यॅलो, रोझॅलीन सुसमान : (१९ जुलै १९२१–). अमेरिकन वैद्यकीय भौतिकीविज्ञ व जीववैद्यकीय संशोधिका. प्रारण–प्रतिरक्षा–आमापन तंत्राचा विकास व त्याचे जीववैद्यकीय संशोधनातील उपयोग यासंबंधी केलेल्या कार्याबद्दल १९७७ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक यॅलो यांना रॉझे गेयमँ व ⇨अँड्र्यू व्ही. शॅली. यांच्याबरोबर विभागून मिळाले.
यॅलो यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. हंटर महाविद्यालयातून त्यांनी ए.बी. (१९४१) आणि एम्.एस्. (१९४२) या पदव्या मिळवल्या. अणुकेंद्रीय भौतिकी हा विषय घेऊन १९४५ मध्ये त्यांनी इलिनॉय विद्यापीठाची पीएच्.डी. पदवी मिळवली. हंटर महाविद्यालयाच्या भौतिकी विभागात अल्पकाळ काम केल्यानंतर त्या ब्राँक्स व्हेटेरन्स ॲडमिनिस्ट्रेशन रुग्णालयात संशोधन शाळेच्या संचालिका आणि अणुकेंद्रीय वैद्यक विभागाच्या प्रमुख म्हणून काम करीत आहेत.
या रुग्णालयात १९४७ मध्ये काम करू लागल्यानंतर १९५० मध्ये सॉलोमन ए. बर्सन हे त्याच रुग्णालयातून नुकतेच उत्तीर्ण झालेले सहकारी त्यांना मिळाले. १९७२ मध्ये बर्सन यांच्या अकाल मृत्यूपर्यंत दोघे मिळून संशोधन करीत होते. संशोधनाचा त्यांचा पहिला विषय ⇨अवटू ग्रंथीच्या विकृतीच्या निदानाकरिता वापरण्यात येणाऱ्या आयोडीन (१३१) या किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकांसंबंधी (एकच अणुक्रमांक असलेल्या पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारासंबंधी) होता. १९५५ च्या सुमारास मुद्रायुक्त (किरणोत्सर्गी समस्थानिकाचा समावेश केलेल्या) ⇨इन्शुलिनाच्या वितरणासंबंधी संशोधन करीत असताना त्यांना इन्शुलीन उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या रक्तात इन्शुलीन बद्ध करणारी प्रतिपिंडे (बाह्य पदार्थ शरीरात शिरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्याकरिता रक्तद्रवात निर्माण होणारी विशिष्ट प्रथिने) सापडली. या प्रतिपिंडांच्या रक्तातील सांद्रतेचा शोध घेण्याकरिता यॅलो व बर्सन यांनी जे निरीक्षण केले, त्यातून ‘प्रारण–प्रतिरक्षा–आमापन’ (रेडिओइम्युनोॲसे) या अतिशय संवेदनशील वैशिष्ट्यपूर्ण तंत्राचा शोध लागला. या तंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे शरीरात असणाऱ्या हजारो क्रियाशील जैव पदार्थांचे, ते अतिशय सूक्ष्म प्रमाणात असूनही आमापन करणे शक्य झाले. या शोधापूर्वी असे आमापन अशक्य होते. इन्शुलीन प्रतिरोधी रुग्णांमध्ये, त्यांची प्रतिरक्षा यंत्रणा, या बाह्य प्रथिनाविरुद्ध प्रतिपिंडे तयार करते, हा यॅलो व बर्सन यांचा दावा शास्त्रीय वर्तुळात मान्य होण्यात काही शंका घेतल्या गेल्या होत्या परंतु त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले होते. साधे इन्शुलीन व मुद्रायुक्त इन्शुलीन (त्यांनी याकरिता आयोडीन समस्थानिक वापरला होता) यांतील फरक ही प्रतिपिंडे ओळखू शकत नाहीत. यावरून त्यांनी प्रारण गणित्र [अणुकेंद्रीय प्रारण ओळखण्यासाठी वा मोजण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण ⟶ कण अभिज्ञातक] वापरून इन्शुलीन आमापन शक्य केले. गिनीपिग किंवा ससे या प्राण्यांमध्ये, प्रयोगशाळेत कोणत्याही जैव क्रियाशील पदार्थांविरुद्ध प्रतिपिंडे निर्माण करणे शक्य असल्यामुळे त्या सर्वांच्या सूक्ष्म अभ्यासास या नव्या तंत्रामुळे मोठी मदत झाली.
सतत तीन दशके त्या प्रारण–प्रतिरक्षा–आमापन तंत्राचा अभ्यास व संशोधन करीत होत्या. सुरुवातीस या तंत्राचा अंतःस्रावीग्रंथिविज्ञानामध्ये (रक्तात सरळ मिसळणारे उत्तेजक स्राव–हॉर्मोने–स्रवणाऱ्या ग्रंथींसंबंधीच्या विज्ञानामध्ये) उपयोग करण्यावर प्रामुख्याने भर होता. पुढे एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणारी प्रथिने), औषधिविज्ञान, व्हायरस व सूक्ष्मजंतुजन्य प्रतिजने (ज्यांना प्रतिरोध करण्यासाठी रक्तद्रवात प्रतिपिंड निर्माण होतात असे हानिकारक पदार्थ) व जीवविज्ञानाशी संबंधित असलेल्या इतर शेकडो पदार्थांच्या संशोधनातही या पद्धतीचे महत्त्व सिद्ध झाले.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना मिळालेल्या मानसन्मानांत इली लिली पुरस्कार (१९६१), गेर्डनर पुरस्कार (१९७१), कॉख पुरस्कार (१९७२), क्रेसी मॉरिसन पुरस्कार (१९७५), लास्कर पुरस्कार (१९७६) व बँटिंक पदक (१९७८) हे विशेष उल्लेखनीय आहेत. यांशिवाय त्यांना बारा सन्माननीय डॉक्टरेट पदव्या मिळाल्या. त्यांची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्य म्हणून १९७५ मध्ये व अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्य म्हणून १९७८ मध्ये निवड झाली.
भालेराव, य. त्र्यं.