युक्रेन : रशियन संघराज्याच्या पंधरा प्रजासत्ताकांपैकी एक. पूर्ण नाव युक्रेनियन सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक. कृषिउद्योग व खाणकाम यांनी समृद्ध अशा आग्नेय रशियातील या प्रजासत्ताकाचे क्षेत्रफळ ६,०३,७०० चौ. किमी. असून लोकसंख्या ५,०८,४०,००० (१ जानेवारी १९८५) आहे. याच्या उत्तरेस बेलोरशियन प्रजासत्ताक, पूर्वेला रशियन एस्‌एफ्‌एस्‌आर, दक्षिणेला ॲझॉब्ह समुद्र, काळा समुद्र, मॉल्डेव्हिया प्रजासत्ताक व रूमानिया, तर पश्चिमेला हंगेरी, चेकोस्लोव्हाकिया व पोलंड हे देश येतात. ⇨कीव्ह (लोक. २४,४८,०००, १ जानेवारी १९८५) ही याची राजधानी. देशाचा केवळ २.७ टक्के भूप्रदेश व्यापलेल्या या राज्यात औद्योगिक व कृषिउत्पादन मात्र देशातील एकूण उत्पादनाच्या २० टक्क्यांहून अधिक व गहू उत्पादन २५ टक्के आहे.

भूवर्णन : हे राज्य काळ्या समुद्राच्या उत्तरेला असून त्यात विस्तृत सपाट मैदानी प्रदेश आढळतो. नैर्ऋत्येकडील कार्पेथियन पर्वतश्रेणी व दक्षिणेकडील काळा समुद्र एवढीच त्याची नैसर्गिक सीमा होय. नौवहनयोग्य नीपर नदी आपल्या अनेक उपनद्यांसहित मध्यवर्ती युक्रेनचे आर्थिक दृष्टींनी (उदा., जलवाहतूक, व्यापार, विद्युत्‌निर्मिती इ.) एकीकरण करते. ही नदी म्हणजे बाल्टिक किनारी देश, काळा समुद्र व भूमध्य समुद्र या दोहोंना जोडणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होय. नैर्ऋत्येकडील नीस्तर नदी हीदेखील नौवहनास उपयुक्त आहे. डॅन्यूब नदीमुखातून युक्रेनचा बाल्कन राष्ट्रे, ऑस्ट्रिया व जर्मनी या देशांशी व्यापार चालतो. सर्वसाधारणतः युक्रेनचे हवामान कोरडे असते.

भूविज्ञानीय उठाव पट्टे वायव्येकडून आग्नेयीकडे गेलेले असून त्यांमुळे विविधतापूर्ण भूरूपे निर्माण झालेली आहेत. या पट्ट्यांच्या आग्नेयीकडील चेर्निगॉव्ह−कीव्ह−व्हॉलिन्य−लाव्हॉव्ह हे क्षेत्र घनदाट जंगलांचे आहे. या प्रदेशांतील मध्ययुगीन कॅथीड्रल, अर्धभग्न किल्ले, चर्चयुक्त गढ्या म्हणजे युक्रेनियन संस्कृतीचे ऐतिहासिक स्रोतच होत. वरील पट्ट्याच्या दक्षिणेकडील विस्तीर्ण पश्चिम-पूर्व पट्ट्यांत (तेर्नोपोल−व्हिनित्सा−चिर्कासी ते पल्टाव्हा) तुरळक लाकूडवृक्षांचा मैदानी प्रदेश असून त्यात हिवाळी गहू, साखरबीट, सूर्यफुले, फळफळावळ, पालेभाज्या इ. उत्पादने होतात व पशुपालन व्यवसाय आढळतो. या पट्ट्याच्या खालच्या भागात शेवटचे हिमयुग कधीच अवतरले नाही त्यामुळेच या भागात तसेच दक्षिण व पूर्व युक्रेनमध्ये सर्वत्र दाट लोएस मृदेचा थर पसरल्याचे आढळते. या लोएसमुळे धान्यपिकांकरिता योग्य अशी समृद्ध काळी मृदा या राज्यात निर्माण झाली आहे. जागतिक गहू व साखर उत्पादनांपैकी अनुक्रमे ५% गहू व ८% साखर युक्रेनमध्ये उत्पादित केली जाते. यापैकी ५% निर्यात केली जाते.

