मेन्युइन, येहूदी : (२२ एप्रिल १९१६– ). प्रख्यात अमेरिकन व्हायोलिन-वादक. भारतीय संगीताच्या संदर्भात त्याची कामगिरी विशेष मोलाची मानली जाते. न्यूयॉर्कमध्ये रशियन–ज्यू आई बापांपोटी जन्म. त्याची आई पियानो–वादक होती व तिच्याकडून त्याला संगीताचे बाळकडू मिळाले. त्याच्या लहानपणीच कुटुंबाचे स्थलांतर सॅन फ्रॅन्सिस्को येथे झाले व तिथेच मेन्युइनच्या सांगीतिक जीवनाची जडणघडण झाली. बाल प्रतिभावंत मेन्युइनने वयाच्या चवथ्या वर्षापासून व्हायोलिन शिकण्यास सुरुवात केली. सुरुवातीस सिग्मंड आंकरकडे आणि पुढे लुईस पर्सिंजरकडे त्याने व्हायोलिनचे धडे घतले. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ‘सॅन फ्रॅन्सिस्को ऑर्केस्ट्रा’ समवेत त्याने व्हायोलिन-वादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम करून जाणकार रसिकांची प्रशंसा मिळवली. तसेच अकराव्या वर्षी बेथोव्हनच्या काँचेर्तोचे वादन करून अप्रतिम तंत्रकौशल्य व सूक्ष्म संवेदनशीलता या गुणांच्या बळावर त्याने संगीत जगताला आश्चर्याचे धक्के दिले. पॅरिसमध्ये व्हायोलिन-वादक- झॉर्झ एनेस्कोकडे त्याने संगीताचे पुढील शिक्षण घेतले. त्याच्या वादनशैलीवर एनेस्कोकचा जबरदस्त प्रभाव पडला. १९३६ नंतर त्याने वर्ष-दीड वर्ष वादनाचे जाहीर कार्यक्रम थांबवून अधिक अभ्यास व सराव यांच्या योगे स्वतःची वेगळी शैली सिद्ध केली. नंतर मेन्युइनने पुन्हा संगीत जलसे सुरू केले. १९५९ मध्ये तो लंडनला गेला. १९६३ मध्ये त्याने स्टोक द ॲबरनॉन, सरे येथे संगीताची विशेष देणगी लाभलेल्या मुलांसाठी ‘येहूदी मेन्युइन स्कूल’ या संगीत विद्यालयाची स्थापना केली. आपल्या संगीत जलशांतून दुर्मिळ व नवनव्या रचना सादर करण्यावर त्याने कटाक्ष ठेवला. बेलॉ बॉर्टोकच्या सोनाटा फॉर सोलो व्हायोलिन रचनेचा या संदर्भात उल्लेख करता येईल. क्षटाट,स्वित्झर्लंड (१९५७ पासून) बाथ, इंग्लंड (१९५९–६८) विंझर, इंग्लंड (१९६९–७२) येथील वार्षिक संगीतमहोत्सवांमध्ये त्याने अध्यक्षपदे सांभाळली.
पं. नेहरूंच्या आमंत्रणानुसार स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मेन्युइनने भारताचा दौरा केला. योगविद्या व भारतीय संगीत यांना पाश्चात्य जगतात दमदार प्रतिष्ठा मिळवून देण्याची मेन्युइनची कामगिरी लक्षणीय आहे. १९६६ मध्ये बाथ येथे व १९६७ मध्ये न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहात प्रख्यात सतारवादक ⇨ रवि शंकर बरोबर त्याने जुगलबंदीचे कार्यक्रम केले त्यांत त्यांनी शास्त्रोक्त भारतीय संगीतरचनासादर केल्या. १९७३ मध्ये आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेचा अध्यक्ष या नात्याने पौर्वात्य संगीताला पाश्चिमात्य जगात अधिक प्रतिष्ठा लाभावी म्हणून मेन्युइनने बरीच खटपट केली. ध्वनिमुद्रण, आकाशवाणी इ. माध्यमातूनही आपली कला प्रभावीपणे सादर करण्याचे त्याचे कसब लक्षणीय आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात युद्धग्रस्तांना व नाझी छळाला बळी पडलेल्या निर्वासितांना मदत करण्यासाठी त्याने अनेक संगीत जलसे केले व भरघोस आर्थिक सहाय्य दिले. त्याने बरीचशी ग्रंथरचनाही केली आहे. त्यात थीम अँड व्हेरिएशन्स (१९७२) हा लेखसंग्रह व्हायोलिन : सिक्स लेसन्स (१९७२) डब्ल्यू. प्रिम्रोझ व डी. स्टीव्हन्स समवेत व्हायोलिन अँड व्हायोला (१९७६) ही वादन तंत्रविषयक पुस्तके आणि कर्टिस डब्ल्यू. डेव्हिस समवेत द म्युझिक ऑफ मॅन (१९७९) यांचा उल्लेख करता येईल. त्याचे अन्फिनिश्ड जर्नी (१९७६) हे आत्मचरित्र व त्याची पत्नी डायना मेन्युइनने लिहिलेले फिडलर्स मोल : लाईफ विथ येहूदी हे पुस्तक यातून त्याच्या व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनाचा भावपूर्ण आलेख पाहावयास मिळतो.
रानडे, अशोक
“