युकाधीर : सायबीरियातील टंड्रा या विषम हवामानातील प्रदेशात राहणारी एक आदिम जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने लीना नदीच्या पूर्वेस असलेल्या कोलीमा नदीच्या वरच्या खोऱ्यात आढळते. त्यांची लोकसंख्या ८०० (१९७९) होती व ती हळूहळू घटत आहे. इव्हेंक, याकुत व शेजारच्या रशियन लोकांच्या संपर्कामुळे त्यांची मूळ संस्कृती लोप पावली आहे. पशुपालन हा त्यांचा प्रमुख धंदा असून ते प्रामुख्याने रेनडियर या पशूवर आपली उपजीविका करतात. साहजिकच चारा-पाण्याच्या शोधार्थ त्यांना नेहमी भटकावे लागते तथापि त्यांचे भटकण्याचे क्षेत्र मर्यादित व विवक्षित असते. याशिवाय मच्छीमारी व शिकार हे जोडधंदेही त्यांच्यात आहेत. हिवाळ्यात ते कातड्याचे तंबू बांधून राहतात. त्यांची घरगुती उपकरणे हाडांची बनविलेली असतात. ते पूर्वी भूर्जपत्रावर काढलेल्या चित्रांची लिपी लेखनासाठी वापरीत आणि युकाधीर बोली बोलत असत, पण या दोन्ही गोष्टी हळूहळू नष्ट होत आहेत. युकाधीर बोलीला ओडूल हे प्रादेशिक नाव होते. त्यांच्या अनेक कुळी होत्या आणि प्रत्येक कुळीचा एक वडिलधारा माणूस मार्गदर्शक असे. धार्मिक बाबतींत शामान ही व्यक्ती सर्व विधी करीत असे. त्यांच्यात सेवाविवाह पद्धती रूढ असून वधूमूल्याऐवजी सेवा करून वधू मिळविण्याची पद्धत प्रचारात आहे. विवाहित पुरुष पत्नीच्या घरी तिच्या कुटुंबात राहतो आणि त्या कुटुंबासाठी काम करतो. युकाधीरांमध्ये सुनेने आपल्या सासऱ्याकडे किंवा जावयाने आपल्या सासूकडे तोंड वर करून केव्हाही पाहता कामा नये, असा दंडक आहे. युकाधीर हे जडप्राणवादी असून त्यांचा भुताखेतांसारख्या अतिमानुषी शक्तींवर विश्वास आहे. शिकारीत यश मिळावे म्हणून ते काही प्राण्यांची आराधना करतात.
देशपांडे, सु. र.