मेनन,ओ. चंतु : (१८४६–१८९९). आधुनिक मलयाळम् कादंबरीकार. त्यांचा जन्म उत्तर केरळमध्ये एका नायर कुटुंबात झाला. शिक्षण संपल्यानंतर ते न्यायालयात कनिष्ठ पदावर रुजू होऊन पुढे उपन्यायाधीश झाले. इंग्रजी भाषा-साहित्याचा त्यांचा चांगला व्यासंग होता. सर वॉल्टर स्कॉट, जेन ऑस्टेन, लॉर्ड बेकन्सफिल्ड हे त्यांचे आवडते लेखक.
अप्पू नेटुन्नाटी यांची कुंदलता (१८८७) ही मलयाळम्मधील कालानुक्रमाने पहिली कादंबरी असली, तरी गुणवत्तेच्या दृष्टीने ओ. चंतू मेनन यांची इंदु लेखा (१८८९) ही सामाजिक कादंबरीच मलयाळम्मधील सर्वां गपूर्ण अशी स्वतंत्र आद्य कादंबरी म्ह टली जाते.
या कादंबरीची प्रेरणा सामाजिक सुधारणेची आहे. लॉर्ड बेकन्सफिल्डच्या हेन्रीट्टा टेंपल ह्या कादंबरीवरून ती लिहिण्याची प्रेरणा मिळाल्याचे लेखकाने म्हटले आहे. इंदुलेखेत तत्कालीन नायर आणि नंबुद्री समाजाचे अत्यंत वास्तव चित्रण त्यांनी केले आहे. नायर-नंबुद्रीह्या जाती पारंपारिक सरंजामशाही, दुष्ट रूढी, सनातनी संस्कृतीच्या अभिमानी असून त्यांनी अधोगतीचा परमोत्कर्ष गाठल्याचे तीत दाखविले आहे. विवाह हा त्यांच्यात केवळ एक उपचारच असतो. नायक-नायि का माधवन् व इंदुलेखा ही पात्रे तरुणपिढीचे, आधुनिक दृष्टीचे प्रतिनिधी तर पंचू मेनन, सूरी नंपूतिरी हे गतानुगतिकता, कर्मठ रूढीचे प्रतिनिधी असून या दाहोंतील संघर्ष तीत मोठ्या कलात्मकतेने चित्रित केला आहे. नायर व नंबुद्री समाजांची अवनती व दुरवस्था पाहून लेखकाने ह्या दोन्हीही समाजांत सुधारणा व्हाव्यात ह्या हेतूने ही कादंबरी लिहिली. त्यांनी ह्या समाजांतील दुष्ट रूढी, दांभिकता, सनातनीपणा, स्त्रियांवरील अन्याय, अंधश्रद्धा यांवर कठोर प्रहार केले. इंदुलेखेत चित्रित केलेल्या व्यक्तिरेखा अत्यंत जिवंत व चिरस्मरणीय उतरल्या आहेत. ही कादंबरी म्हणजे केरळमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा अत्यंत यशस्वी, प्रभावी व आद्य असा प्रयत्न मानला जातो.
शारदा (१८९२) ही मेनन यांची दुसरी कादंबरी. तिचा पहिला भाग लिहून झाल्यावर मेनन यांचे अचानक निधन झाले व ती अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्याचे प्रयत्न तीन-चार लेखकांनी केले परंतु त्यांना मेनन यांची उंची गाठता आली नाही. न्यायालयाच्या पार्श्वभूमीवरील सरंजामी वर्गातील नायर कुटुंबाच्या अधोगतीची ही कादंबरी असून तिचे कलात्मक मूल्य वरच्या दर्जाचे मानले जाते.
ह्या दोन्ही कादंबऱ्यांतून चंतू मेनन यांचे कादंबरीकार म्हणून असलले असामान्यत्व, त्यांची मौलिकता, समाजसुधारणेची तळमळ व जीवनाविषयीची चिकित्सक दृष्टी यांचा प्रत्यय येतो. आजही ह्या दोन कादंबऱ्यांचे महत्त्व मलयाळम् कादंबरीविश्वात तिळमात्रही कमी झालेले नाही. मलयाळम् साहित्यात आरंभीचे एक श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून मेनन यांना मोठे स्थान आहे.
सुर्वे, भा. ग.
“