काळ्या समुद्रालगतचा सखल भूमिप्रदेश (ईझ्माइईल−ओडेसा−कीरव्ह्‌ग्राट−झ्दानफ) व सींफ्यिरॉपल (क्रिमियामधील) म्हणजेच अतिशय सपाट भूप्रदेश-स्टेप प्रदेश−होय. या भागात गहू व मका यांचे प्रचंड पीक येते तथापि येथे वृक्षराजींचा अभाव असल्याने हा भाग वारंवार दुष्काळी व अवर्षणग्रस्त ठरतो. ओडेसा, खेरसॉन यांसारखी उबदार समुद्रबंदरे या भागात मोडत असून तेथून मध्यपूर्व, भूमध्य समुद्रीय यूरोप व अटलांटिक यांच्याशी व्यापार साध्य होते.

क्रिमियामध्ये असलेली अनेक किनारी शहरे म्हणजे विदेशी पर्यटकांची आकर्षणे होत. पश्चिमेकडील कार्पेथियन भागात अनेक गिरिस्थाने, विश्रांतिस्थाने व हॉटेले असून पर्यटकांना हिवाळी खेळांचे मोठे आकर्षण आहे. कार्पेथियन भाग हा नैसर्गिक वायू, खनिज तेल तसेच रासायनिक खनिजे यांनी समृद्ध असला, तरी युक्रेनमधील सर्वांत कमी प्रमाणात त्याचा आर्थिक विकास झालेला आहे.

खारकॉव्ह, नेप्रोपट्रॉफ्स्क आणि डोनेट्स ही पूर्वेकडील शहरे ज्या भागात येतात, तो भाग म्हणजे ग्रेटर डॉनबॅस किंवा डोनेट्स खोरे म्हणून ओळखला जातो. हा भाग म्हणजे राज्याचा औद्योगिक कणा किंवा औद्योगिक मर्मभूमी होय. हा स्टेप प्रदेश असला, तरी जगातील एकूण लोहधातुकाच्या साठ्यांपैकी १४%, २५% मँगॅनीज, कठीण व कोकिंग कोल तसेच रासायनिक साधनसामग्री आणि नैसर्गिक वायू व खनिज तेल यांचे विपुल साठे या प्रदेशात आहेत. राज्यातील हा सर्वाधिक लोकसंख्येचा तसेच मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेला प्रदेश आहे. त्यात लोखंड व पोलाद यंत्रसामग्री तसेच रासायनिक संयंत्रे यांचे अवाढव्य कारखाने असून मोठ्या कोळसाखाणी आहेत.

गद्रे, वि. रा.

इतिहास : ‘युक्रेन’ शब्दाचा अर्थ राजनगरीचा विभाग किंवा सीमावर्ती प्रदेश असा आहे. सोळाव्या शतकात युक्रेन हे नाव प्रचारात आले असले, तरी त्याचा उगम अकराव्या शतकातील आहे. सोळाव्या शतकापूर्वी ‘रस’ या नावाने−यातूनच ‘रशिया’ हा शब्द रूढ झाला−हा प्रदेश ओळखला जाई. ‘छोटा रशिया’ असा या प्रदेशाचा उल्लेख झारच्या सत्ताकाळात होऊ लागला. हा उल्लेख निंदाव्यंजक म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून त्याचा वापर थांबला.

इ. स. १२४० मध्ये मंगोलांनी कीव्ह राजनगरी उद्ध्वस्त केली. पुढे १३८७ मध्ये हा प्रदेश पोलिश सत्तेखाली आला. १३९२ मध्ये लिथ्युएनियाच्या सरदाराने युक्रेन ताब्यात घेतले. १५६९ मध्ये लिथ्युएनिया आणि पोलंड यांचे एकीकरण झाले आणि हा भाग पोलिश सत्तेखाली आला. पोलिश राजे आणि सरदारांनी युक्रेनमधील जमिनी बळकावल्या व शेतकऱ्यांवर दास्य लादले. नीपर नदीच्या सखल खोऱ्यात त्यामुळे अनेक युक्रेनियन पळून गेले. त्यांनाच पुढे कझाक हे नाव पडले. त्यांनी सीमावर्ती भागात स्वतंत्र सैनिकी यंत्रणा उभी केली आणि शासकीय व सैनिकी अधिकाऱ्यांची लोकशाही मार्गाने निवड करण्याची प्रथा रूढ केली. ‘सिक’ हे त्यांच्या लोकप्रतिनिधिगृहाचे नाव होय.

