कौशल्यपूर्वक कार्यक्षम आणि परिणामकारक उपयोग कसा करावयाचा याचा विचार करण्यात येतो. संभाव्य रणक्षेत्राच्या परिसराचा, हवामानाचा आणि आपल्या व शत्रूच्या युद्धसामग्रीचा व युद्धक्षमतेचा आपल्या हिताच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करणे, म्हणजे रणनीती होय.
रणातील डावपेचांची उद्दिष्टे एका दृष्टीने सनातन आहेत. उदा., चढाई आणि प्रतिकार, युद्धसामग्री आणि सैनिक यांचे एकीकरण किंवा वितरण, दळणवळणाची साधने आणि शस्त्रास्त्रे यांचा नेमका उपयोग आणि अनपेक्षित हल्ल्याची किंवा त्याच्या प्रतिकाराची तयारी इत्यादी. युद्धातील डावपेच अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. सेनाप्रमुखाला सोपविलेले कार्य, त्याच्या हाती असलेले सैन्यबल, शस्त्रास्त्रे आणि इतर युद्धसामग्री, तसेच संभाव्य रणभूमीचे स्वरूप व हवामान आणि शत्रूबल आणि त्याची रचना या गोष्टी डावपेच आखताना विचारात घ्याव्या लागतात. ठरविलेल्या डावपेचांमध्ये ऐनवेळी बदल करणेही कधीकधी भाग पडते. त्यामुळे रणभूमीवरील डावपेच पूर्वनियोजित असले, तरी त्यांची प्रत्यक्ष कार्यवाही करणे गुंतागुंतीचे ठरते. आपल्या सैन्याचे मनोधैर्य सतत टिकवून ठेवणे, आपल्या विजयाबद्दल खात्री वाटावी या दृष्टीने त्यांची संकल्पशक्त्ती दृढ करणे, यांसारख्या गोष्टी युद्धातील डावपेचांच्या यशस्वी कार्यवाहीसाठी आवश्यक असतात.
रणनीतीच्या विचारात दोन उपपत्ती महत्त्वाच्या आहेत : (१) चढाईचे डावपेच आणि (२) संरक्षणात्मक किंवा प्रतिकारात्मक डावपेच. यांपैकी चढाईच्या लष्करी डावपेचांत पुढील डावपेच अंतर्भूत होतात : (१) शत्रूला सर्व बाजूंनी घेरणे. या प्रकारात दुय्यम प्रकारच्या आक्रमक हालचाली करून शत्रूची विशिष्ट ठिकाणी कोंडी केली जाते व त्याच्या बगलांवरून त्यावर मुख्य हल्ला करण्यात येतो. एकेरी कोंडी आणि दुहेरी कोंडी असे त्याचे प्रकार असतात.
दुसऱ्या प्रकारात शत्रूच्या सैन्य रचनेतच कोंडी करून, त्याच्या पिछाडीवरून मुख्य हल्ला करण्यात येतो. त्यामुळे शत्रूला आपले आघडीचे हल्ले मोडून माघार यावी लागते. तिसऱ्या प्रकारात शत्रूच्या आघाडीवर सरळ हल्ला करून ती तोडली जाते आणि त्यातून रणगाडा इतर लढाऊ वाहने घुसवून शत्रूची पिछाडी, त्याचे सामग्रीचे साठे व शिलकी फौजा यांचा नाश करण्यात येतो. समोरून करावयाच्या या हल्ल्यात आपले सैन्यबळ शत्रूपेक्षा अधिक असणे आवश्यक असते. चौथ्या प्रकारात चढाई आणि बचाव या दोन्ही गोष्टींचा क्रम बदलून उपयोग करण्यात येतो. म्हणजे उद्देश्य चढाईचे असते, पण शत्रूला फसविण्यासाठी प्रारंभी बचावात्मक हालचाली करण्यात येतात. पाचव्या प्रकारात रणांगणातून पळणाऱ्या शत्रूचा वेगाने पाठलाग करून त्यांना दुसरीकडे मोर्चे बांधण्याची संधी मिळू न देणे, हे उद्दिष्ट असते. संरक्षणात्मक किंवा बचावाचे डावपेच साधारणपणे दोन कारणांनी आखले जातात. एक म्हणजे चढाई करण्याइतपत आपले सैन्य एकत्रित झाले नसेल तर व दुसरे म्हणजे शत्रूला त्याच्याच परिसरात स्थानबद्ध करून आपल्या इतर आघाड्यांवरील सैन्याची जमवाजमव चढाईसाठी पूर्ण करणे. बचावाच्या डावपेचाचे तीन प्रकार संभवतात. विशिष्ट क्षेत्राचा बचाव, फिरता बचाव आणि सैन्य माघारीचे डावपेच.
