यावाता : याहाता. जपानच्या फुकुओका प्रांतातील कीटा–क्यूशू या शहराचे औद्योगिक उपनगर.
जपान सरकारने औद्योगिक व लष्करी अशा दोन्ही दृष्टींनी देशाला समर्थ व बलवान करण्यासाठी १८९६ मध्ये यावाता येथे देशातील सर्वांत मोठा पोलाद कारखाना उभारला. या कारखान्यामधून उत्पादन १९०१ सालापासून सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धात शस्त्रास्त्रे व रेल्वेसामग्री यांच्या उत्पादनावर विशेषत्वाने भर देऊन जपानच्या वाढत्या युद्धविषयक गरजांची परिपूर्ती करण्यात या कारखान्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. १९३४ मध्ये यावाता कारखाना व इतर पाच खाजगी कंपन्या यांचे विलीनीकरण करण्यात येऊन ‘निप्पॉन स्टील कंपनी’ अशी एक नवीनच कंपनी स्थापण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर (१९५० मध्ये) दोस्त राष्ट्रांद्वारे या कंपनीचे पुन्हा ‘यावाता स्टील कंपनी’ व ‘फूजी स्टील कंपनी’ अशा दोन कंपन्यांत विभाजन करण्यात आले. १९७० मध्ये पुनश्च या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात येऊन ‘निप्पॉन स्टील कॉर्पोरेशन’ हा प्रचंड निगम स्थापण्यात आला.
लोखंड व पोलाद उद्योगाशिवाय यावातामध्ये रसायने, सिमेंट, काच इत्यादींचे निर्मितीउद्योग आहेत.
गद्रे, वि. रा.