यमुना : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातून वाहणारी गंगेची प्रमुख उपनदी. लांबी सु. १,३७६ किमी. जलवाहन क्षेत्र ३,०५,६१८ चौ. किमी. उत्तर प्रदेश राज्याच्या उत्तर काशी जिल्ह्यात हिमालयाच्या पश्चिम कुमाऊँ विभागात, सस.पासून १,३०७ मी. उंचीवरील जम्नोत्री या पवित्र क्षेत्राच्या उत्तरेस आठ किमी. वरील जम्नोत्री हिमनदीतून यमुना नदीचा प्रवाह सुरू होतो. तथापि जम्नोत्री हेच यमुना नदीचे उगमस्थान समजले जात असून ते ठिकाण बंदरपूंछ पर्वतशिखराच्या (६,३१५ मी.) पश्चिमेस १० किमी. वर आहे. गंगोत्री हे गंगा नदीचे उगमस्थान जम्नोत्रीच्या पूर्वेस थोड्याच अंतरावर असून बंदरपूंछ पर्वत हा गंगा–यमुना नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. जम्नोत्रीच्या मार्गावर व जम्नोत्री येथे उष्ण पाण्याचे झरे असून त्यांपैकी जम्नोत्री मंदिराजवळच्या एका मोठ्या झऱ्यातील पाण्यावर यात्रेकरू भात, बटाटे, डाळी इ. शिजवू शकतात. अतिप्राचीन काळी यमुना नदी पश्चिमेस सिंधू खोऱ्याकडे वाहत जाई परंतु भूहालचालींमुळे तिचे पात्र बदलून ती गंगेची उपनदी बनली. यमुना नदीला जमुना, चिनी भाषेत येन–मौ–ना, तर टॉलेमी, प्लिनी, एरियन यांच्या साहित्यांत अनुक्रमे दिआमौना, जॉमनीझ आणि जोबारेस असेही संबोधले जाते.
कालिंदी या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या यमुनेचे भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. गंगेच्या बरोबरीने तिचे नाव घेतले जाते. महाभारतकाळापासून हिच्या खोऱ्यात अनेक साम्राज्ये उदयास आली व नष्ट झाली. त्यांच्यामुळे या खोऱ्यातील दिल्ली (इंद्रप्रस्थ), मथुरा, कौशाम्बी (कोसाभ), आग्रा इ. शहरांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. जम्नोत्री, मथुरा, वृंदावन, गोकुळ, प्रयाग इ. हिंदूंची प्रवित्र तीर्थक्षेत्रे यमुनेकाठीच आहेत. बौद्ध ग्रंथांतही यमुनेला पाच पवित्र नद्यांपैकी एक मानले आहे. सांस्कृतिक उत्कर्षाबरोबरच मोक्याच्या स्थानामुळे यमुनेचे खोरे अनेक रणक्षेत्रांसाठीही प्रसिद्ध झाले. कुरुक्षेत्र, ठाणेश्वर, पानिपत, दिल्ली इ. महत्त्वाची लढाईची मैदाने याच खोऱ्यात आहेत.
यमुना नदीचे अनेक शीर्षप्रवाह असले, तरी जम्नोत्री हिमनदीतून निघणारा प्रवाह हा सर्वांत महत्त्वाचा व वेगवान आहे. या प्रवाहाच्या वायव्येस ३ किमी. वरून निघणारा ऋषिगंगा प्रवाह जम्नोत्री प्रवाहाला उजवीकडून वनास येथे मिळतो. बंदरपूंछच्या दक्षिणेस जाखल व छैअन बामक या हिमनद्यांमधून निघणारे अंता व हनुमानगंगा हे दोन शीर्षप्रवाह खरसाळीच्या खालच्या बाजूस डावीकडून जम्नोत्रीला मिळतात. नैर्ऋत्येस लेसर हिमालय रांगांमधूनही अनेक प्रवाह यमुनेला येऊन मिळतात. तोन्स ही यमुनेची हिमालयातील सर्वांत मोठी उपनदी बंदरपूंछच्या ईशान्य उतारावर उगम पावून वायव्येकडून यमुनेला समांतर दिशेत वाहत येऊन कळशी येथे तिला मिळते. तोन्स नदी यमुनेच्या दुप्पट पाणी वाहून आणते. गिरी ही हिमाचल प्रदेशाच्या आग्नेय भागाचे जलवाहन करणारी दुसरी महत्त्वाची उपनदी तोन्सच्या वायव्येकडून वाहत येऊन उजव्या तीरावर यमुनेला मिळते. यमुना नदी हिमालय पर्वतश्रेण्या व शिवालिक टेकड्यांमधून उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाकडे वाहत येताना खोल दऱ्यांमधून प्रथम नैर्ऋत्येस व नंतर उत्तर प्रदेश-हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश-हरयाणा राज्यांच्या सरहद्दींवरून दक्षिणेस वाहत जाते.
