येर्ने, नील्स काय : (२३ डिसेंबर १९११ – ). डॅनिश-ब्रिटिश प्रतिरक्षावैज्ञानिक (रोगप्रतिकारक्षमतेसंबंधीच्या विज्ञानातील तज्ञ). जॉर्जेस जे. एफ्. कोलर आणि⇨सेझार मिलस्टाइन या इतर दोन शास्त्रज्ञांसमवेत त्यांना १९८४ च्या शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकाच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. रोगप्रतिकारक्षमता या विषयाच्या सतत तीस वर्षांच्या आपल्या अभ्यासात येर्ने यांनी तीन महत्त्वाचे सिद्धांत मांडले. या सिद्धांतांमधून या शास्त्राच्याआधुनिक विकासाची रूपरेखा विशद केली असून पुढील संशोधनास मार्गदर्शन केले आहे.
येर्ने यांचा जन्म लंडनमध्ये डॅनिश कुटुंबात झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण डेन्मार्कमध्ये व उच्च शिक्षण नेदर्लंड्समधील लायडेन विद्यापीठामध्ये घेतले. वयाच्या सोळाव्या वर्षी पदवी मिळविल्यानंतर व पुढील बारा वर्षे अनिश्चिततेत गेल्यावर त्यांनी कोपनहेगन विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणास सुरुवात केली. १९४३–५६ या काळात डॅनिश स्टेट सीरम इन्सिट्यू टमध्ये संशोधक म्हणून काम करीत असताना त्यांनी १९५१ मध्ये कोपनहेगन विद्यापीठाची एम्. डी. पदवी मिळविली. १९५६–६२ मध्ये ते जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिरक्षाविज्ञान विभागाचे प्रमुख होते. १९६०–६२ मध्ये जिनीव्हा विद्यापीठात जीवभौतिकीचे प्राध्यापक, १९६२–६६ मध्ये अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवविज्ञान विभागात प्राध्यापक व १९६६–६९ मध्ये फ्रँकफर्ट येथील योहान वोल्फगांग गटे विद्यापीठात प्रायोगिक चिकित्साशास्त्राचे प्राध्यापक आणि पॉल अर्लिक इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून त्यांनी काम केले. १९६२–६८ या काळात त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या विविध सल्लागार मंडळांचे सदस्य म्हणूनही काम केले. त्यानंतर १९६९–८० मध्ये ते बाझेल येथील बाझेल ऑफ इम्यूनॉलॉजी या संस्थेचे संचालत होते. तेथून निवृत्त झाल्यावर त्यांनी पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये खास सल्लागार म्हणून काम केले व ते फ्रान्समध्येच स्थायिक झाले.
येर्ने यांचे सिद्धांत समजण्याकरिता प्रतिरक्षाविज्ञानाची मूलतत्त्वे थोडक्यात सांगणे जरूर आहे. शरीराची प्रतिरक्षा यंत्रणा तंत्रिका तंत्राप्रमाणेच (मज्जासंस्थेप्रमाणेच) जटिल आहे. याशिवाय ती सर्व शरीरभागांतून [अवयव व ऊतकांतून (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांतून) विखुरलेली आहे. शरीराचे कार्य अखंडितपणे चालू ठेवून, कोणताही हानिकारक पदार्थ शरीरात प्रविष्ट झाल्यास त्यांचा नाश करणे हे या यंत्रणेचे प्रमुख कार्य आहे. या यंत्रणेचे लसीका-कोशिका[⟶ लसीका तंत्र ] आणि प्रथिन रेणू अथवा ⇨प्रतिपिंडे असे दोन भाग आहेत. लक्षावधी प्रकारांच्या लसीका-कोशिका असून विशिष्ट उद्दीपनात त्यांपैकी प्रत्येक कोशिका विशिष्ट प्रतिपिंड उत्पन्न करू शकते. या कोशिकांची निर्मिती अस्थिमज्जेत (लांब हाडांतील व काही चपट्या हाडांतील वाहिनीयुक्त संयोजी ऊतकात) होते. त्यांची वाढ व गुणन कोशिका विभाजनाने ⇨ यौवनलोपी ग्रंथीत, प्लीहेत (पानथरीत) व लसीका ग्रंथींत होते. रक्तप्रवाहातून त्या सर्व शरीरातील ऊतकांत जातात व तेथून लसिकावाहिन्यांद्वारे पुन्हा रक्तप्रवाहात शिरतात.
