यशपाल : (३ डिसेंबर १९०३–२७ डिसेंबर १९७६). आधुनिक हिंदी कथाकार, कादंबरीकार, निबंधकार व क्रांतिकारक देशभक्त. जन्म पंजाबमध्ये फिरोझपूर छावणी येथे. त्याचे आई-वडील हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्याचे रहिवासी. यशपालांच्या जन्माच्या वेळी आई प्रेमदेवी फिरोझपूर छवणीमध्ये अध्यापिका होती. यशपालांचे शिक्षण आरंभी गुरुकुल कांगडीमध्ये आणि नंतर लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असतानाच वडील हिरालाल वारले. नंतर आईने त्यांचे पालनपोषण केले. १९६४ मध्ये आई वारली. यशपालांना आईच्या परिश्रमी, सहिष्णू, साहसी व्यक्तिमत्त्वाबद्दल अभिमान होता. ते गुण यशपालां मध्येही उतरले. यशपालांचे धाकटे भाऊ धर्मपाल हेही क्रांतिकारी कार्यात सहभागी होते आणि त्यांनी तुरुंगवासही भोगला.
यशपाल मॅट्रिक परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यांना शिष्यवृत्तीही मिळत होती पण स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी कॉलेज सोडले. चौरीचौराचा सत्याग्रह मागे घेतल्यामुळे निराश झालेल्या तरुणांत यशपाल होते. पुढे त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन बी.ए. केले व अध्यापक म्हणून नोकरीही पत्करली. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, बटुकेश्वर दत्त यांच्यासारख्या क्रांतिकारकांबरोबर दहशतवादी क्रांतीच्या लढ्यात ते सक्रिय होते. १९२९ मध्ये त्यांनी व भगवती चरण व्होरा यांनी दिल्ली येथे व्हाइसरायच्या गाडीखाली बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. तीन वर्षे ते फरारी झाले. पुढे १९३२ मध्ये पकडले जाऊन त्यांना १४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. १९३८ मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेस मंत्रिमंडळ सत्तेवर आल्यावर इतर कैद्यांसमवेत मोठ्या कष्टाने यशपालांचीही सुटका झाली. १९३० मध्ये ते पंजाबची क्रांतिकारी संघटना ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी’चे प्रमुख आणि चंद्रशेखर आझादांच्या मृत्यूनंतर १९३१ मध्ये तिचे प्रमुख सेनापती म्हणून नियुक्त झाले.
क्रांतिकारी गटात सक्रिय असताना त्यांची प्रकाशवती कपूर यांच्याशी ओळख झाली व त्याचे रूपांतर प्रेमात झाले. ७ ऑगस्ट १९३६ मध्ये जेलमध्येच ते दोघे नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले. प्रकाशवतीने त्यांना त्यांच्या सर्व प्रकारच्या कार्यात सर्वतोपरीने सहयोग दिला.
यशपालांनी इंग्रजी, हिंदी या भाषांशिवाय बंगाली, फ्रेंच, रशियन, इटालियन या भाषांचे अध्ययन केले होते. पुढे कथालेखनावरच त्यांनी निर्वाह करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबावर आर्यसमाजाचे संस्कार होते पण पुढे यशपाल धर्मविरोधी व क्रांतिकारी बनले. आरंभी लखनौ येथे एका साप्ताहिकात ७५ रुपयांवर ते उपसंपादक म्हणून काम करू लागले. पुढे आईने दिलेल्या तीनशे रुपयांवर विप्लव हे मासिक त्यांनी सुरू केले. पति-पत्नींनी अपार कष्ट घेऊन ते चालवले व पुढे त्याला स्थैर्यही आले. पुढे ते विप्लवचेच उर्दू संस्करण बागी या नावाने प्रसिद्ध करू लागले. यशपालांचे क्रांतिकारकांशी संबंध होतेच. त्यांनी बाँब तयार करण्याचा लहान कारखानाही सुरू केला होता. १९४० मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र त्यांनी स्वतःस पूर्णपणे लेखनास वाहून घेतलेले दिसते. त्यांची सु. ५० पुस्तके प्रकाशित झाली.
त्यांनी १९५२ साली रशिया, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इंग्लंडचा प्रवास केला. लोहेकी दीवार के दोनों ओर (१९५२) हे प्रवासवर्णन त्यांनी प्रकाशित केले. १९५५, ५६, ५८, ६४ या वर्षीही त्यांनी विदेश यात्रा केल्या. राहबीती (१९५३) मध्ये त्यांची प्रवासातील संस्मरणे आली आहेत.
नशे नशे की बात (१९५२) हे त्यांचे एकमेव नाटक आहे. यशपालांचे वाड्मयीन मोठेपण त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या तसेच निबंध यांत आहे.
