रंगनाथन, शियाळी रामामृत : (९ ऑगस्ट १८९२−२७ सप्टेंबर १९७२). जागतिक कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ व भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक. जन्म तंजावर जिल्ह्यातील शियाळी गावी. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अनुक्रमे शियाळी व मद्रास येथे. १९१६ मध्ये गणित हा विषय घेऊन एम्. ए. पदवी संपादन. १९१७ मध्ये शिक्षणशास्त्राची एल्. टी. पदवी मिळविल्यानंतर पुढील सात वर्षे त्यांनी गणिताचे अध्यापक म्हणून काम केले. पुढे मद्रास विद्यापीठातील ग्रंथपालाच्या जागी नेमणूक (१९२४). नंतर इंग्लंडमधील ख्यातनाम ग्रंथालयांच्या कार्यपद्धतींचे निरीक्षण व ग्रंथपालनाचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला प्रयाण. तेथील वास्तव्यात त्यांनी ‘स्कूल ऑफ लायब्रेरिअन्शिप’ मधील अभ्यासक्रम पुरा केला व क्रॉयडन येथील सार्वजनिक ग्रंथालयात काम करून इतर अनेक प्रसिद्ध ग्रंथालयांच्या कार्यपद्धतीही तुलनात्मक रीतीने अभ्यासल्या. निरनिराळ्या ग्रंथवर्गीकरण पद्धतींचा सखोल अभ्यास केल्यामुळे भारताला परतताना बोटीवरच आपल्या नियोजित द्विबिंदू-वर्गीकरण पद्धतीचा (कोलन क्लासिफिकेशन) आराखडा त्यांनी प्रसिद्ध केला.
पुढे १९२८ मध्ये मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना करून त्यांनी भारतीय ग्रंथालय चळवळीची पायभरणी केली. ग्रंथालयशास्त्राच्या मूलतत्त्वांचा विचार करणारा द फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स हा त्यांचा पहिला ग्रंथ १९३१ मध्ये प्रसिद्ध झाला. १९३१ ते १९६७ या काळात ग्रंथालयाशास्त्रासंबंधी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांपैकी कोलन क्लासिफिकेशन, क्लासिफाइड कॅटलॉग कोड, रेफरन्स सर्व्हिस, डॉक्युमेंटेशन अँड इट्स फॅसेट्स, प्रोलेगोमेना टू लायब्ररी क्लासिफिकेशन हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ होत. त्यांनी निर्माण केलेल्या द्विबिंदू पद्धतीबद्दल अनेक मतभेद असले, तरी या पद्धतीने ग्रंथवर्गीकरणास नवीन बैठक प्राप्त करून दिली.
मद्रास विद्यापीठ ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणून त्यांनी २१ वर्षे काम केले. विद्यापीठातर्फे ग्रंथालयशास्त्राचा शिक्षणक्रम सुरू करण्याच्या कामी त्यांनी पुढाकार घेतला व तो उपक्रम यशस्वीही करून दाखविला. एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता. १९४५ मध्ये तत्कालीन ⇨बनारस हिंदू विश्वविद्यालय (विद्यापीठ) येथे खास निमंत्रणावरून ते गेले व तेथे त्यांनी सु. २० महिने काम केले.
त्यांनी १९४७ ते १९५३ या काळात दिल्ली विद्यापीठात ग्रंथालयशास्त्रातील पदविका, पदवी व पारंगतता इत्यादींचे अभ्यासक्रम सुरू केले. दिल्ली विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही बहुमानाची पदवी देऊन त्यांचा गौरव केला (१९४८).
रंगनाथन यांनी भारतीय ग्रंथालय चळवळही वाढविली. भारतीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष, अब्गिलाचे संपादक व ग्रंथालय परिषदांचे अध्यक्ष अशा विविध नात्यांनी त्यांनी मौलिक कामगिरी बजाविली. ग्रंथालयशास्त्रावर आशिया, यूरोप, अमेरिका या खंडांतील अनेक देशांमधून त्यांनी व्याख्याने दिली. यूनो, यूनेस्को, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन यांसारख्या आंतरराष्ट्रीय समित्यांवरही त्यांनी गौरवास्पद कामगिरी केली. १९५७ मध्ये पद्मश्री देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. मद्रास विद्यापीठात ग्रंथालयशास्त्राचे अध्यासन निर्माण करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. १९६२ पासून बंगलोर येथे ‘डॉक्युमेंटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर’तर्फे ग्रंथालयशास्त्राचे संशोधनकार्य त्यांनी चालू ठेवले. नॅशनल प्रोफेसर ऑफ लायब्ररी सायन्स अशी नेमणूक करून भारत सरकारने त्यांच्या कामगिरीचा यथोचित गौरव केला. पेनसिल्व्हेनिया येथील पिट्सबर्ग विद्यापीठातर्फेही त्यांना डी.लिट्. ही पदवी देण्यात आली तर वर्गीकरण आणि तालिकीकरण या विषयांतील संशोधनाबद्दल त्यांना अमेरिकन लायब्ररी-असोसिएशनकडून ‘मार्गारेट’ मानपारितोषिकही देण्यात आले होते. हा मान मिळविणारे ते पहिलेच भारतीय होते. त्यांचे बंगलोर येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
पहा : ग्रंथालय-चळवळ ग्रंथालयशास्त्र.
संदर्भ : 1. Kaula, P. N. Ed. Library Science Today : Ranganathan Festichrift. 2. Vols., New Delhi, 1965.
2. Rajagopalan, T. S. Ed. Ranganathan’s Philosophy : Assessment, Impact, and Relevance, New Delhi, 1986.
हिंगवे, कृ. शं.
“