मौनी महाराज : (सु. सतरावे शतक). एक शिवकालीन महाराष्ट्रीय सत्पुरुष. पाटगाव येथे आळ्यानंतर धर्ममार्तंडांच्या छळाला कंटाळून त्यांनी मौन धारण केले. त्यामुळे त्यांना ‘मौनी’ हे नाव मिळाले. त्यांना मौनी बाबा वा मौनी बुवा असेही म्हणत. ते उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या गावाहून आले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव (ता. भुदरगड) या गावी वास्तव्य करून राहिले. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळत नाही. त्यांच्या मठातील जीवनक्रम नाथपंथांपैकी अवधूत उपपंथाशी काहीसा मिळता-जुळता होता. गोसाव्यांच्या ‘गिरी’ नावाच्या पंथाशी त्यांचा संबंध असण्याचाही संभव आहे. ते कथाकीर्तनाच्या माध्यमांतून सर्वसामान्य लोकांना उपदेश करीत. त्यांच्या कीर्तनातून वेदवाणी व्यक्त होत असल्यामुळे धर्ममार्तंडांनी तुकारामांप्रमाणेच त्यांचा फार छळ केला.

त्यांची तुकाराम व रामदास यांच्याशी ओळख होती शिवाजी महाराजांनी दक्षिणेच्या स्वारीवर जाण्यापूर्वी १६७६ मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट घेतली होती शिवाजी महाराजांनी रायगडावर भरविलेल्या एका संतपरिषदेस ते उपस्थित होते इ. प्रकारची माहिती मिळते. शिवाजी महाराजांनी मौनी मठास दरसाल एक हजार माणसांना पुरेल एवढा शिधा देण्याची व्यवस्था केली होती तसेच, मठातील पुराणिक, हरदास इत्यादींसाठी दरसाल अठरा होनांची तरतूदही केली होती यासंबंधीच्या सनदा उपलब्ध आहेत. शिवदिग्विजय या बखरीत मौनी महाराजांचा उल्लेख आढळतो. इतिहाससंशोधक कै. सरदेसाई, शेजवलकर इ. तज्ञांनी मौनी महाराज व शिवाजी यांच्या गुरुशिष्यसंबंधाला दुजोरा दिला आहे. आद्य छत्रपतींच्या पश्चात संभाजी, राजाराम आणि ताराबाई यांनीही मौनी बाबांच्या मठाच्या यथायोग्य परामर्श घेतला.

  

मौनी महाराजांचा बहुतेक सर्व कोकणपट्टीत संचार होई. ते कसलाही भेदभाव पाळीत नसत. ते हयात असताना लांबलांबचे लोक त्यांच्या दर्शनास येत. १६८६ मध्ये त्यांनी पाटगाव येथे जिवंत समाधी घेतली, असे म्हणतात. त्यानंतर संभाजी महाराजांच्या पाठिंब्याने तुरुतगिरी हे (१७२८ पर्यंत) पीठपती झाले. तुरुतगिरींनी मौनींच्या समाधीपुढील सभामंडप, नगारखाना इ. इमारती बांधल्या. दरवर्षी रथसप्तमीपासून पुढे सहा दिवस पाटगाव येथे बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव होतो. कोकणात मालवण, सिंधुदुर्ग किल्ला, बाळे घोल (ता. कागल) व पांगिरे (कर्नाटक राज्य) येथे त्यांच्या मूर्ती आहेत. पाटगावमध्ये त्यांची शिवाजी महाराजांशी जेथे भेट झाली, तेथे ‘दर्शनस्थळ’ आहे.

मौनी बाबांची व त्यांच्या पीठाची परंपरा मराठे-ब्राह्मणेतरांची होती. कोल्हापूरच्या गादीवरील सर्वच छत्रपती या पीठाला फार मान देत. राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणाच्या संदर्भात या पीठाचा पूर्वेतिहास अनुकूल वाटला. त्यांनी सदाशिवराव पाटील या मराठा पदवीधराला या पीठावर अधिष्ठित करून क्षात्रजगद्‌गुरू या नावाने शंकराचार्यांचे स्वतंत्र पीठ निर्माण केले. मौनी बाबांचे स्मारक म्हणून १९५२ मध्ये गारगोटी (जि. कोल्हापूर) येथे मौनी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

संदर्भ : १. जोशी, श्रीपाद, श्री. मौनी महाराज (पाटगाव), पुणे, १९८३.

            २. माळी, मा. गो. शिवरायांचे एक गुरू श्री. मौनी महाराज, गारगोटी, १९७७.

            ३. शिर्के, राम. “योगिराज श्री. मौनी महाराज”, श्री मौनी पत्रिका, अंक ३रा, फेब्रुवारी, १९७४.

चव्हाण, रा. ना.