याकूत : सोव्हिएट रशियामधील सायबीरिया प्रांतातील याकुतिया विभागातील एक भटक्या आदिम रहिवाशांचा समूह. या समूहात स्वतंत्र अशा सु. ८० जमाती असून अनेक कुळी होत्या. त्या सर्व मंगोलॉइड वंशाच्या आहेत. त्यांना सरवा किंवा याकुत्स असेही म्हणतात. सांप्रत हे लोक सांस्कृतिक दृष्ट्या पूर्णतः रशियन जीवनाशी एकरूप झाले असले, तरी त्यांची काही परंपरागत वैशिष्ट्ये अद्यापि टिकून आहेत. त्यांची लोकसंख्या ३,४९,२८० (अंदाजे १९८३) होती.
सतराव्या शतकात ते उत्तरेकडच्या बर्फाच्छादित टंड्रा प्रदेशात लीना नदीकाठी राहत असत ते उरल-अल्ताइक भाषासमूहातील याकृत (सखा) ही भाषा बोलतात. त्यांच्या संकर वा मिश्रणाबद्दल दोन मते प्रचलित आहेत: एक, बैकल सरोवराच्या परिसरातील आदिवासी लीना नदीकाठच्या आदिवासींत, विशेषततः इव्हेंक या जमातीत मिसळून यातून याकूत ही जमात उद्भवली. दुसऱ्या मतानुसार दक्षिणेकडील स्टेप प्रदेश आणि अल्ताई पर्वतश्रेणीतील तुर्की जमाती व लीना काठचे लोक यांच्या संकरातून त्यांची निर्मिती झाली. इव्हेंक लोकांची अनेक सांकृतिक वैशिष्ट्ये त्यांच्यात आढळतात. हे भटके असून प्रारंभी ते बर्फ वितळल्यानंतर नदी-सरोवरातून मासेमारीचा धंदा करीत. रेनडियरचे कळप पाळणे आणि थंड प्रदेशातील खार, अर्मिन (लहान प्राणी) व खोकड या प्राण्यांची शिकार करणे, हे त्यांचे प्रमुख व्यवसाय होते. काहीजण अरण्यातून लाकडे गोळा करीत. यांची घरेही लाकडाचीच असून कुटुंब लहान असे.
याकूत हे जडप्राणवादी असून त्यांच्यात अलौकिक शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शुभ व अशुभ असे प्रेतात्मे मानवी जीवनावर परिणाम करतात, या श्रद्धेमुळे त्यांना ते प्राण्यांचे बळी देतात. शामानला जमातीत मोठे महत्त्व असते. आधुनिक काळात अनेक याकुतांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असला, तरी त्यांच्यातील काही परंपरागत श्रद्धा टिकून आहेत.
देशपांडे, सु. र.