सिकने पोलिश राजांचे सार्वभौमत्व मान्य केले. पुढे सतराव्या शतकात जेझुइट मिशनऱ्यांनी येथे कॅथलिक धर्मप्रसाराची सक्ती करण्याचा प्रयत्न केला व त्यातून १६४८ चे कझाकांचे बंड निर्माण झाले. पोलिश सत्ताधाऱ्यांशी बंडखोरांनी अनेक यशस्वी लढे दिले व अखेर बॉदॅम ख्मेलनीट्स्की याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र कझाक राज्याची स्थापना करण्यात आली. निमलष्करी प्रजासत्ताक असे या राज्याचे स्वरूप होते व त्याचा प्रमुख लोकनियुक्त असे. राज्यात विधनसभाही होती. तथापि पोलंडच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी कझाक राज्यकर्त्यांनी झारची मदत मागितली व त्याच्याशी एक तह करण्यात आला. युक्रेनमधील नगरांतून रशियन सैन्य ठेवण्यात आले. ख्मेलनीट्स्कीच्या निधनानंतर झारने तहातील स्वायत्ततेच्या अटी नामंजूर केल्या व प्रत्येक नव्या शासनप्रमुखाच्या निवडणुकीच्या वेळी तहनाम्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दुबळ्या उमेदवारांना एकमेकांविरुद्ध प्रवृत्त करून आणि भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबून झारने हळूहळू युक्रेनचे राज्य गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. कझाक प्रमुखांनी रशियापासून स्वतंत्र होण्याचे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. शेवटी १७६४ मध्ये कझाक शासनप्रमुखाचे पद रद्द करण्यात आले व १७७५ मध्ये कझाक सिक म्हणजे विधानसभेची वास्तू रशियन सैन्याने जमीनदोस्त केली.


रशियन राज्यक्रांतीपर्यंत (१९१७) छोटा रशिया म्हणून युक्रेनचे प्रांतिक स्थान टिकून होते. तत्पूर्वीची सु. दोन शतके युक्रेन समाज आणि संस्कृती यांचे रशियनीकरण करण्याचा प्रयत्न झारने केला होता. १९ व्या शतकाच्या मध्यास अनेक भूमिगत संघटना युक्रेनियन लोकांनी स्थापन केल्या. अनेकांना सायबीरियात हद्दपारी भोगावी लागली. १८९० मध्ये युक्रेनमध्ये प्रथमच राजकीय पक्ष व संघटना उभारण्यात आल्या. रशियन राज्यक्रांतीनंतर कीव्ह नगरात मध्यवर्ती विधानसभेने (‘राडा’) युक्रेनियन लोकांच्या प्रजासत्ताकाची घोषणा केली आणि रशियन संघराज्यास मान्यता दिली. लेनिनने युक्रेनचे सार्वभौमत्व मान्य केले मात्र कम्युनिस्टांना तेथे सत्ता बळकविण्यास सुचविले. परिणामतः १९१८ सालीच युक्रेनने संपूर्ण स्वातंत्र्यी घोषणा केली. त्यानंतरची तीन वर्षे युक्रेनचा स्वतंत्रतेचा लढा चालू होता. १९२३ साली कम्युनिस्टांच्या वर्चस्वाखाली युक्रेनच्या सोव्हिएट काँग्रेसमध्ये सोव्हिएट संघराज्यात समाविष्ट होण्याचा निर्णय घेण्यात आला. लेनिनने युक्रेनियन भाषा, साहित्य आणि संस्कृती यांची वैशिष्ट्ये मान्य करून त्यांना प्रादेशिक शासनयंत्रणेत, शिक्षणात किंवा इतर व्यवहारात प्राधान्य देण्याचे मान्य केले. स्टालिनची राजवट मात्र युक्रेनच्या इतिहासात अत्यंत भयावह व जुलमी ठरली. १९३२-३३ साली युक्रेनमध्ये तीव्र दुष्काळ पडून त्यात सु. ३० लक्ष लोक मरण पावले. लेनिनने थांबविलेली रशियनीकरणाची मोहीम स्टालिनने पुन्हा सुरू केली. युक्रेनियन विरोधकांच्या बाबतीत अटक, हद्दपारी आणि मृत्युदंड यांचा अवलंब केल्याने स्टालिनची राजवट ही अत्यंत दहशतीची ठरली. दुसऱ्या महायुद्धकाळात अनेक युक्रेनियन लोकांनी जर्मनांची बाजू घेतली, तथापि नाझी जर्मनीने त्यांचा अपेक्षाभंग केला. गनिमी युद्धतंत्राचा अवलंब करून युक्रेनियन लोकांनी जर्मनी आणि रशिया या दोहोंचा प्रतिकार केला. रशियाशी हा लढा १९५२ पर्यंत चालू होता. १९५४ नंतर मात्र रशियातील काही उच्च सत्तास्थानांवर युक्रेनियन व्यक्तींची नेमणूक करण्यात येऊ लागली आहे.

