मेन, सर हेन्री जेम्स समनर : (१५ ऑगस्ट १८२२–३ फेब्रुवारी १८८८). सुप्रसिद्ध इंग्लिश विधवेत्ता व सांस्कृतिक मानवशास्त्राचा अभ्यासक. जन्म स्कॉटलंडमधील केल्सोयेथे. केंब्रिज विद्यापीठाच्या पेंब्रुक महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर (१८४४) तेथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये पाठनिर्देशक म्हणून नियुक्ती (१८४५–१८४७). पुढे केंब्रिज विद्यापीठात दिवाणी कायद्याच्या प्राध्यापक (१८४७–१८५४). १८५० मध्ये त्याने वकिलीस प्रारं भ केला, तथापि प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्याने ती सोडली. ‘इन्स ऑफ कोर्ट’ मध्ये तो रोमन विधी व न्यायशास्त्राचा प्रपाठक होता. (१८५२).

ॲन एन्शन्ट लॉ इट्स कनेक्शन विथ द अर्ली हिस्टरी ऑफ सोसायटी, अँड इट्‌स रिलेशन टू मॉर्डन आयडियाज हा त्याचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ १८६१ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथात न्यायशास्त्र आणि राजकीय तत्त्वज्ञान यांतील संकल्पनांची चर्चा त्याने केलेली असून त्यासाठी त्याने रोमन, युरोपीय, भारतीय व इ. प्राचीन कायदेपद्धतींचा आधार घेतला आहे. या ग्रंथामुळे तौलनिक न्यायशास्त्रास मान्यता लाभली. मानवी समाजाच्या भौतिक प्रगतीचे कारण लोकशाही आहे, हे तत्कालीन काही वि चारवंतांचे  मत त्याला मान्य नव्हते. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीची प्राचीन परंपरा हीच सामाईक मालमत्तेच्या संकल्पनेची जनक होती. परंतु नागरी समाज जसजसा उत्क्रांत होत गेला, तसतशी ती परंपरा मोडत गेली आणि व्यक्तिगत मालमत्ता-हक्काची संकल्पना समाजात रूढ झाली. व्हिक्टोरि यन युगातील या श्रेष्ठ विधिज्ञाच्या विचारप्रणालीविषयी वेगवेगळी मते प्रकट करण्यात आली आहेत. तथापि, तत्कालीन राजकीय, आर्थिक विचारक्षेत्रांत आपला स्वतंत्र दृष्टिकोन मांडणारा विशाल व्या संगाचा विचारवंत म्हणून त्याचे स्थान मोठे आहे.

भारताच्या दृष्टीने मेनचे कायदेविषयक कार्य फार मोलाचे आहे. तो गर्व्हनर जनरलच्या कौन्सिलचा कायदेविषयक सदस्य म्हणून भारतात आला. (१८६३–१८६९). भारतीय कायद्यांची संहिता बनविण्यात व सुधारणा घडविण्यात त्याचा मोठा भाग होता. न्याय खात्यात खूपच सुधारणा करून सु. २०९ कायदे त्याने संमत केले. त्यांत व्यापार, वारसा, विवाह, घटस्फोट इ. विषयांसंबंधी प्रमुख कायदे अंतर्भूत होते. हंफ्री वॉर्ड संपादित द रेन ऑफ क्वीन व्हिक्टोरिया या ग्रंथात मेनने भारताविषयी व्यक्त केलेले विचार आजही मनन करण्याजोगे आहे. त्याच्यामते सत्तेचे केंद्रीकरण जास्त प्रमाणात होणे भारतास धोक्याचे आहे. कारण भारतीय समाज इंग्लंडप्रमाणे एकजिनसी नाही. भारतीय विधिसंहिता करतानाही वस्तुस्थिती लक्षात ठेवण्याची गरज आहे. तसेच समानतेचे तत्त्वही भारतातील निरनिराळ्या लोकगटामध्ये अंमलात आणणे कठीण आहे. तथापि, जास्तीत जास्त लोकांचे कल्याण करणारे कायदे असावेत. या जे रेमी बेंथॅमच्या तत्त्वाचा तो पुरस्कर्ता होता.

मेनने कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरुपद तीन वर्ष भूषविले. त्याचे शिक्षणविषयक विचारही महत्त्वाचे आहेत. सत्याचा अविष्कार सर्व प्रकारच्या शिक्षणाचा मूळ हेतू असल्याने भारतातील शिक्षणक्रम आखताना स्वार्थापायी तो डावलू नये, असा त्याचा आग्रह असे.

भारतातून परतल्यावर त्याची ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांत बहुमानाच्या प्राध्यापक आसनावर नियुक्ती झाली. १८७१ मध्ये त्याला ‘सर’ पदवी बहाल करण्यात आली. व्हिलेज कम्युनिटिज (१८७१). अर्ली हिस्टरी ऑफ इन्स्टिट्यूशन्स (१८७६), डिसर्टेशन्स ऑन अर्ली लॉ अँड कस्टम (१८८३), पॉप्युलर गर्व्हनमेंट (१८८५), इंटरनॅशनल लॉ (१८८८) इ. त्याचे इतर ग्रंथ उल्लेखनीय आहेत. फ्रॉन्समधील कां येथे त्याचे निधन झाले.

राव, सुनीती