मोपासां, गी द : (५ ऑगस्ट १८५०–६ जुलै १८९३). विख्यात फ्रेंच कथा-कादंबरीकार. नॉर्मंडी (फ्रान्स) मध्ये जन्मला. एकोणिसाव्या वर्षी कायद्याच्या शिक्षणासाठी पॅरिसला आला, पण फ्रँको- प्रशियन युद्धात सैनिक म्हणून त्याने भाग घेतला. युद्धानंतर एका सरकारी कचेरीत कारकून म्हणून कमी पगारावर तो काम करू लागला. नौका चालविणे, मासे पकडणे व मनसोक्त भटकणे हे त्याचे आवडते छंद होते. युद्धातील आणि इतर अनुभवांतूनच त्याला लेखनाची स्फूर्ती मिळाली. प्रसिद्ध फ्रेंच लेखक ग्यूस्ताव्ह फ्लोबेअर ह्याचे त्यास लेखनाच्या संदर्भात मार्गदर्शन आणि उत्तेजन लाभले. पण फ्लोबेअरच्या शैलीचे त्याने अनुकरण केले नाही. आपल्या पियेर ए जां (१८८८) या कादंबरीच्या प्रस्तावनेत त्याने फ्लोबेअरने केलेल्या मार्गदर्शनाचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. १८८० साली त्याने आपली बूल द् स्विफ (इं.शी वॉल ऑफ फॅट) ही १८७० च्या फ्रेंच पराभवाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली प्रभावी कथा प्रसिद्ध केली. या कथेमुळे त्याला श्रेष्ठ साहित्यिक म्हणून मान्यता मिळाली. प्रसिद्ध फ्रेंच लेखक एमिल झोला आणि इतर लेखकांच्या ले स्वारे द् मेदां या युद्धविरोधी कथासंग्रहात या गोष्टीला स्थान मिळाले होते. यानंतर सतत सु. दहा वर्षे मोपासांने लेखन केले. त्याने ३०० च्यावर लघुकथा, ६ कादंबऱ्या आणि २०० च्यावर निबंध व लेख लिहिले.
मोपासांच्या बहुसंख्य उत्कृष्ट कथा त्याच्या नॉर्मंडीतील शेतकरी जीवनाच्या अनुभवातून उभ्या राहिलेल्या आहेत. ‘द पीस ऑफ स्ट्रिंग’, ‘माय अंकल ज्यूलस्’ आणि ‘मादाम टेलियर्स इस्टॅब्लिशमेंट’ या (सर्व इं. शी) त्याच्या कथांमधून हे दिसून येते. त्याचे युद्धातील अनुभव ‘टू फ्रेंडस्’, ‘मदर सॅव्हेज’ या कथांमध्ये आले आहेत, तर त्याने केलेल्या नोकरीतील त्याचे अनुभव त्याच्या प्रसिद्ध ‘द नेकलेस’ आणि ‘ज्यूअल्स’ या कथांत दिसून येतात. मोपासांने लिहिलेल्या सहा कादंबऱ्यांपैकी यून व्ही (१८८३, इं.शी. अ वुमन्स लाइफ) ही फसवणूक व भ्रमनिरास वाट्याला आलेल्या एका एकाकी स्त्रीच्या दुःखी जीवनावर आधारलेली, बेलामी (१८८५) ही आपल्या प्रगतीसाठी स्त्रियांचा उपयोग करून घेणाऱ्या पत्रकाराच्या जीवनावरची आणि पियेर ए जां ही माणसातील मत्सरी वृत्तीचे प्रभावी दर्शन घडविणारी अशा तीनच कादंबऱ्या अजूनही वाचल्या जातात.
माणसे मुखवट्याच्या आत दडलेली असतात असे मोपासांचे मत होते म्हणून त्याच्या कथांमधून त्याने आपल्या पात्रांचे अगदी सूक्ष्म व काटेकोर चित्रण केले आहे. सामाजिक नैतिकता, धार्मिकपणा, देशभक्ती यांच्या बुरख्यामागे दडलेले सत्य दाखविणे हेच लेखकाचे काम आहे असे त्याला वाटे. पण मोपांसाचे जग फार लहान होते. भाषेचा काटेकोरपणा, कथेला मध्येच चमत्कारिक वळण देण्याचे तंत्र आणि कुशल कथनशैली ही त्याच्या लघुकथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये आहेत.
मोपासांने लग्न केले नाही. पण त्याच्या अनिर्बंध लैगिंक जीवनामुळे त्याला असाध्य रोग जडला. त्याचा परिणाम सतत डोकेदुखी, उदासीनता, मज्जाविकृती यांत होऊन त्याने एकदा आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. त्याला शेवटच्या अठरा महिन्यांत मनोरुग्ण म्हणून पॅरिसच्या मनोरुग्णालयात ठेवण्यात आले होते. तेथेच तो निधन पावला.
संदर्भ : 1. Steegmuller, Francis, Maupassant: A Lion in the path, 1949.
2. Sullivan, Edward D. Maupassant the Novelist, 1954.
3. Sullivan, Edward D. Maupassant: The short stories, 1962.
4. Wallace, Albert H. Guy de Maupassant, Twayne, 1973.
कळमकर, य. शं.
“