मोग्गल्लान : (बारावे शतक). पाली व्याकरणकार, मोग्गल्लायन, मौदगल्यायन ह्या नावांनीही तो ओळखला जातो. श्रीलंकेतील अनुराधपूर येथील थूपारामात त्याचे वास्तव्य असे. मोग्गल्लान-व्याकरण  ह्या नावाने ओळखले जाणारे त्याचे व्याकरण त्याने राजा परक्कमभुज (पराक्रमबाहू-कार. ११५३–८६) ह्याच्या कारकीर्दीत रचले. त्याच्या व्याकरणाची सहा कांडे असून, त्यातील सूत्रे निरनिराळ्या संस्करणांनुसार ८१० ते ८१७ आहेत. कातंत्र, पाणिनी तसेच चंद्रगोमिन् ह्या व्याकरणकारांच्या ग्रंथांचे साहाय्य मोग्गल्लानाने घेतलेले आहे. आपल्या व्याकरणावर त्याने स्वतःच वृत्ती आणि पंचिका लिहिली आहे. मोग्गल्लान हा पाली व्याकरणाची दुसरी परंपरा स्थापन करणारा व्याकरणकार होय. श्रीलंकेतील केलनिया (कल्याणी) येथील विद्यालंकार-मठ-विद्यापाठाकडे मोग्गल्लान-व्याकरणाची परंपरा टिकविण्याचे श्रेय जाते.

बापट, पु. वि.