सोव्हिएट संघराज्य आणि पूर्व यूरोपीय देश यांना अन्नधान्य आणि इतर औद्योगिक साहित्य पुरवणारे युक्रेनचे प्रजासत्ताक देशाच्या अंतर्गत राजकारणातही महत्त्वाचे आहे. राज्यातील कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव मॉस्को आणि लेनिनग्राड यांच्याखालोखाल महत्त्वाचा मानला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापक − सदस्यांपैकी युक्रेन हे एक आहे. या राज्याला सोव्हिएट संघराज्यातून बाहेर पडण्याचा, स्वतःचे सैनिकी दल उभारण्याचा आणि परदेशांशी राजकीय संबंध जोडण्याचा संविधानात्मक अधिकार आहे. तथापि फक्त संयुक्त राष्ट्रांपुरतेच युक्रेनचे स्वतंत्र परराष्ट्रीय संबंध मर्यादित आहेत. म्हणजे ते संयुक्त राष्ट्रांचे एक सदस्य राष्ट्र म्हणून अजूनही आहे.

जाधव, रा. ग.

आर्थिक स्थिती : युक्रेनची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. १९२९ पासून मध्य रशिया, उरल, सायबीरिया, कझाकस्तान इ. प्रांतांच्या अर्थव्यवस्थांचा विकास युक्रेनमधील भांडवल व श्रम यांच्या साहाय्याने करीत राहण्याचे रशियन शासनाचे धोरण असल्याचे आढळते. आर्थिक दृष्ट्या युक्रेनचे महत्त्व पूर्वीसारखे राहिले असल्याचे दिसत नाही.

शेती : युक्रेनमध्ये रशियामधील काही सर्वोत्कृष्ट सुपीक जमिनी आढळतात. शेतमालामध्ये गहू, बकव्हीट, बीट, सूर्यफूल, कापूस, फ्लॅक्स, तंबाखू, सोयाबीन, हॉप, कॉक-सागीझ हे रबरझाड, फळफळावळ, भाजीपाला इत्यादींचा समावेश होतो. १९८२ साली एकूण रशियन शेतमाल व पशुधनजन्य पदार्थ यांच्या उत्पादनांपैकी अनुक्रमे २३% शेतमाल व २१% पशुधनजन्य पदार्थ यांचे युक्रेनमध्ये उत्पादन झाले. राज्यातील पिकांखालील क्षेत्र १९१३, १९३९ व १९८३ मध्ये अनुक्रमे २७९ लक्ष, २७० लक्ष व ३३३ लक्ष हे. होते. १९८२ मधील प्रमुख कृषिउत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे लक्ष मे. टनांत) : साखरबीट ४२३ सूर्यफूलबी २५, बटाटे २०१ मांस व चरबी ३५ दूध २०६ लोकर २७,००० मे. टन धान्य ५०६ अंडी १,५५,६१०. पशुधन १९८३ च्या आरंभी पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत) : गुरे २५५ डुकरे २०८ मेंढ्या-बकरे ८९·१. जाने. १९८३ रोजी राज्यात २,१६२ सरकारी शेते, तर ७,१५७ सामुदायिक (सामूहिक) शेते होती. राज्यात ४,२०,९०० ट्रॅक्टर व ९८,१०० कंबाइन हार्वेस्टर ही कृषियंत्रे होती (१९८३).

