म्यून्स्टर : पश्चिम जर्मनीच्या उत्तर ऱ्हाईन-वेस्टफेलिया राज्यातील प्रसिद्ध औद्योगिक, व्यापारी व ऐतिहासिक शहर. लोकसंख्या २,७३,५०० (१९८३ अंदाज). हे डॉर्टमुंडच्या उत्तरेस ५३ किमी. ‘आ’ या एम्सच्या लहानशा उपनदीवर व डॉर्टमुंड-एम्स कालव्याकाठी वसले आहे. समृद्ध कृषिक्षेत्राच्या मध्यवर्ती भागात वसलेले हे शहर प्रशासकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे. ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कामासाठी इ. स. ८०५ मध्ये या ठिकाणीची स्थापना करण्यात आली. बाराव्या ते तेराव्या शतकांत हे ठिकाण हॅन्सिॲटिक लीगचे मुख्य सभासद होते. १५३४–३६ मध्ये येथे ॲनबॅप्टिस्ट व बिशप यांच्यात तीव्र झगडे झाले. १६४८ मध्ये वेस्टफेलिया तहावर येथील गॉथिक नगरभवनात सह्या झाल्या. १८१५ मध्ये म्यून्स्टर हे वेस्टफेलियातील प्रशियन प्रांताच्या राजधानीचे ठिकाण बनले. दुसऱ्या महायुद्धकाळात शहराची खूप नासधूस झाली. तीमध्ये ९०% पेक्षाही अधिक ऐतिहासिक भागाची हानी झाली. जुन्या म्यून्स्टरमधील हानी झालेल्या अनेक मध्ययुगीन वास्तूंच्या जपणुकीसाठी व संवर्धनासाठी १९४५ मध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणी, पुनःस्थापना व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली व बहुतेक वास्तू पूर्वस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रिंझीपालमार्क्ट आणि गॉथिक नगर (१३३५), सिटी वाइन हाउस (१६१५), दुपाखी छपरांची अनेक घरे (गेबल), बाराव्या ते तेराव्या शतकातील सुंदर रोमन व गॉथिक शिल्पकला असलेली चर्च, रोमन राजवाडा, गॉथिक शैलीतील सेन लांबर, सेन लुजर व अवर लेडी चर्च, किल्ला (१७६७–७५), सेन क्लेमेंझ व एर्बड्रॉस्टेनहॉफ चर्च (१७५७), सुंदर नक्षीकामाचे महाल इ. मध्ययुगीन वास्तूंचे येथे संवर्धन केलेले आढळते. १७७३ मध्ये स्थापन केलेले म्यून्स्टर विद्यापीठ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी बंद करण्यात आले, १८१८ मध्ये त्याचे अकादमीत रूपांतर करण्यात आले, तर १९०२ मध्ये त्याला पुन्हा विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. शहरात शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालये, राज्य अभियांत्रिकी विद्यालय, कला व संगीत विद्यालये, ऐतिहासिक अभिलेखागार व वस्तुसंग्रहालये आहेत. कृषी व खाणकाम संत्रे, रसायने, कापड, सिमेंटच्या वस्तू. मद्य, लाकडी सामान, लोखंडी सामान, चिनी मातीची भांडी, जाड पुठ्ठ्याचा कागद ही येथील प्रमुख उत्पादने आहेत. बांधकाम उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालतो. शहरात निरनिरळ्या जातीच्या गुरांची बाजारपेठ आहे.
चौधरी, वसंत