प्रतिपिंडे शरीराबाहेर तयार होणाऱ्या कोशिकांना किंवा मोठ्या रेणूंना ते शरीरात प्रविष्ट होताच त्यांना संयोजित होतात. हे बाह्य पदार्थ सर्प विषापासून ते थेट प्रतिरोपित (कृत्रिम रीतीने शरीरातून काढून टाकून त्या जागी दुसरे बसविलेले) हृदय किंवा मूत्रपिंड यांसारखे काहीही असू शकतात. या सर्वांना ‘प्रतिजन’ ही संज्ञा वापरतात. एखाद्या प्रतिपिंडास अशा प्रतिजनाला संयोजित होण्यास योग्य अशी जागा (या जागेला ‘प्रतिजन विशेषक’ म्हणतात) मिळताच संयोजन क्रिया होते व बाह्य पदार्थ निष्प्रभ बनविला जातो. शरीरसंरक्षणाकरिता या असंख्य प्रकारच्या प्रतिजनांविरुद्ध शरीर अनेक प्रकारची प्रतिपिंडे उत्पन्न करते, तसेच स्वयंचलित यंत्रणेद्वारे जरूर तेव्हा त्यांचे उत्पादनही वाढवू शकते.
येर्ने यांनी १९५५ मध्ये पहिला सिद्धांत मांडला. या सिद्धांताप्रमाणे विशिष्ट प्रतिपिंड प्रतिसाद पुढीलप्रमाणे तयार होतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात नैसर्गिक प्रतिपिंडे मोठ्या प्रमाणात असतात व ती सर्व प्रतिजनांना प्रतिसाद देऊ शकतात. गर्भावस्थेतच ही प्रतिपिंडे कोणतेही बाह्य प्रतिजन नसताना तयार होतात. पुढे बाह्य प्रतिजन योग्य रीतीने संयोजित होता येईल असा प्रतिपिंड रेणू निवडते व बद्ध होते. ही प्रतिजन-प्रतिपिंड बद्धता विशिष्ट गुणधर्माच्या प्रतिपिंड निर्मितीस चेतना देते. या सिद्धांताला ‘प्रतिपिंड निर्मितीचा नैसर्गिक-निवड सिद्धांत’असे नाव असून तो आधुनिक प्रतिरक्षाविज्ञानाचा मूलाधार मानला जातो.
त्यांनी आपला दुसरा सिद्धांत १९७१ मध्ये मांडला. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील प्रतिरक्षा यंत्रणेच्या कायिक घडामोडीतून होणाऱ्या प्रगतीची माहिती आहे. स्कंधकोशिकांपासून (रक्तातील इतर कोशिका निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पूर्वगामी कोशिकांपासून) पूर्ण वाढलेल्या प्रतिजनाविरुद्ध प्रतिक्रिया करण्यास समर्थ अशा लसीका-कोशिकांविषयीचा हा सिद्धांत आहे. अस्थिमज्जेतील पूर्वगामी कोशिकांपासून तयार होणाऱ्या एकूण कोशिकांपैकी निम्म्या यौवनलोपी ग्रंथींतून, तर निम्म्या सरळ रक्तात शिरतात. यौवनलोपी ग्रंथीतून जाणाऱ्या कोशिका अथवा टी-कोशिका प्रतिपिंडे निर्माण करीत नाहीत परंतु सरळ रक्तात शिरणाऱ्या अथवा बी-कोशिका त्यांची निर्मिती करतात. टी-कोशिका निरनिराळ्या परिस्थितीत आवश्यकतेप्रमाणे बी-कोशिकांच्या प्रतिपिंडांच्या निर्मितीचे दमन किंवा वृद्धी करू शकतात. प्रतिरक्षा यंत्रणा स्वनिर्मित प्रतिजनांच्या मदतीमुळे हळूहळू परिपक्व बनते.
इ. स. १९७४ मध्ये त्यांनी तिसरा महत्त्वाचा ‘जालक सिद्धांत’ मांडला. त्यात विशिष्ट प्रतिरक्षा प्रतिसादाचे नियंत्रण कसे होते ते सांगितले आहे. प्रतिरक्षा यंत्रणा ही लसीका-कोशिका व प्रतिपिंडे यांवर अवलंबून असून हे भाग एकमेकांशी व प्रतिजनांशी ज्या दुहेरी रीतीने अन्योन्यक्रिया करतात त्यावर तिचे स्वनियंत्रण अवलंबून असते. बाह्य प्रतिजन ओळखण्याशिवाय हे भाग एकमेकांना ओळखतात व म्हणून अबाधित राहू शकतात.