दुसऱ्या महायुद्धामध्ये हे प्रजासत्ताक जर्मन सेनेच्या अंमलाखाली असल्याने तेथील शेती जवळजवळ नष्टप्रायच झाली होती, तरी १९५५ च्यासुमारास तिचे पुनरुज्जीवन करण्यात आले. सांप्रत युक्रेनमध्ये देशातील एकूण शेतमाल उत्पादनाच्या २०% हून अधिक शेतमाल उत्पादन होत असून त्यातही धान्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रजासत्ताकातील ८०% शेतमालात धान्य, बटाटे, पालेभाज्या, चारावैरण, फळफळावळ आणि द्राक्षे यांचा अंतर्भाव होत असून लेसोस्टेप प्रदेशात पिकविले जाणारे साखरबीट हे प्रमुख नगदी पीक समजले जाते. सूर्यफूल बिया हे प्रमुख तेलपीक आहे. वायव्य भागात फ्लॅक्स मोठ्या प्रमाणात पिकविले जाते. उत्तर व मध्य भागांत बटाट्यांचे पीक, तर दक्षिण स्टेप प्रदेशात, विशेषतः जलसिंचन उपलब्ध असलेल्या भागात, पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर पिकविण्यात येतात. ट्रकशेती किंवा व्यापारी बगीचा शेती (मार्केट गार्डनिंग) ही डोनेट्स खोऱ्यामध्ये, नीपर नदीकाठच्या प्रदेशातून आणि कीव्ह, खारकॉव्ह, लाव्हॉव्ह यांसारख्या शहरांच्या सरहद्द-प्रदेशांत केली जाते. फळफळावळ सबंध युक्रेनमध्ये होत असते, तथापि क्रिमिया, ट्रान्सकार्पेथिया, सिस्‌कार्पेथिया आणि लेसोस्टेप या विभागांत विविध फळांचे उत्पादन विशेष प्रमाणात केले जाते.

सबंध युक्रेनमध्ये मांसाची व दुधदुभत्याची गाईगुरे, डुकरे, मेंढ्या, बकरे पाळण्यात येतात. लेसोस्टेप व पॉलिसीआ या ठिकाणी मधमाशा पाळतात तर ट्रान्सकार्पेथियामध्ये रेशीमकिड्यांची जोपासना केली जाते. प्रजासत्ताकात सु. ८,००० सामूहिक शेते व १,७०० सरकारी शेते होती (१९८३). त्यांमधून यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते.

मासेमारी : काळ्या समुद्राला मिळणाऱ्या नदीमुख खाड्यांतून मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालत असून ॲझॉव्ह समुद्र, नद्या, सरोवरे, डबकी, जलाशय इत्यादींमधूनही मासे पकडण्यात येतात. नीपर, डॅन्यूब, नीस्तर, यूझ्‌नी बूक व डोनेट्स या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते.

उद्योग : युक्रेनमधील लोहधातुउद्योग फार मोठा असून देशातील बीड, पोलाद व वेल्लित पोलाद आणि पोलादी नळ्या (नळ) यांच्या एकूण उत्पादनांपैकी मोठा वाटा युक्रेनचा आहे. (बीड उत्पादन : ४६४ लक्ष टन−१९७५ पोलाद ५३७ लक्ष टन−१९८२). खनिज उत्पादनात कोळसा, नैसर्गिक वायू, लोहखनिजाचे राष्ट्रीय दृष्टीने मोठे महत्त्व आहे.

