मेवाड : राजस्थानातील इतिहासप्रसिद्ध प्रदेश. ब्रिटीशांकित हिंदुस्थानात हा प्रदेश उदयपूर (उदेपूर) किंवा मेवाड निवासी क्षेत्र या नावाने प्रसिद्ध होता. याचे प्राचीन नाव ‘मेदपात.’ उत्तरेस मारवाड, पश्चिमेस गुजरात, दक्षिणेस मध्य भारत आणि पूर्वेस झालवाड, कोटा, बुंदी, जयपूर इ. राजपूत संस्थानांचा भूप्रदेश यांनी तो सीमांकित झाला होता. हा प्रदेश दक्षिण राजस्थानात असून त्याचा विस्तार उ. अक्षांश २३° ते २५°५८ व पू. रेखांश ७३° ते ७५° ४९ यांदरम्यान होता. मेवाडचा नैर्ऋत्यकडील भाग पहाडी प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्या ⇨ अरवली पर्वतांच्या रांगा आहेत. मेवाडचे दक्षिण व पश्चिम भाग डोंगराळ व जंगल व्याप्त आहे. चंबळ, खारी, कोठारी आणि बनास या प्रमुख नद्या या प्रदेशांतून वाहतात. जयमंद व रामसमंद ही नैसर्गिक सरोवरे असून उदयसागर, पिचोला आणि फत्तेसिंह ही उदयपूर जवळची सरोवरे ही प्रसिद्ध आहेत. या प्रदेशातील चितोडगढ प्रसिद्ध आहेत. ⇨ हळदी घाटची लढाई या प्रदेशातच झाली (१५७६).

मेवाडचे मूळ राजे गुहिलोत घराण्यातील असून, या घराण्यातील महाराणा कुंभ, संग्रामसिंह, उदयसिंह, प्रतापसिंह, अमरसिंह, आदि पराक्रमी राजांनी मध्य युगात मोगलांशी संघर्ष करून राजपुतान्यात सत्ता टिकवली. औरंगजेबाच्या वेळी (कार. १६५८–१७०७) राजपुतांना मोगलांशी दीर्घ लढा द्यावा लागला. परि णामतः मोगल-राजपुतांत तहहोऊन (१६७९) राजा जयसिंह मोगल दरबारात मनसबदारीवर राहिला आणि मेवाडच्या अवनतीला प्रारंभ झाला. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस मेवाडने इंग्रजांशी संरक्षणाचा तह करून मांडलिकी पतकरली (१८१८). ‘आहाड’, ‘नागदा’, आणि ‘चितोडगढ’ या मेवाडच्या सुरुवातीच्या राजधान्या होत. पुढे ‘उदयपूर’ या राजधानीचे महत्त्व वाढले. गुहि लोत घराण्यात, ‘महारावळ’ आणि ‘महाराजा’ या शाखा उत्पन्न झाल्या. दुसरी शाखा ‘शिसोदिया राजपूत’ ही होय. या दोन्ही शाखांमधून उदयपूर, बांसवाडा, डुंगरपूर आणि परताबगढ ही चार संस्थाने उदयास आली. स्वातंत्र्योत्तर काळात मेवाड प्रदेश राजस्थान राज्यात समाविष्ट झाला.

पहा : उदयपूर संस्थान गुहिलोत घराणे डुंगरपू र संस्थान, परतापगढ संस्थान बांसवाडा संस्थान, राजपूतांचा इतिहास. 

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Ed. The Mughul Empire, Bombay, 1974.

             २. गहलोत, जगदीशसिंह, राजपुताने का इतिहास, भाग पहला, जोधपूर १९३७.

देशपांडे, सु. र.