प्रतिपिंडे पहिल्या प्रतिपिंडावरील प्रतिजन बद्ध करू शकणाऱ्या पदार्थाविरुद्ध नवीन प्रतिपिंडाची निर्मिती करू शकतात व त्यांना प्रति-प्रतिपिंड म्हणतात. ही प्रति-प्रतिपिंडे प्रति-प्रति-प्रति-प्रतिपिंडे निर्माण करू शकतात. मूलार्थाने ही प्रतिपिंडनिर्मिती अंतहीन असते व नव्या विशिष्ट गुणधर्मांची सतत भर पडत असते. प्रत्येक नवीन उत्पादन (पिढी) एकमेकांचे दमन किंवा वृद्धी करण्यास समर्थ असते. प्राकृतिक (सर्वसाधारण) अवस्थेत हे प्रतिपिंडांचे जालक नेहमी संतुलित असते. जेव्हा शरीरात एखादे प्रतिजन प्रविष्ट होते तेव्हा हे संतुलन बिघडते. यंत्रणा जेव्हा बिघडलेले संतुलन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या प्रतिजनाविरुद्ध प्रतिसाद निर्माण होतो.
या सिद्धांताचा काही प्रायोगिक वैद्यकात आणि प्रत्यक्ष रुग्णांमध्ये उपयोग करण्यात आला आहे. उदा., (१) पराग-रोधी प्रतिपिंडॆ पराग-सुग्राह्यता असलेल्या व्यक्तीत अधिहर्षतेची (ॲलर्जीची) लक्षणे उत्पन्न करतात [⟶ पराग ज्वर].प्राण्यांना प्रति-प्रतिपिंडे देऊन पराग-रोधी प्रतिपिंड निर्मितीच थांबवता आली आहे म्हणजेच अधिहृर्षता थोपविता आली आहे. (२) आत्मप्रतिरक्षाजन्य रोग: स्वनिर्मित प्रतिपिंडे कधी कधी शरीरातील ऊतकांनाच हानिकारक ठरून रोग उत्पन्न करतात. येथे संरक्षणाऐवजी प्रतिपिंडे नाश करू लागतात. उदा., ⇨अवटू ग्रंथीचा हाशिमोटो रोग (एच्. हाशिमोटो या जपानी शस्त्रक्रियाविशारदांच्या नावाने ओळखण्यात येणारा रोग). या रोगामध्ये प्रतिपिंडे अवटू ग्रंथीच्या ऊतकाचा नाश करू लागतात. प्रयोगशालेय आत्मप्रतिरक्षाजन्य रोगांवर प्रति-प्रतिपिंडांचा उपचार यशस्वी ठरला आहे.
येर्ने यांच्या सिद्धांतांनी प्रतिरक्षाविज्ञानात महत्त्वाची भर घातली आहे. त्यांच्या पहिल्या सिद्धांतावर ⇨ सर (फ्रँक) मॅकफार्लेन बर्नेट आणि ⇨सर पिटर ब्रायन मेडावर या शास्त्रज्ञांनी अधिक संशोधन करून प्रतिपिंडांविषयी नवीन माहिती मिळविली आणि त्याबद्दल या दोघांना १९६० चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकाचे नोबेल पारितोषिक मिळाले.
नोबेल पारितोषिकाखेरीज येर्ने यांना मिळलेल्या बहुमानात शिकागो, कोलंबिया (न्यूयॉर्क), कोपनहेगन व बाझेल या विद्यापीठांनी दिलेल्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या, टोराँटो (कॅनडा) येथील गेर्डनर प्रतिष्ठानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार (१९७०), अमेरिकेचा वॉटरफर्ड बायोमेडिकल सायन्स पुरस्कार (१९७८) व स्वित्झर्लंडच्या मार्से बेनॉइस्ट प्रतिष्ठानाचे पारितोषिक (१९७९) हे उल्लेखनीय आहेत. ते रॉबर्ट कॉख इन्स्टिट्यूट (बर्लिन), अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, अमेरिकन असोसिएशन ऑफ इम्युनॉलॉजिस्ट्स, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अमेरिका), रॉयल डॅनिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रॉयल सोसायटी (ब्रिटन) इ. वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत.
भालेराव, य. त्र्यं.