विशिष्ट क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी त्या क्षेत्राभोवती मोर्चे उभारणे, खंदक खणणे, शत्रूच्या टेहळणी पथकांना किंवा आक्रमक पथकांना त्या क्षेत्राजवळ येऊ न देणे, यासाठी अनेकदा तोफखाना, विमाने इत्यादींचाही उपयोग करतात. फिरत्या संरक्षक डावपेचांचा उपयोग एखादे क्षेत्र संरक्षणीय ठरत नसेल, त्यावेळी करण्यात येतो किंवा अशा क्षेत्राच्या संरक्षणासाठी सैन्यबळ पुरेसे नसेल तर होतो. फिरत्या संरक्षक योजनेसाठी रणगाडे, विमाने, यंत्रसज्ज सैन्यपथके इत्यादींचा उपयोग केला जातो. सैन्यमाघार हा बचावाचाच एक भाग आहे. आघाडीवरून माघार घेणे आणि पिछाडीस असलेल्या नव्या बचाव फळीवर जाणे यासाठी फार बारकाईने आखणी करावी लागते. आपल्या माघार घेणाऱ्या सैन्याचे नियंत्रण करणे आणि शत्रूला चुकवून पिछाडीवर जाणे ही गोष्ट गुंतागुंतीची असते. संरक्षक डावपेचांत आणखी एक प्रकारची कार्यवाही संभवते. आगेकूच करणारे शत्रूबल संख्येने आणि सामर्थ्याने मोठे असेल, तर त्याच्या वाटचालीत अडथळे उत्पन्न करून त्याची आगेकूच विलंबित करणे, असे या डावपेचांचे स्वरूप असते.
कालमानानुसार युद्धाच्या डावपेचांचे स्वरूप बदलत गेल्याचे दिसून येते. विद्यमान काळातील अण्वस्त्रे आणि प्रक्षेपणास्त्रे यांच्या उपलब्धतेमुळे सैनिकी व्यूहतंत्र व रणनीती यांच्या मूलभूत तत्त्वांत फारसा फरक पडत नसला, तरी त्या तत्त्वांनुसार प्रत्यक्षात जी सैनिकी कार्यवाही करण्यात येते, तीत आधुनिक तांत्रिक आणि यांत्रिक शोध आणि सुधारणांमुळे फेरफार करणे अपरिहार्य ठरते.
पहा : खंदक युद्धतंत्र गनिमी युद्धतंत्र जंगल युद्धतंत्र जैव व रासायनिक युद्धतंत्र डोंगरी युद्धतंत्र तडित् युद्धतंत्र नाविक युद्धतंत्र नौसेना पाणबुडी युद्धतंत्र परिस्थितिकीय युद्धतंत्र भूसेना मरुभूमि युद्धतंत्र महायुद्ध, दुसरे महायुद्ध, पहिले युद्ध आणि युद्धप्रक्रिया वायुसेना वेढा युद्धतंत्र व्यूहतंत्र.
संदर्भ : 1. Baldwin, H. W. Strategy for Tomorrow, 1970.
2. Bernard, Brodie, Guide to Naval Strategy, 1959.
3. Fuller, John F. C. The Conduct of War 1789-1961, New York, 1968.
4. Merglen, Albert, Surprise Warfare : Subversive Airborne, and Amphibious Operations, London, 1968.
काथवटे, मा. श्री.