यारदांग : वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने दिसून येणारा, अरुंद व उभे काठ तसेच तीव्र उताराचा माथा असलेला स्तंभासारखा वातज भूविशेष. तुर्की भाषेत ‘यार’ म्हणजे ‘उभा कडा’ यावरून ही संज्ञा रूढ झाली. मुख्यत्वे कठीण डोलोमाइट व त्याच्याशी संलग्न मृदू वालुकाश्म यांनी बनलेल्या विस्तृत भूप्रदेशात हा भूविशेष तयार होतो. सतत मंदगतीने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या भूप्रदेशातील वालुकाश्माची लवकर झीज होऊन कठीण खडकाचे स्तंभ शिल्लक राहतात. हे स्तंभ निमुळत्या माथ्याचे, अनियमित आकाराचे व उथळ अशा खोबणीने एकमेकांपासून वेगळे केलेले असतात. वाटवंटी प्रदेशात यांच्या रांगा वाऱ्याच्या दिशेने लहानमोठ्या परंतु एकमेकींस समांतर असतात तर स्तंभांदरम्यानच्या खोबणी नावेच्या आकाराच्या दिसतात.
हे भूविशेष साधारणपणे ६ मी. उंचीचे व ९ ते ३७ मी. लांबीचे आढळतात, तर त्यांच्या रांगा अनेक मीटर लांबीच्या असू शकतात. तुर्कस्तान, मोहाव्ही वाळवंट (कॅलिफोर्निया), तिबेत्सी (मध्य सहारा), लक्सॉर (ईजिप्त), लूत (इराण), लॉपनॉर (तिबेट) या भागांतील यारदांग विशेष उल्लेखनीय आहेत. स्व्हेन हेडीन (१८६५–१९५२) या स्वीडिश भूगोलवेत्त्याने मध्य आशियातील वाळवंटी प्रदेशाचे समन्वेषण करून या भूविशेषांचे प्रथम वर्णन केले आहे.
क्षीरसागर, सुधा