मोडी लिपि : गेली सु. पाचशे वर्षे महाराष्ट्रात प्रचलित असलेली मोडी लिपी १९५० नंतर सरकारी आदेशाने शालेय शिक्षणातून काढून टाकण्यात आली. मराठ्यांचे राजकारण जेथे जेथे गेले तेथे तेथे सार्वजनिक व खाजगी पत्रव्यवहार, हिशेब, ताळेबंद इ. मोडीत लिहिला जाई. राजस्थानातील बिकानेर आदी अभिलेखागारे, मद्रासच्या कोनेमारा विद्यापीठाचा ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट विभाग, गोवा व केरळ येथील अभिलेखागारे आणि तंजावरच्या सरस्वतीमहालातील शेकडो कागद व कैफियती मोडीत आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळ, धुळ्याचे राजवाडे संशोधन मंदिर, लंडन-पॅरिस-स्पेन-हॉलंडच्या संग्रहालयांतही मोडी कागदपत्रांचा संग्रह आहे. मराठयांच्या इतिहाससंशोधकांना मोडीच्या अभ्यासाशिवाय चांगले संशोधन करताच येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळात समोर आलेला सर्वांत जुना मोडी लेख १३८९ चा होता. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी मोडी लिपीतील हजारो कागद गोळा केले. ते म्हणतात ‘‘मोडी ह्या अर्थाचा वाचक शब्द संस्कृतात किंवा माहाराष्ट्रीत नाही……… मोडी हा शब्द फारशी ‘शिकस्ता’ ह्या शब्दाचे हुबेहूब मराठी भाषांतर आहे’’. १२६० पासून १३०९ पर्यंत राज्य करणाऱ्या महादेव व रामदेव यादव यांच्या कारकीर्दीत ही लिपी हेमाडपंताने सुरू केल्याची गोष्टच राजवाडे मान्य करतात.
मोडी लिपीत सर्व उकार ऱ्हस्व, इकार दीर्घ, याप्रमाणे ऱ्हस्व-दीर्घाबाबत अनास्था, जोडाक्षरे वापरली तर ती संस्कृतवरून घ्यायची, अखंडित वर्णांची सोय नाही म्हणून चांगली मुद्रारचना (टाइप कंपोजिंग) अशक्य. यामुळे तिचे शिळामुद्रण चांगले होई पण धातुमुद्राजुळणी समाधानकारक होत नसे. तिचा वापर मर्यादित होऊ लागला आणि मराठीसाठी देवनागरी मुद्रा सहज उपलब्ध होऊ लागल्या. म्हणून मुद्रणयुगामुळे मोडी ही मागे पडू लागली. मोडीच्या पहिल्या धातुमुद्रा विल्यम कॅरीने १८०१ मध्ये बंगालमधील सेरामपूर येथे नागपूरकर भोसल्याकडील पंडीत वैद्यनाथ यांच्या साह्याने करून घेतल्या. श्रीमंत रघूजी भोसल्यांची वंशावळी, मराठा भाषेचे व्याकरण, मराठी भाषेचा कोश, नवा करार (१८०७) इ. पुस्तके मोडीत छापली. कॅरीच्या मोडी मुद्रांबाबत रेव्हरंड हेन्री जे. ब्रूसने १८८३ मध्ये लिहीले की ‘‘सेरामपूरचे बायबल जुन्या मोडी म्हणजे मोडलेल्या अक्षरात छापले आहे ते वाचावयास कठीण वाटते………. त्याची भाषा स्थानिक नागपुरी बोलीत आहे म्हणून सर्वसामान्यास ते उपयोगी नाही.’’
मुद्रांचा इतिहास चिकित्सकपणे लिहिण्याचा पायंडा अ. का. प्रियोळकारांनी पाडला. त्यापूर्वीच्या लेखकांनी दंतकथांचाच प्रचार फार केला. आर्यलिपी (१९२९) मध्ये गो. का. चांदोरकरांनी मोडी लिपी ही देवगिरीच्या यादवांचे मंत्री हेमाद्रिपंडित यांनी लंकेतून आणली, अशी दंतकथा सांगितली. परंतु सिंहली व मोडीच्या वर्णांची तुलना केली, तर त्यांत मुळीच साम्य दिसत नाही, म्हणून ती दंतकथा खरी मानता येत नाही.
अ, आ, इ, क, ख, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, थ, द, ध, न, प, फ, ब, म, य, र, ल, व, स, ह, इतक्या मोडी अक्षरांत जलद पुढच्या अक्षराकडे जाण्यासाठी काना वा शिरेरेषेचा जोड खालून वर नेलेला आढळतो. अपवाद आहे ती अक्षरे उ, ग, घ, ङ, ड, ढ, ण, त, भ, श, ष, ही होत. यांपैकी बहुतेक अक्षरे देवनागरीचीच आहेत. म्हणजे गतिमानतेसाठी अधिकांश अक्षरांचा ‘ काना खालून वर ’ हेच मोडीचे वैशिष्ट्य होय. हात उचलला जाऊ नये म्हणून तीत उच्चारित अनुस्वारही गाळले जातात. जशी देवनागरीची ‘ घसीटी ’ शैली म्हणजे गुजराती, महाजनी या लिप्या आहेत तसेच व्यापारी लोकांच्या ह्या शैलीप्रमाणेच मोडीची ई, ज, झ, ञ, ठ, ड, ढ ही अक्षरे आहेत. महाराष्ट्राचा व्यापार, व्यवहार, राजकीय संबंध गुजराती, मारवाडी, महाजनांद्वारा पिढ्यान्पिढ्या होत आला आहे त्यावरून देवनागरी लिपीचाच मोडी हा त्वर्य (कर्सिव्ह) पर्याय आहे, असे मानावे लागेल. मोडीची चिटणिशी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी इ. वळणे प्रसिद्ध आहेत. डेव्हिड डिरिंजरच्या अल्फाबेटमध्ये ही लिपी शिवाजी महाराजांचा चिटणीस बाळाजी आवजी याने शोधली अशी जी दंतकथा दिली आहे ती चुकीची आहे, ह्यात संशयच नाही.
पहा : नागरी लिपि.
संदर्भ : १. ओझा, गौरीशंकर, प्राचीन भारतीय लिपिमाला, नवी दिल्ली, १९७७.
२. चांदोरकर, गो. का. आर्यलिपी, धुळे, १९२९.
३. फाटक, गो. वि. लेखनविज्ञान अथवा (मोडी लेखन पद्धती), मुंबई, १९३५.
गोखले, शोभना वाकणकर, ल. श्री.
“