याकोबी , हेर्मान : (१८५०–१९३७). जर्मन प्राच्यविद्याविशारद. गणिताच्या अभ्यासासाठी त्याने बार्लिन विद्यापीठात प्रवेश घेतला (१८६८) परंतु संस्कृत आणि भाषाशास्त्राच्या अभ्यासाकडे तो आकृष्ट झाला १८७२ मध्ये बॉन विद्यापीठाची पीएच. डी. संपादन केल्यानंतर त्याने लंडनमध्ये काही काळ अध्ययन केले आणि भारताचा प्रवास केला. १८७५ मध्ये बॉन विद्यापीठात त्याला अध्यापकाची जागा मिळाली. १८७९ मध्ये म्यून्स्टर विद्यापीठात आणि १८८५ मध्ये कील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. पुढे १८८९ पासून निवृत्त होईपर्यंत बॉन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्याने काम केले. निवृत्तीनंतरही त्याचा निवास तेथेच होता.
प्राचीन भारतीय विद्येच्या बहुतेक सर्व क्षेत्रांत याकोबीने मूलगामी संशोधन केले. संस्कृत साहित्यशास्त्राचा अभ्यास त्याने केला. बौद्ध वाङ्मयातील आयारंग सुत्त या ग्रंथाचे त्याने संपादन केले. जैन वाङ्मयाचा आणि तत्त्वज्ञानाचा त्याचा विशेष अभ्यास होता. उमास्वातीच्या तत्वार्थाधिगमसूत्राचे जर्मन भाषांतर त्याने प्रसिद्ध केले. अपभ्रंश वाङ्मयाचाही त्याने अभ्यास केला. समराइच्चकहा या जैन माहाराष्ट्री प्राकृत भाषेतील ग्रंथाची आवृत्ती प्रसिद्ध करुन त्याने प्राकृत भाषाशास्त्राचा पाया घातला. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचाही सखोल अभ्यास त्याने केला. षड्दर्शनांचा ऐतिहासिक आनि तात्त्विक दृष्टिकोणातून सूक्ष्म अभ्यास त्याने केला होता. ‘युबर डास ऊरस्प्रुगलिश योग-सिस्टिम’ हा त्याचा १९२९ मध्ये प्रकाशित झालेला निबंध त्याच्या उच्च संशोधनक्षमतेची साक्ष देतो. त्याने आरंभी गणित आणि ज्योतिष या विषयांचा अभ्यास केला होता. त्याचा उपयोग करुन वेदांतील ज्योतिषविषयक संदर्भावरुन ऋग्वेदातील सूक्तरचनेचा कालनिर्णय त्याने केला. लोकमान्य टिळक़ांनी त्यांच्या ओरायन या इग्रंजी ग्रंथात केलेला वेदकालनिर्णय आणि याकोबीचे एतद्विषयक संशोधन हे एकाच वेळी एकाच दृष्टिकोणातून परंतु अगदी स्वतंत्र रीतीने केलेले प्रयत्न होते आणि दोघेही एकाच निर्णयाला येऊन पोहोचले हे लक्षणीय आहे. दोघांच्याही मते ऋग्वेदातील प्राचीन सूक्ते ख्रि. पू. ४५०० च्या सुमारास रचली गेली असावीत.
काशीकर, चिं. ग.