निर्मितीउत्पादनामध्ये धातुविज्ञानविषयक उपकरणे व साधने, डीझेल चलित्रे, ट्रॅक्टर, दूरचित्रवाणी संच इत्यादींचा समावेश होतो. रसायनोद्योगांद्वारे कोक, खनिजीय खते, गंधकाम्ल इ. पदार्थांचे उत्पादन केले जाते. उत्पादकता व मिळणारे महसुली उत्पन्न या दोहोंचा विचार करता, राज्यातील अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य ठरते. रेल्वे वाघिणी व रेल्वेएंजिने, जहाजे, जलविद्युत्‌, औष्णिक व वायू टरबाइने, विद्युत्‌जनित्रे, मोटारगाड्या इ. मोठ्या व अवजड वस्तूंची निर्मिती कारखान्यांतून केली जाते. बांधकामसामग्री व वाहतूकसामग्री यांचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. विमानांच्या निर्मितीचे युक्रेन हे महत्त्वाचे केंद्र आहे. अन्नप्रक्रिया व इतर उपभोक्ता उद्योगांच्याकरिता लागणाऱ्या साधनसामग्रीनिर्मितीचे कारखाने राज्यात सर्वत्र विखुरलेले आहेत. या राज्यात कृषिसाहित्य व यंत्रे यांचे विविधांगी उत्पादन करणारे पन्नासांहून अधिक कारखाने असून खारकॉव्ह, ओडेसा, लाव्हॉव्ह, खेरसॉन ही त्यांपैकी अतिमहत्त्वाची निर्मितीकेंद्रे होत. यांत्रिक हत्यारे व उपकरणे यांचे निर्मितीउद्योगही विकास पावत आहेत. कॅमेरे, दूरचित्रवाणी संच, प्रशीतक, धुलाई यंत्रे यांसारख्या उपभोग्य वस्तूंची निर्मिती वाढत्या प्रमाणावर केली जात आहे.


युक्रेनमधील रसायनोद्योगाला लागणाऱ्या उपकरणांचा निर्मितिउद्योग प्रामुख्याने कीव्ह, सूमी, फास्टक, क्युरस्ट्येन या शहरांत एकवटला असून देशातील सु. ३३% उत्पादन या राज्यात होते. रसायनोद्योगात कोक व कोकचे पदार्थ, गंधकाम्ल, संश्लिष्ट तंतू, कॉस्टिक सोडा, पेट्रोरसायने, छायाचित्रण रसायने, कीटकनाशके इत्यादींचा समावेश होतो. युक्रेनियन खाद्यप्रक्रिया विभाग, साखर परिष्करण, मांस, फळे व दुग्धपदार्थ यांच्यावर प्रक्रिया, मद्यनिर्मिती व आसवनी उद्योग हे एकूण रशियन अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरतात. देशातील एकूण मद्यनिर्मितीपैकी ३०% मद्यनिर्मिती एकट्या युक्रेनमध्ये होते. यांशिवाय वस्त्रे, कापड, पादत्राणे यांसारख्या उपभोग्य वस्तूंचेही उत्पादन करण्यात येते.

बहुतेक विद्युत्‌उत्पादन औष्णिक विद्युत्‌केंद्रांपासूनच उपलब्ध होत असून अशी लहानलहान निर्मितीकेंद्रे राज्यभर विखुरलेली आहेत. सर्वांत मोठी केंद्रे डोनेट्स खोऱ्यात व नीपर नदीकाठावर आढळतात. तिसरे औष्णिक वीजनिर्मितीकेंद्र लाव्हॉव्ह-व्हलिन्य कोळसा खोऱ्यात असून सिस्‌कार्पेथियन प्रदेशात सहा जलविद्यत्‌निर्मितीकेंद्रे आहेत.

वाहतूक : सर्वाधिक लोहमार्गांचे जाळे डोनेट्सचे खोरे व नीपर नदीकाठावरील प्रदेश यांत असून मोठी लोहमार्ग केंद्रे खारकॉव्ह, कीव्ह, नेप्रोपट्रॉफ्स्क, यसीनव्हाताया, कोव्हेल, कूप्यांस्क ही आहेत. ओडेसा, इल्यिचेफ्स्क, न्यिकलायेफ, खेरसॉन, फीओडोशिया, केर्च, झ्दानफ यांसारख्या युक्रेनमधील बंदरांतून रशियाचा २०% सागरी व्यापार चालतो. नीपर आणि तिच्या प्रिपेट व घिस्ना या उपनद्या, यूझ्‌नी बूक, डॅन्यूब या नद्यांमधून इतर यूरोपीय देशांशी चालणारा व्यापारही महत्त्वाचा आहे. नीपर नदीवरील कीव्ह, नेप्रोपट्रॉफ्स्क, झापरॉझे, खेरसॉन ही मोठी बंदरे होत. युक्रेनमधील चांगल्या रस्त्यांच्या जाळ्यांमुळे रशियातील अन्य प्रदेश व विभाग तसेच औद्योगिक केंद्रे युक्रेन राज्याला जोडलेली आहेत.

गद्रे, वि. रा.

