मोई : (मोजा, शिंबट, शिमटी हिं. झिंगन गु. मावेदी क. गोजल सं. जिंगिनी इं. इंडियन ॲश ट्री लॅ. लॅनिया कॉरोमांडेलिका, ओडिना वोडियर कुल-ॲनाकार्डिएसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] सु. १२–१५ मी. (क्वचित २४ मी. पर्यंत) उंच वाढणारा पानझडी वृक्ष. हा भारतात सामान्यपणे सर्वत्र पानझडी जंगलात व हिमालयात सु. १,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. हिमालयाच्या परिसरातील साल वृक्षांच्या [→ साल–२] जंगलात हा भरपूर वाढतो. शिवाय ब्रह्मदेश व श्रीलंका येथेही तो सापडतो. याचे खोड जाडजूड व मजबूत असून साल जाड, करडी व गुळगुळीत असते आणि ती गोलसर तुकड्यांनी सोलून निघते अंतर्साल लाल व बुळबुळीत असते. कोवळ्या भागांवर तारकाकृती केस असतात. पाने संयुक्त, एकाआड एक, मोठी, सु. २५–४५ सेंमी. लांब, विषमदली व पिच्छाकृती (पिसासारखी) असून फांद्यांच्या टोकांस गर्दीने येतात. फुले लहान, एकलिंगी, चतुर्भागी, जांभळट किंवा हिरवट पिवळी, सच्छद (लहान उपांगे असलेली) असून ती स्वतंत्र फुलोऱ्यावर फेब्रुवारी ते मार्चमध्ये येतात. नर-पुष्पांचे गुच्छ असलेल्या अनेक लांबट शाखा असतात स्त्री-पुष्पे अन्य शाखांवर मंजरीप्रमाणे [→ पुष्पबंध] येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे आम्र कुलात [→ ॲनाकार्डिएसी] वर्णन केल्याप्रमाणे असतात. फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), एकबीजी, मूत्रपिंडाकृती, जांभळे किंवा लाल, दबल्याप्रमाणे व वाटाण्याएवढे असून ते उन्हाळ्यात येते. फेब्रुवारी ते जून या काळात पाने नसतात परंतु भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व भागात वर्षभर पाने दिसतात. नवीन लागवड बिया, छाट कलमे व पन्हेरीत प्रथम बनविलेली रोपे लावून करतात. कलमे लावून लागवड लवकर होते. लागवडीनंतर सु. १५ वर्षांनी खोडाचा व्यास सु. ४५ सेंमी. पर्यंत वाढतो. पक्ष्यांकडून बीज प्रसार होऊन नैसर्गिक रीत्याही या वृक्षांचा प्रसार होतो.
साल उत्तेजक, स्तंभक (आकुंचन करणारी) असून तिचे अनेक उपयोग आहेत. सालीवर मुद्दाम पाडलेल्या भेगांतून किंवा कीटकदंशाने झालेल्या जखमांतून स्त्रवणाऱ्या ’झिंगन’ नावाच्या डिंकाचे विविध उपयोग करतात. तो प्रथम पांढरा, नंतर पिवळा व सुकल्यावर काळपट दिसतो तो पाण्यात विरघळतो. शिजवलेली पाने खरचटणे, लचकणे, सूज, काही शरीरवेदना यांवर बाहेरून लावण्यास उपयुक्त असतात. बंगालमध्ये हिरव्या फांद्यांच्या रसात चिंच घालून ते उलटी होण्यासाठी पिण्यास देतात. पाला चारा म्हणून उपयुक्त आहे.
मोईचे लाकूड तपकिरी करडे असून त्यावर पुढे जांभळट छटा येते. आतील लाकूड (मध्यकाष्ठ) अधिक पिंगट लालसर व काहीसे चकचकीत असते, तसेच हे लाकूड मजबूत, मध्यम कठीण व हलके असते. काळजीपूर्वक कापून व रंधून त्याला झिलई आणता येते. भारतात घरबांधणी, कातीव व कोरीव काम, तसेच विविध वस्तूंकरिता मोई (झिंगन) लाकूड वापरात आहे.
पहा : ॲनाकार्डिएसी.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.
2. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. I, New Delhi, 1975.
जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.
“