मेरुरज्जु-मर्दन चिकित्सा: (किरोप्रॅक्टिक). मानवी रोगावरील चिकित्सा पद्धतींपैकी ही एक पद्धत आहे. या पद्धतीत मेरुदंड अथवा कशेरुक दंड (मणक्यांनी बनलेला पाठीचा कणा) आणि ⇨ मेरुरज्जू (पाठीच्या कण्यातून जाणारा तंत्रिका तंत्राचा-मज्जासंस्थेचा-दोरीसारखा भाग) हे शरीरभाग त्यांच्या प्राकृतिक (सर्वसाधारण) रचनेत बदल झाल्यास रोग उत्पन्न करतात, अशा समजुतीने त्या भागांचे मर्दन करतात, म्हणून तिला ‘मेरुरज्जु-मर्दन चिकित्सा’ म्हणतात. मूळ इंग्रजी शब्द किरोप्रॅक्टिक (Chiropractic) हा असून, तोही मूळ ग्रीक शब्द ‘कर’ (Cheir = हात) आणि प्रॅक्टिकॉस (effective = परिणामकारक) यांवरून बनला आहे. मानवी हात हे एकमेव साधन या चिकित्सेत वापरतात म्हणून तिला ⇨ निसर्गोपचाराचा एक प्रकार म्हणता येईल.

या चिकित्सेतील तज्ञांच्या मताप्रमाणे ही पद्धत हिपॉक्राटीझ (इ. स. पू. पाचवे शतक) यांच्या काळापासून ज्ञात असावी. काहीईजिप्शियन, हिंदू  व चिनी हस्तलिखितांतून तिचा उल्लेख आढळतो. आधुनिक मेरुरज्जु-मर्दन चिकित्सेची सुरुवात डॅनिएल डेव्हिड पामर नावाच्या एका व्यापाऱ्याने १८९५ मध्ये पहिल्या प्रयोगाने केली. १८९८ मध्ये त्यांनी अमेरिकेतील डॅव्हेनपोर्ट येथे ‘पामर कॉलेज ऑफ किरोप्रॅक्टिक’ नावाची संस्था स्थापन केली. १९१० मध्ये त्यांचे द सायन्स, आर्ट ॲन्ड फिलॉसॉफी ऑफ किरॉप्रॅक्टिक हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या पुस्तकात त्यांनी किरोप्रॅक्टिक म्हणजे काय हे पुढील शब्दांत सांगितले आहे. ‘ज्या शास्त्रामध्ये शरीरातील कोणत्याही सांध्याचा संधिभ्रंश विशेषेकरून पाठीच्या मणक्यातील एक किंवा अधिक संधिभ्रंश-हाताने नीट बसवून, त्यामुळे इजा पोहोचलेल्या सर्व तंत्रिकांची (मज्जातंतूंची) मोकळीक करून, रोगनाहीसा करतात, त्या शास्त्राला किरोप्रॅक्टिक म्हणतात’.

पामर वारल्यानंतर १९१३ मध्ये त्यांचा मुलगा व पुढे त्यांचा नातू यांनी तोच व्यवसाय चालू ठेवला. अलीकडे या चिकित्सेचे प्रमुख तत्त्व किंवा उपचार पद्धत मेरुरज्जु-मर्दन समजतात. १९६५ मध्ये किरो प्रॅक्टिक ॲसोसिएशनने अमेरिकेत ३०,००० सभासद असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेत हा व्यवसाय शिकवणारी सोळा महाविद्यालये आहेत व त्यांत १०,००० विद्यार्थी शिकत असावेत. शिक्षणक्रमात सूक्ष्मशारीर, शरीरचना, भ्रूणविज्ञान, रसायनशास्त्र, विकृतीविज्ञान, शरीरक्रियाविज्ञान यांसारख्या वैद्यकीय आधार विषयांशिवाय मेरुरज्जु-मर्दन चिकित्सेसंबंधी मेरुरज्जू विश्लेषण, परिस्पर्शन (हाताने तपासणे), मेरुदंड क्ष-किरण चित्रणांचे अर्थबोधन (काही विद्यालयांतून या विषयाला एकूण चार वर्षांच्या शिक्षणक्रमात ४०० तास दिले आहेत), काही तत्त्वे व तंत्रे या विषयांचाही अभ्यास करावा लागतो. पदवी परीक्षेनंतर ‘डॉक्टर ऑफ किरोप्रॅक्टिक’ (डी. सी.) ही पदवी देण्यात येते.

मेरुरज्जु-मर्दन चिकित्सेला अमेरिकन मेडिकल ॲसोसिएशन या ॲलोपॅथिक पूर्वापार वैद्यकीय व्यावसायिकांच्या संस्थेचा विरोध आहे. या संस्थेच्या मताप्रमाणे ही चिकित्सा आरोग्याला धोकादायक आहे कारण रोग्यांच्या मूळ कारणाबद्दलचे तिचे तत्त्व अयुक्तिक व अशास्त्रीय आहे. १९६४ मध्ये या संस्थेने केलेल्या किरोप्रॅक्टिक शिक्षण संस्थांच्या तपासणीत काही प्रमुख दोषही आढळले होते.

सरकारी आरोग्यसंस्था या चिकित्सेला मान्यता देत नसल्या, तरी काही विमा कंपन्या व अमेरिकेच्या काही राज्यांतील कामगार भरपाई कायद्यान्वये या चिकित्सेच्या खर्चास मान्यता मिळते.

संदर्भ : 1. Jussawala J. M. Healing from within, Bombay, 1966.

             2. Lindlhar, H. Practice of Nature Cure, New York, 1931.

भालेराव, य. त्र्यं.