मेहता, चंद्रवदन चीमनलाल : (६ एप्रिल १९०१– ). प्रख्यात गुजराती नट, नाटककार तसेच कवी, निबंधकार आणि समीक्षक. जन्म सुरत येथे. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए. झाले. गांधीजींच्या बार्डोली सत्याग्रहात ते सहभागी झाले होते व काही काळ नवजीवनचे संपादकही होते. १९३८ ते ५४ ह्या काळात ते ‘आकाशवाणी’ वर नोकरीस होते आणि अहमदाबाद केंद्राचे प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. १९६७ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरविले. १९७२ मध्ये त्यांना नाट्यलेखनासाठी संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नाट्य परिषदांना ते तज्ञ प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात तसेच अहमदाबाद येथील गांधी विद्यापीठात नाट्यविद्येचे अभ्यागत प्राध्यापक म्हणून सध्या ते काम करतात. सी. सी. मेहता म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत.
चंद्रवदन मेहतांचे वडील बडोद्यास रेल्वेमध्ये नाकरीस असल्याने त्यांचा रेल्वेशी व तेथे काम करणाऱ्या माणसांशी प्रदीर्घ काळ व जवळून संबंध आला. यातूनच त्यांचे सर्वोत्कृष्ठ शोकात्म नाटक आगगाडी (१९३७) उतरले. रेल्वेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाची त्यांना असलेली इत्यंभूत माहिती व त्यांच्याशी असलेले सहानुभूतिपूर्ण जवळिकीचे संबंध यांचे पुरेपूर प्रत्यंतर या नाटकांतून येते.
मेहता १९२५ च्या सुमारास मुंबईत शिकत असताना नाटकांची खूपच चलती होती तथापि नाटकांतील स्त्रियांच्या भूमिका पुरुष करायचे. चंद्रवदन मेहतांनी गुजराती रंगभूमीला दिलेली अतिशय मोलाची देणगी म्हणजे त्यांनी त्याकाळी सर्वांत आधी नाटकातील स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच करण्याचा पायंडा पाडला. मेहता केवळ चांगले नाटककारच नव्हते, तर ते अभिनयकुशल श्रेष्ठ नटही होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांत त्यांनी स्वतः उत्कृष्ट भूमिका केल्या आणि त्या आजही अनेकांच्या चांगल्या स्मरणात आहेत. त्यांच्या नाटकांत आशयाचे नावीन्य, जिवंत व चमकदार संवाद व विनोद हे गुणविशेष प्रकर्षाने आढळतात.
त्यांनी कविता, निबंध, आत्मचरित्रपर लेखन, समीक्षा इ. प्रकारांत विपुल लेखन केले असले, तरी गुजराती साहित्यात ते एक श्रेष्ठ नाटककार व आत्मचरित्रपर लेखनाचे उत्कृष्ट गद्यशैलीकार म्हणूनच विशेष प्रसिद्ध आहेत.
नाटक व रंगभूमी हे गेली अनेक वर्षे त्यांच्या मोठ्या आस्थेचे व भावबंधाशी निगडीत असलेले विषय राहिले आहेत. लोकांमध्ये चांगली नाट्यभिरूची निर्माण व्हावी म्हणून तसेच आपल्या सुरत विभागात खरीखुरी दर्जेदार रंगभूमी प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले.
त्यांची अतिशय गाजलेली नाटके अशी : नागा बाबा (१९३०) आगगाडी (१९३७), हो-होलिका, प्रे मनुं मोती अने बीजां नाटको (१९३७), संताकुकडी (१९३७), धारा सका नर्मद (१९३७), मूंगी स्त्री (१९३७), धरा गुर्जरी (१९४४), पांजरापोळ (१९४७), रंगभंडार अने बीजा नाटको (१९५३), इत्यादी. त्यांनी श्रेष्ठ गुजराती कवी अखोभगत व नर्मद यांच्या रंगभूमीची सुरुवात करून ती गुजराती जनतेपर्यंत नेऊन पोहोचविली. त्यांची नाटके सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक, चारित्रात्मक, प्रहसनात्मक इ. प्रकारांत आहेत. चंद्रवदन मेहता आणि के. एम्. मुनशी यांनी त्याकाळी मृतप्राय झालेल्या व्यावसायिक व पारंपरिक रंगभूमाला शेवटचा धक्का देऊन तिला कायमची मूठमाती दिली आणि नव्या आधुनिक रंगभूमीचे गुजरातीत प्रवर्तन केले. मेहतांनी काही गाजलेल्या यूरोपियन नाटकांचे गुजरातीत अनुवादही केले आहेत.
त्यांनी लिहिलेल्या कवितांचा इलाकाव्यो (१९३३) हा संग्रह असून त्यात त्यांच्या स्कुट कविता आहेत, तर रतन (तिसरी आवृ.१९३९) हे त्यांचे दीर्घकाव्य आहे. यातील अनेक कवितांत बहिण-भावातील निरागस, विशुद्ध प्रेम हा विषय आलेला असून ह्या कवितांना त्यांचा असा खास गोडवाही आहे. यमल (१९२६) मध्ये त्यांनी पृथ्वी वृत्तात रचलेली १४ सुनीते असून ती अतिशय सुंदर उतरली आहेत.
मेहतांची नाटकाइतकीच महत्त्वपूर्ण साहित्यनिर्मिती म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रपर लेखनाचे तीन खंड होत. बांध गठरियां, छोड गठरियां, रंगगठरियां (३ भागांत १९५४). नाट्यगठरियां (१९७०) हा त्यांचा दर्जेदार समीक्षापर ग्रंथ. ह्या खंडांमध्ये त्यांच्या प्रसन्न, स्वतंत्र व उत्कृष्ट अशा गद्यशैलीचे दर्शन घडते. ह्या गद्यलेखनातील त्यांची खास व स्वतंत्र शैली वाचकांस नेहमीच आकृष्ट करत आली आहे. गुजराती गद्याचे एक असामान्य शिल्पकार म्हणून त्यांचे स्थान फार वरचे आहे. त्यांनी काही लघुकथाही लिहिल्या आहेत तथापि त्यात ते यशस्वी झाले नाहीत. वयाच्या ८५ व्या वर्षीही ते अतिशय कार्यक्षम आहेत. एक प्रसन्न व पट्टीचे वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.
त्यांच्या मौलिक साहित्यसेवेचा गौरव गुजराती रसिकांनी त्यांना १९७८ मध्ये ‘गुजराती साहित्य परिषदे’ चे अध्यक्ष म्हणून निवडून देऊन केला. १९७१ मध्ये त्यांच्या नाट्यगठरियांस साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. १९३६ मध्ये गुजरातीतील सर्वोच्च असा ‘रणजितराम सुवर्णचंद्रक’ ही त्यांना मिळाला.
ब्रोकर, गुलाबदास (इं.), सुर्वे, भा. ग. (म.)
“