मोल्सवर्थ, जेम्स टी. : (१७९५–१३ जुलै १८७२). आद्य मराठी शब्दकोशकारांपैकी एक. इंग्लंडमधील सरी येथे १५ जून १७९५ रोजी त्याचा बाप्तिस्मा झाला. एक्झीटर (डेव्हन) येथे त्याचे शिक्षण झाले. पुढे लष्करात दाखल होऊन वयाच्या सु. सोळाव्या वर्षी तो भारतात आला. मराठी आणि हिंदुस्थानी ह्या दोन भाषांची परीक्षा त्याने दिली (१८१४). संस्कृत, ग्रीक, लॅटिन, फार्सी ह्या भाषांचेही ज्ञान त्याला होते. १८१४ साली नेटिव्ह इन्फंट्रिच्या नवव्या पथकात (रेजिमेंटमध्ये) भाषाभिज्ञ म्हणून त्याची नेमणूक झाली. ३ मे १८३७ रोजी लष्करातील नोकरीतून तो निवृत्त झाला. क्लिफ्टन येथे त्याचे निधन झाले.
ए डिक्शनरी ऑफ मराठी अँड इंग्लिश (१८३१) ह्या नावाने तयार केलेल्या मराठी-इंग्रजी शब्दकोशावर मोल्सवर्थची कीर्ती अधिष्ठित आहे. ह्या कोशापूर्वीच्या शब्दकोशरचनेचा साक्षेपाने उपयोग करून घेऊन तसेच सामूहिक कार्यपद्धतीचा अवलंब करून सु. ६ वर्षांत मोल्सवर्थने हा कोश तयार केला. संस्कृत, फार्सी, अरबी, हिंदुस्थानी शब्द तसेच ग्राम्य व अश्लिल शब्ददेखील त्याने ह्या शब्दकोशनिर्मितीसाठी विचारात घेतले आणि पहिल्या आवृत्तीसाठी सु. चाळीस हजार शब्द निवडले. जॉर्ज कँडी आणि टॉमस कँडी ह्या बंधूंचे तसेच त्या काळातील काही विद्वान शास्त्री मंडळींचे साहाय्य ह्या कोशरचनेसाठी मोल्सवर्थला लाभले होते. १८५७ मध्ये ह्या कोशाची दुसरी आवृत्ती निघाली. १८३५ मध्ये इंग्लंडला गेलेला मोल्सवर्थ ह्या आवृत्तीच्या कामासाठी मुद्दाम भारतात आला होता. दुसऱ्या आवृत्तीत सु. ६० हजार शब्द आले आहेत.
शब्दसंख्या, शब्दार्थ, अधिकृतता इ. दृष्टींनी मोल्सवर्थचा हा कोश अत्यंत महत्त्वाचा आहे. तथापि मराठी शब्दांचे अर्थ आणि माहिती त्यात इंग्रजीतून दिलेली असल्यामुळे निव्वळ मराठी भाषा जाणणाऱ्यांना मात्र त्याचा उपयोग नाही परंतु ह्या कोशामुळे महाराष्ट्रात शब्दकोशरचनेचा पाया भरभक्कमपणे घातला गेला इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे कामही मोल्सवर्थने हाती घेतले होते तथापि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते तो पूर्ण करू शकला नाही, टॉमस कँडी ह्याने हा कोश पूर्ण केला.
पापपीडितास शांती (१८२९) आणि ज्ञानमार्गांची सूचना (१८४९) ही दोन ख्रिस्ती धर्मपर पुस्तपत्रेही त्याने लिहिली आहेत.
कुलकर्णी, गो. म.