हिमालयातील १५२ किमी. लांबीच्या प्रवाहानंतर कालेसार येथे यमुना मैदानी प्रदेशात प्रवेश करते. येथे तिने १६० किमी. रुंदीचे पंखाकृती किंवा शंक्वाकृती मैदान तयार केले आहे. याच भागात बांधलेल्या बंधाऱ्यामुळे तिच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पुढे फैजाबादजवळील ताजेवाला (सहारनपूर जिल्हा) येथून पूर्व यमुना (लांबी २०६ किमी.) व पश्चिम यमुना (६४६ किमी.) असे दोन कालवे काढण्यात आले आहेत. त्यांपासून स्थूलमानाने अनुक्रमे २,००,००० हेक्टर व ५,३२,६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पश्चिम यमुना कालव्याचे काम १३५६ मध्ये दुसरा फिरोझशाह तुघलक याच्या कारकीर्दीत सुरू झाले होते. त्यानंतर आजपर्यंत अनेकदा या कालव्याची दुरुस्ती वा पुनर्बांधणी करण्यात आली. पूर्व यमुना कालव्याचे काम मुहंमदशाह (१७१८–१७४८) याच्या कारकीर्दीत सुरू झाले होते परंतु ब्रिटिशांनी ते काम पूर्ण केले (१८३०–१८५४). भारताच्या पंचवार्षिक योजनांतर्गतही या दोन्ही कालव्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
कालेसार ते बिदौली (मुझफरनगर जिल्हा) पर्यंतचा नदीचा ११८ किमी. लांबीचा प्रवाह नैर्ऋत्यवाहिनी असून बिदौली ते दिल्लीपर्यंतचा १२८ किमी. लांबीचा प्रवाह दक्षिणवाहिनी आहे. याच भागात बहुतेक रणक्षेत्रे आहेत. दिल्लीपासून मथुरा शहरापर्यंत १७० किमी. दक्षिणेस वाहत आल्यावर तेथून नदी आग्नेयवाहिनी होते. दिल्लीपासून १६ किमी. वरील ओखला येथे यमुना नदीपासून २६७ किमी. लांबीचा आग्रा कालवा काढण्यात आला असून (१८६८–७३) त्यामुळे स्थूलमानाने १,६७,४५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आग्रा ते माऊ (बांदा जिल्हा) हा ६९६ किमी. लांबीचा प्रवाह आग्नेयवाहिनी आहे. आग्रा ते माऊ यांदरम्यान फिरोझाबाद, इटावा, औराइया, काल्पी व हमीरपूर ही यमुनाकाठची प्रमुख नगरे आहेत. या भागात यमुनेला डावीकडून कार्वान आणि सेंगर, उजवीकडून बाणगंगा, चंबळ, सिंद, बेटवा, केन इ. उपनद्या येऊन मिळतात. आग्रा येथे यमुनेच्या तीरावरच जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू आहे. माऊपासून ७२ किमी. अंतर ईशान्येस वाहत जाऊन अलाहाबाद (प्रयाग) जवळ (सस.पासून उंची ९४ मीटर) ती गंगेला मिळते. यमुनेचा बहुतेक प्रवाह गंगेस समांतर दिशेत वाहतो.
डेहराडून जिल्ह्यात डेहराडूनपासून ४० किमी. व यमुना–तोन्स संगमापासून खाली दोन किमी.वर ढाकपठार येथे यमुना जलविद्युत्निर्मिती प्रकल्प आणि याच जिल्ह्यातील कळशी या ठिकाणाच्या वायव्येस १२·८ किमी. तोन्स नदीवर इचारी येथे वीजनिर्मितीसाठी अपवहन धरण बांधण्यात आले आहे. ह्या जलविद्युत्निर्मिती प्रकल्पांचे काम चार टप्प्यांत पूर्ण व्हावयाचे आहे. त्यांपैकी पहिल्या टप्प्याचे काम १९६०-६१ ते १९६९-७० या काळात करण्यात आले. या टप्प्यात ढाकराणी येथे प्रत्येकी ११·२५ मेवॉ. जलविद्युत्निर्मिती क्षमतेची तीन आणि ढालीपूर येथे प्रत्येकी १७ मेवॉ. क्षमतेची तीन जनित्रे बसविण्यात आली आहेत. या टप्प्यात चिब्रो येथे प्रत्येकी ६० मेवॉ. क्षमतेची चार, तर खोद्री येथे प्रत्येकी ३० मेवॉ. क्षमतेची चार जनित्रे उभारण्यात येणार होती. लखवार येथेही यमुनेवर धरण बांधण्याची योजना आहे. याशिवाय तिच्या उपनद्यांवरही अनेक जलसिंचन व जलविद्युत्निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. जलसिंचनासाठी यमुनेचे बरेचसे पाणी कालव्यांमध्ये वळविले असल्यामुळे आग्रा शहराच्या वरच्या नदीप्रवाहात उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण फारच कमी झालेले असते. यमुनेचे खोरे सुपीक व दाट लोकवस्तीचे आहे. गंगा यमुना यांदरम्यानचा लांबट, अरुंद व सुपीक असा दुआब प्रदेश बहुतांशी जलसिंचित आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या जलसिंचनाच्या दृष्टीने यमुना नदीला विशेष महत्त्वाचे स्थान आहे.
चौधरी, वसंत पंडित, अविनाश