मो, यर्जन एंगब्रेटसन : (२२ एप्रिल १८१३–२७ मार्च १८८२). नार्वेजियन लोककथासंग्राहक व कवी. ⇨ पेटर क्रिस्टेन आस्ब्यर्नसेन ह्या आपल्या मित्राच्या सहकार्याने त्याने नॉर्वेजियन लोककथांचे संपादन केले. तो होल (नॉर्वे) येथे श्रीमंत आणि सुशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्मला. क्रिस्तियाना विद्यापीठातून त्याने धर्मशास्त्राची पदवी घेतली (१८३९). पण धार्मिक मतभेदामुळे धर्मोपदेशकाचे काम स्वीकारले नाही. पुढे १८५३ साली मात्र त्याने धर्मोपदेशकाची दीक्षा घेतली. १८७५ मध्ये तो क्रिस्तिअनसँडचा बिशप झाला. पदवी मिळविल्यावर खाजगी शिक्षक म्हणून काम करीत त्याने दक्षिण नॉर्वेमध्ये सुटीच्या दिवसांत लोककथा जमविण्याचा छंद सुरू ठेवला. आस्ब्यर्नसेनची भेट झाल्यावर दोघांनी मिळून नॉर्वेजियन लोककथांसंग्रह प्रसिद्ध केला. (१८४१ इं. भा. पॉप्यूलर टेल्स फ्रॉम द नॉर्स, १८५९). या संग्रहाच्या विस्तृत आणि सचित्र आवृत्या १८४२, १८४३ आणि १८४४ साली निघाल्या. १८५२ साली हाच ग्रंथ टीकाटिप्पणासह प्रसिद्ध केला गेला. नॉर्वेमध्ये ठिकठिकाणी बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांमुळे या लोककथा कुठल्या शैलीत व भाषेत प्रसिद्ध कराव्या हा मोठाच प्रश्न मो आणि त्याच्या मित्रापुढे होता. पण अगदी साधी भाषा वापरून आणि लोककथांचे मूळ रूप कायम ठेवून त्यांनी हा प्रश्न सोडविला. तौलनिक पुराणशास्त्रामध्ये या ग्रंथामुळे मोठी भर पडली असे मानले जाते. नॉर्वेजियन साहित्याच्या इतिहासात या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रंथाचा नॉर्वेजियन भाषेवरदेखील मोठा परिणाम झाला. मो ची कविता व बालसाहित्यदेखील अभिजात साहित्य म्हणून गणले जाते. १८५२ साली क्रिस्तिअनसँड येथे बिशप झाल्यावर तो तेथेच राहिला आणि तेथेच निधन पावला.
कळमकर, यं. शं.