येन्सन,युहानेस व्हिल्हेल्म : (२० जानेवारी १८७३–२५ नोव्हेंबर १९५०). डॅनिश कथा-कादंबरीकार, कवी व निबंधलेखक. डेन्मार्कमधील फार्सो येथे जन्मला. कोपनहेगन विद्यापीठात काही काळ वैद्यकीचा अभ्यास केल्यानंतर त्याने लेखक व्हायचे ठरविले. कथालेखक म्हणून सुरुवातीस तो प्रसिद्धीला आला. त्याच्या कथा सामान्यतः तीन प्रकारांत विभागता येतील. त्याच्या प्रदेशातील लोक, परंपरा, आख्यायिका, सृष्टिसौंदर्य यांविषयीच्या ‘हिमरलँड स्टोरीज’ ( १८९८–१९१०, इं. शी.) त्याच्या अतिपूर्वेकडील देशांतील प्रवासावर आधारलेल्या ‘इक्झॉटिक स्टोरीज’ ( ३ खंड, १९०७-१७ इं. शी.) आणि ‘मिथस’ ( इं. शी.) या नावाखाली प्रसिद्ध केलेल्या कथा ( ७ खंड, १९०७–१९४४). ‘मिथ’ ह्या नावाने येन्सनने जे लेखन केले, त्यात छोट्या छोट्या कथांना व्यापक असे मानवी आणि वैश्विक यथादर्शन ( पर्स्पेक्टिव्ह) देण्याचा त्याचा प्रयत्न होता. ह्या कथांच्या गद्यशैलीत अनेकदा भावगीताची गेयता सहजपणे मिसळून गेल्याचे दिसून येते. ‘मिथ’ ह्या सदरातील त्याचे काही लेखन निबंधवजाही आहे. द फॉल ऑफ द किंग ( १९००-०१, इं. भा. १९३३) ही त्याने लिहिलेली ऐतिहासिक कादंबरी. सोळाव्या शतकात होऊन गेलेला डेन्मार्कचा राजा क्रिस्त्यान दुसरा, ह्याच्या जीवनावर ती आहे. तथापि ह्या कादंबरीच्या रूपाने येन्सनने आपल्या देशबांधवांचा झालेला ऱ्हास आणि त्यांची चैतन्यशून्य अवस्था ह्यांवर प्रकाश टाकला आहे. डॅनिश लोक, त्यांचे स्वभावविशेष, डॅनिश निसर्ग आणि इतिहास या सर्व गोष्टींचा त्याने केलेला अभ्यास त्याच्या लेखनात दिसून येतो. अमेरिकेत प्रवास केल्यानंतर त्याने मादाम दोरा ( १९०४) आणि ‘द व्हील’ ( १९०५, इं. शी.) ह्या दोन कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे द लाँग जर्नी ( १९०८–२२, इं. भा. ३ खंड, १९२२) ह्या नावाने लिहिलेल्या सहा कादंबऱ्या. हिमयुगीन आदिम माणसापासून ते पंधराव्या शतकात कोलंबस अमेरिकेचा शोध लावतो तोपर्यंत त्याने मानवजातीच्या उत्क्रांतीचा मागोवा घेतला आहे. येनस्नवर डार्विनच्या उत्क्रांतिवादी विचाराचा मोठा प्रभाव होता आणि तो त्याच्या ह्या कादंबऱ्यांतून विशेषत्वाने प्रत्ययास येतो. त्याच्या निबंधलेखनातूनही त्याने डार्विनची विचारप्रणाली मांडलेली आहे.
येन्सन हा एक प्रतिभावंत कवीही होता. १९४३ पर्यंतची त्याची कविता Digte–1901–1943 या नावाने संकलित झालेली आहे. जिवंत, परिवर्तनीय वास्तवाचे प्रत्ययकारी दर्शन तो आपल्या कवितेतून घडवितो. आधुनिक डॅनिश कवितेवर त्याचा लक्षणीय प्रभाव आहे.
त्याच्या साहित्यसेवेचा गौरव १९४४ साली नोबेल पारितोषिक देऊन जागतिक पातळीवर करण्यात आला. कोपनहेगन येथे तो निधन पावला.
कळमकर, य. शं.