मोलमाइन : ब्रह्मदेशातील शहर, बंदर तसेच ॲम्हर्स्ट जिल्हा आणि तेनासरीम विभाग यांची राजधानी. लोकसंख्या २,०२,९६७ (१९८३). हे मार्ताबान आखाताच्या पूर्व किनाऱ्यावर, सॅल्वीन नदीमुखाजवळ, रंगूनच्या आग्नेयीस सु. १६० किमी. वर वसले आहे. शहराचा परिसर निसर्गरम्य असून तेथील चुनखडकातील गुहा मोलमाइनच्या सौंदर्यात आगळीच भर घालतात.
पहिल्या ब्रह्मी युद्धात (१८२४–२६) इंग्रजांनी तेनासरीम विभाग जिंकल्यानंतर ब्रिटिश प्रशासनाचे केंद्र म्हणून या शहरास महत्त्व प्राप्त झाले होते. लोहमार्ग आणि जलमार्ग यांनी देशातील प्रमुख भागांशी शहर जोडलेले आहे. सॅल्वीन हाऊस, आयुक्तांचे कार्यालय आणि निवास्थान, नगरपालिकीय रुग्णालय, शासकीय विद्यालये सेंट मॅथ्यू, सेंट पॅट्रिक व सेंट ऑगस्टिन या तीन चर्चवास्तू, कँटोनमेंट, कुष्ठधाम इ. इमारती उत्तरेकडील विस्तीर्ण मैदानावर केंद्रित झालेल्या आहेत. शहराच्या सीमेजवळ टेकडीच्या पायथ्याशी व जुन्या लष्करी छावणीजवळ नवीन कारागृह आहे. सोन्या-चांदीचे काम, हस्तीदंताचे कोरीव काम, जहाजबांधणी व शेती हे येथील प्रमुख उद्योग असून येथे भातसडीच्या व लाकूडकटाईच्या गिरण्या आहेत. या बंदरातून सागाचे लाकूड, तांदूळ व कापूस यांची प्रामुख्याने निर्यात होते.
मिसार, म. व्यं.