लोक व समाजजीवन : युक्रेनियन लोक हे मूळ स्लाव्ह वंशाचे. युक्रेनच्या प्रदेशात स्लाव्हवंशीय लोक इ. स. पू. दुसऱ्या वा तिसऱ्या सहस्रकात आले असावेत. अमेरिका, कॅनडा, पूर्व यूरोपीय देश, लॅटिन अमेरिका, दक्षिण अमेरिका या ठिकाणी युक्रेनियन लोक स्थायिक झालेले आढळतात. राज्यातील सु. ७४·९% लोक वांशिक दृष्ट्या युक्रेनियन, १९·४% रशियन, १·६% ज्यू, ०·१% बेलोरशियन, ०·६% मॉल्डेव्हियन व तेवढेच पोल आणि २·१% इतर आहेत. युक्रेनियन लोक युक्रेनियन भाषा व इतर बहुतेक सर्व लोक रशियन भाषा बोलतात. बिगर-युक्रेनियनांची लोकवस्ती प्रामुख्याने शहरांतून आढळते. राज्यातील बहुसंख्य लोक (सु.८५%) ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन, १०% कॅथलिक, ३% प्रॉटेस्टंट (मुख्यतः बॅप्टिस्ट) व २% ज्यू आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर राज्यात फक्त रशियन ऑर्थोडॉक्स चर्चलाच शासकीय संमती होती. युक्रेनियन कॅथलिक आणि इतर स्वायत्त चर्च यांवर कायदेशीर बंदी घालण्यात आली.

सुंदर भरतकाम केलेली वस्त्रप्रावरणे, हे युक्रेनियन लोकांचे परंपरागत वैशिष्ट्य होय. गायनाचीही या लोकांना विशेष आवड असून समूहगायन लोकप्रिय आहे. विविधता हे युक्रेनियन लोकगीतांचे खास वैशिष्ट्य होय. त्यांची लोकनृत्येही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. चित्रजवनिका, मृत्पात्री, काष्ठशिल्प ही युक्रेनियन लोककलेची खास क्षेत्रे आहेत. मौखिक परंपरेने चालत आलेले लोकसाहित्यही युक्रेनियन संस्कृतीचा मौलिक ठेवा होय. ग्रामीण परिसरातूनही या पारंपारिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.

जाधव, रा. ग.

भाषा व साहित्य : इ. स. ११ व्या ते १६ व्या शतकांपर्यंत लिखित युक्रेनियन वाङ्मय हे चर्च स्लाव्होनिक भाषेत व धार्मिक स्वरूपाचे आहे. पुढील शतकात युक्रेनियन-चर्च स्लाव्होनिक अशा संमिश्र भाषेत लौकिक स्वरूपाचे काव्य, नाटक आणि गद्यसाहित्य निर्माण झाले.

