मोखा : (१) संयुक्त पान, (२) दले, (३) फळ (बोंड).मोखा : (म. हिं. मोका गु. मोखो, घांट कं. मोक्कमर, गुंटे सं. मोक्ष, घंटापाटली इं. वीव्हर्स बीम ट्री लॅ. शेबेरा स्वाइटेनिऑइडिस कुल-ओलिएसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक पानझडी वृक्ष. शेबेरा या प्रजातीतील एकूण २५ जातींपैकी भारतात ही एकच जाती असून ह्या वृक्षाचा प्रसार भारतात (हिमालयात कुमाऊँपासून पूर्वेस, दख्खन, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल) व ब्रह्मदेशात आहे. हा वृक्ष सु. २० मी. उंच असून त्याचा घेर सु. २ मी. असतो. खोड सु. ९ मी. पर्यंत सरळ खांबासारखे असून नंतर त्यास अनेक फांद्या येतात. खोडावरची साल करडी तपकिरी, जाड आणि खरबरीत असून तिचे खवल्यासारखे तुकडे सोलून निघतात. पाने संयुक्त, समोरासमोर व मोठी (२२–३८ सेंमी. लांब) असून त्यावरची दले (स्वतंत्र भाग) ४–८, समोरासमोर,अंडाकृती किंवा अंडाकृति-कुंतसम (भाल्यासारखी), लांबट टोकाची आणि चकचकीत असतात. फुले गुलुच्छ-वल्लरीवर [→ पुष्पबंध] एप्रिल-मेमध्ये येतात. ती नियमित, द्विलिंगी, लहान, पिवळट तपकिरी व सुगंधी असतात. संवर्त नलिकाकृति-घंटाकृती आणि पंचभागी पुष्पमुकुट ८–१३ मिमी. लांब पाकळ्या ५–७, खाली जुळलेल्या व वर सुट्या केसरदले दोन व लहान किंजपुट ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचा व प्रत्येक कप्प्यात ३ ते ४ बीजके असतात [→ फूल]. शुष्क फळे (बोंडे) कठीण, कुंभाकृती (काहीशी लांबट पेरूसारखी), ५–७·५ सेंमी. लांब असून तडकल्यावर त्यांची दोन शकले होतात बिया सपक्ष (पंखयुक्त) व प्रत्येक कप्प्यात तीन ते चार असतात. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ओलिएसी अथवा पारिजातक कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

याचे लाकूड भुरकट करडे, कठीण व टिकाऊ असून त्याचा उपयोग होडगी, धोटे, हातमागाच्या दांड्या (त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे), शेतीची अवजारे इ. बनविण्यास तसेच कातीव व कोरीव काम इत्यादींसाठी करतात. पाने दीपक (भूक वाढविणारी) असून मूत्रमार्गातील दोष व पानथरीची (प्लीहा) वृद्धी यांवर तिचा उपयोग करतात. गळवे आणि भाजण्यामुळे होणाऱ्या जखमा यांवर साल गुणकारी असते. कच्च्या फळाचा डबीसारखा उपयोग करतात. शोभेकरिता ही झाडे लावतात.

संदर्भ : 1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials. Vol. IX, New Delhi, 1972.

              2. Talbot, W.A. Forest Flora of the Bombay Presidency and Sind, Vol. II, Poona, 1911.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.