यामागुची : जपानच्या यामागुची प्रांताच्या राजधानीचे शहर आणि राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र. लोकसंख्या १,१४,७४४ (१९८०). ते होन्शू बेटावर अतिनैऋत्येकडील भागात असून शिमोनोसेकीच्या ईशान्येस लोकमार्गाने ५६ किमी. अंतरावर फूशिनो नदीतीरावर वसले आहे.
चौदाव्या शतकापासून आउची घराण्याचे सत्ताकेंद्र असलेल्या या गावात, आउची घराण्याचा विदेश व्यापाराशी मोठ्या प्रमाणात संबंध असल्याने पश्चिमी प्रभाव फार लवकर दिसून आला. तत्कालीन राजधानी असलेल्या क्योटो शहरात राहणाऱ्या अनेक विद्वानांनी व सरदार-दरकदारांनी क्योटोच्या गैरप्रशासनास कंटाळून यामागुची येथील आउची घरण्याचा आश्रय घेतला. आउची सरंजामदारांच्या कारकीर्दीमध्ये (चौदावे ते सोळावे शतक) सांस्कृतिक व व्यापारी केंद्र म्हणून यामागुचीची मोठ्या प्रमाणात भरभराट होत गेली. १५५१ मध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हिअर (१५०६ – ५२) हा स्पॅनिश जेझुइट मिशनरी ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ येथे येऊन त्याने एक मिशन उभारले व अनेकजणांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. सतराव्या शतकात मिशनची इमारत नष्ट झाली. १५३२ पासून आउची घराण्याचा प्रभाव कमीकमी होत गेला, १५५७ मध्ये आउची घराण्याची जागा मोरी घराण्याने घेतली मात्र त्या घराण्याने आपले सत्तांकेंद्र यामागुचीऐवजी हागी (जपानच्या समुद्रावरील बंदर) हे निवडले. परिणामी यामागुचीचे वैभव व प्रभाव कमी झाला. तथापि १८६३ मध्ये मोरी घराणे पुन्हा यामागुचीमध्ये आले व तेथील किल्ला त्याने ताब्यात घेतला. हा किल्ला या घराण्याकडे मेजी राजवट येईपर्यंत (१८६८) होता. तोकुगावा शोगुनविरोधी कारवायांचे केंद्र यामागुची हेच होते. १९२९ मध्ये यामागुचीला शहराचा दर्जा मिळाला.
तांदूळ हे यामागुचीचे प्रमुख कृषिउत्पादन असून काही दुग्धशाळा व पेयनिर्मितीचे कारखाने वगळता, शहरात आधुनिक उद्योगधंदे पसरल्याचे दिसून येत नाही.
झेव्हिअरच्या मिशनरी कार्याचे प्रतीक म्हणून त्याच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले सेंट फ्रान्सिस झेव्हिअर मेमॉरिअल कॅथीड्रल (स्था. १९५०), मेजी पुनरुज्जीवनाच्या संघर्षकाळात भाग घेतलेल्या मोरी घराण्यातील विख्यात व्यक्तींची ब्राँझशिल्पे असलेले कामेयामा उद्यान, जोइजी मंदिरउद्यान, यासाका मंदिर प्रांगणात प्रतिवर्षी जुलै महिन्यात भरविण्यात येणारा गिआँ उत्सव, शहराच्या नैर्ऋत्य भागातील औषधी पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले ‘यूडा उन्हाळे’ इ. पर्यटकांची आकर्षणे होत.
गद्रे, वि. रा.