अठराव्या शतकात युक्रेनियन ही युक्रेनची साहित्यभाषा बनली. ह्याचे श्रेय इव्हान कोटल्यारेव्हस्की (१७६९−१८३८) ह्याच्याकडे जाते. रोमन महाकवी व्हर्जिल ह्याच्या ईनिड ह्या महाकाव्याचे विडंबन त्याने युक्रेनियन भाषेत केले. दोन संगीतप्रधान सुखात्मिकाही त्याने ह्या भाषेत लिहिल्या. सु. १८३० पर्यंतचे युक्रेनियन साहित्य अभिजाततावादी वळणाचे होते. त्यानंतरची सु. ३० वर्षे ही स्वच्छंदतावादाच्या प्रभावाची होत. तारास शेव्हचेंको (१८१४−१८६१) हा सर्वश्रेष्ठ युक्रेनियन कवी ह्याच कालखंडातला. Kobzar (१८४०) हा त्याचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. शेव्हचेंकोचे साहित्य जगातील विविध भाषांत अनुवादिले गेले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युक्रेनियन साहित्यात वास्तववादाचे पर्व सुरू झाले. पी. कुलिश, बी. ऱ्हीनचेंको हे ह्या कालखंडातील विशेष उल्लेखनीय कादंबरीकार, तर इव्हान फ्रँको (१८५७−१९१७) हा श्रेष्ठ कवी. फ्रँकोने उत्तम कथा−कादंबरीलेखनही केले. त्यावर निसर्गवादाचा प्रभाव दिसून येतो. व्लादिमीर व्हीनीचेंको, मिखाइलो कॉट्स्यूबिन्स्की ह्यांसारख्या साहित्यिकांनी १९०० ते १९२० पर्यंतच्या काळात निर्देशनीय साहित्यनिर्मिती केली. व्हीनीचेंकोच्या कथांमधून सखोल संघर्षांचे तसेच युक्रेनियन साहित्यात पूर्वी क्वचितच व्यक्त झालेल्या जीवनपैलूंचे प्रभावी दर्शन घडते. Fata Morgana (१९०३−१०) ही कॉट्स्यूबिन्स्कीची कादंबरी श्रेष्ठ युक्रेनियन साहित्यकृतींत अंतर्भूत केली जाते. १९०५ साली झालेली क्रांती, तिचे ग्रामीण जीवनावर झालेले परिणाम, कृषकांचा उठाव व त्यात त्यांना आलेले अपयश ह्यांचे प्रत्ययकारी चित्रण ह्या कादंबरीत आहे. कॉट्स्यूबिन्स्कीने आपल्या लेखनात नव्या नव्या तंत्रांचा वापर केला. व्हासिल स्टेफानिक हा कथाकार. दारिद्र्य व अज्ञान ह्यांनी आवळलेले कृषकांचे जीवन त्याच्या कथांतून सशब्द झाले आहे. प्रतीकवाद आणि नव-अभिजाततावाद ह्यांचा प्रभाव १९२३ नंतरच्या युक्रेनियन कवितेवर जाणवतो. पावलो टिचिना, एम्‌. झेरॉव्ह आणि माक्सिम रिल्स्की ह्या कवींची कविता ह्या संदर्भात लक्षणीय आहे. १९३४ नंतरच्या काळात समाजवादी वास्तववादाचा पुरस्कार साहित्यात केला जाऊ लागला. त्यातून युक्रेनियन साहित्याला आलेला साचेबंदपणा १९६० नंतर नाहीसा होऊ लागला.

कुलकर्णी, अ. र.

कला : मध्ययुगीन आयकॉन आणि भित्तिलेपचित्रे या युक्रेनियन कलाविष्कारांत बायझंटिन व स्थानिक कलाविशेषांचे संमिश्रण आढळते. चित्रकलेची परंपरा अखंडपणे टिकून राहिल्याचे दिसते. अलेक्झांडर आर्चिपेंको हा जगप्रसिद्ध युक्रेनियन शिल्पकार. १९२४ मध्ये तो अमेरिकेत गेला. स्टॅलिनच्या राजवटीत के. ट्रॉखिमेन्‌को हा समाजवादी वास्तववादाचा पुरस्कर्ता चित्रकार उल्लेखनीय आहे. युक्रेनियन वास्तुकलेची परंपराही जुनी आहे. कीव्ह येथील अकराव्या शतकातील सेंट सोफिया कॅथीड्रल उल्लेखनीय आहे. सोळाव्या ते अठराव्या शतकांत बरोक वास्तुशैलीचा प्रत्यय येथील चर्चरचनेतून विशेषत्वाने दिसून येतो. १९३० मध्ये बऱ्याच जुन्या धार्मिक वास्तूंची मोडतोड करण्यात आली. वास्तु-अलंकरण हे युक्रेनियन वैशिष्ट्य विद्यमान शतकातही दिसून येते. ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रांतही काही श्रेष्ठ युक्रेनियन शास्त्रज्ञांचा उल्लेख आवश्यक ठरतो. उदा., ओ. पॅलादीन (जीवरसायनशास्त्र), एम्‌. तुगन बॅरानोव्हस्की (अर्थशास्त्र), एम्‌. क्रॅव्ह्‌च्यू (बीजगणित), एस्‌. कोरोलिओव्ह (अवकाशयाने व अग्निबाण) व बोगोमोलेट्झ (वैद्यक).

जाधव, रा. ग.

संदर्भ : 1. Bilinsky, Yaroslar, The Second Soviet Republic: The Ukraine after World War II, New Brunswick, 1964.

   2. Kostiuk, Hryhory, Stahinist Rule in the Ukraine, New York, 1960.

   3. Reshetar, John, S. The Ukrainian Revolution, 1917-1920 : A Study in Nationalism, Princeton, 1952.

           4. Sullivant, Robert S. Soviet Politics and the Ukraine, 1917-1957, New York, 1962.