म्यूलर, व्हिल्हेल्म : (७ ऑक्टोबर १७९४–३० सप्टेंबर १८२७). जर्मन कवी. देसौ (जर्मनी) येथे जन्मला. बर्लिन विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. नेपोलिअनविरुद्ध झालेल्या प्रशियनांच्या उठावात म्यूलरने भाग घेतला होता. (१८१३–१४). त्यानंतर अभिजात साहित्याचा अध्यापक, ग्रंथपाल अशा पदांवर त्याने कामे केली. त्याच्या ‘साँग्ज ऑफ द ग्रीक्स’ (१८२१–१८२४, इं. शी). या काव्यसंग्रहामुळे त्याला प्रथम प्रसिद्धी मिळाली. ग्रीकांनी तुर्की सत्तेविरुद्ध केलेल्या बंडावर ह्या कविता लिहिल्या होत्या. पण म्यूलर खरा लोकप्रिय झाला, तो त्याच्या लोकगीतांच्या शैलीत लिहिलेल्या साध्या सरळ भावकवितांमुळे. ‘द बॉइज वंड्रस हॉर्न’ (१८०६–१८०८, इं. शी) आणि ‘पोएम्स फ्रॉम द पॉस्ट्यूमस पेपर्स अ ट्रॅव्हलिंग ब्यूग्लर’ (२ खंड, १८२१–२४, इं. शी) हे त्याचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. प्रसिद्ध इंग्रजी नाटककार मार्लो याच्या डॉक्टर फॉस्टस या नाटकाचा त्याने जर्मन भाषेत अनुवाद केला (१८१८). प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित व भाषाभ्यासक माक्स म्यूलर हा त्याचा पुत्र होय. देसौ येथेच तो निधन पावला.
कळमकर, यं. शं.