समकालीन राजकीय घटनांचा संदर्भ गांधीवादाचा विरोध आणि साम्यवादाचा आग्रही पुरस्कार धार्मिक रूढींवर तसेच भारतीय समाजाच्या अंधश्रद्धांवर घणाघाती आघात स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक व लैंगिक नीतीचा ऐहिक व साम्यवादी दृष्टीने विचार, प्रचार व प्रसार स्त्रियांच्या क्रांतिकारी रूपाचे दर्शन साम्यवादी पार्टीच्या राजकीय धोरणांचे समर्थन वर्गीय जाणिवांची जागृती गरिबांबद्दलची सहानुभूती व उच्चवर्गाबद्दल उपहासगर्भ दृष्टी हे यशपालांच्या कथासाहित्यातील महत्त्वाचे विषय आहेत. त्यांच्या कादंबऱ्या कलात्मक दृष्ट्या खूप यशस्वी झाल्या आहेत असे म्हणता येणार नाही मात्र झूठ-सच (१९६०) ही दोन भागांत लिहिलेली फाळणीनंतरच्या १०–१२ वर्षांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींच्या संदर्भावर आधारलेली कादंबरी आकाराने विराट असून (सु. १,८०० पृष्ठे) गुणवत्तेनेही उच्च दर्जाची आहे. त्यांच्या तीन ऐतिहासिक कादंबऱ्यां-(दिव्या –१९५४, अमिता –५६, अप्सरा का श्राप –६५) पैकी दिव्या ही कादंबरी सर्वश्रेष्ठ असून मध्ययुगातील स्त्रियांच्या परवशतेचे, शोषणाचे त्यांनी हृदयविदारक चित्रण तीत केले आहे. तत्कालीन वातावरणनिर्मितीचा प्रयत्नही खूपच यशस्वी झाला आहे. मेरी तेरी उसकी बात (१९७४) मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पार्टीच्या ध्येयधोरणांचे समर्थन करताना अन्य राजकीय दलांचे खुजेपण सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या अन्य कादंबऱ्या–दादा कॉमरेड (१९४१), देशद्रोही (१९४३), पार्टी कॉमरेड (१९४७), मनुष्य के रूप (१९४९), बारह घंटे (१९६३) इ. होत. शेवटच्या दोन कादंबऱ्यांतील लैंगिक विषय काहीसा भडक झाला असल्याची तक्रार समीक्षकांनी केली आहे.
कादंबऱ्यांपेक्षा त्यांच्या लघुकथा अधिक यशस्वी झाल्या असून त्यांत वैविध्यही भरपूर आहे. त्यांच्या सु. २६५ कथा प्रसिद्ध झाल्या असून त्यांचे संग्रह असे आहेत : पिंजरे की उडान (१९३९), वो दुनिया (१९४२), ज्ञानदान (१९४३), अभिशप्त (१९४४), तर्क का तूफान (१९४४), भस्मावृत चिनगारी (१९४६), फूलों का कुर्ता (१९४९), धर्मयुद्ध (१९५०), उत्तराधिकारी (१९५१), चित्र का शीर्षक (१९५१), तुमने क्यों कहा था कि मैं सुंदर हूँ (१९५४), उत्तमी की माँ (१९५५), ओ भैरवी (१९५८), सच बोलने की भूल (१९६२), खच्चर और आदमी (१९६५) इत्यादी. सामाजिक-धार्मिक व्यवस्थेचा व विचारांचा आर्थिक पाया, लैंगिक विषयाकडे पापवृत्तीने पाहण्याची समाजाची विकृत दृष्टी, कला व साहित्य यांसंबंधी विशुद्ध सौंदर्यवादी वा अलौकिकतावादी दृष्टीचा उपहासगर्भ निषेध, वर्गीय जाणिवा या सूत्रांवर, बीजांवर आधारलेल्या त्यांच्या लघुकथा फारच मार्मिक व प्रभावी आहेत.
यशपालांनी आपले ललित साहित्यात अनुस्यूत असलेले विचार व जीवनदृष्टी अतिशय स्पष्टपणे, धारदारपणे आणि उपहासगर्भित शैलीने निबंधांतून व्यक्त केली आहे. न्याय का संघर्ष (१९४०), मार्क्सवाद (१९४१), गांधीवाद की शव-परीक्षा (१९४२), चक्कर क्लब (१९४३), बात-बातमें बात (१९५०), रामराज्य की कथा (१९५०), देखा, सोचा, समझा (१९५१), जग का मुजरा (१९५२), बीबीजी कहती है मेरा चेहरा रोवीला है इ. त्यांचे निबंधसंग्रह होत.
यशपालांनी आपले आत्मचरित्र सिंहावलोकन या नावाने तीन भागांत (१९५१, ५२, ५५) प्रकाशित केले असून साहित्य, राजकीय व सामाजिक वस्तुस्थिती आणि एका प्रखर क्रांतिकारकाचे कर्ममय जीवन या दृष्टीने ते वाचनीय आहे.
संदर्भ: १. गुप्ता, सरोज, यशपाल : व्यक्तित्व और कृतित्व, कानपूर, १९७७.
२. मधुरेश, संपा. क्रांतिकारी यशपाल : एक समर्पित व्यक्तित्व, अलाहाबाद, १९७८.
३. मिश्र, प्रकाशचंद्र, यशपाल का कथा साहित्य, दिल्ली, १९७८.
बांदिवडेकर, चंद्रकांत
“