मेणरंग चित्रण : भित्तिचित्रांसाठी व अन्य सुट्या चित्रांसाठी वापरात असलेली एक प्राचीन रंगपद्धती. मेणात रंगद्रव्ये,. बंधकद्रव्ये व काही प्रमाणात लाखद्रव्ये मिसळून, मेणमिश्रण तापवून त्या माध्यमाद्वारा काढलेली चित्रे म्हणजे मेणरंगचित्रण. ही पद्धती मुख्यतः दोन प्रकारे वापरात आली : (१) तापविलेल्या मेणात रंगद्रव्ये व बंधके मिसळून चित्रफलकाला लावणे. ह्यात ज्वलनक्रिया होत नाही. (२) मेणात रंगद्रव्ये व बंधके मिसळून ते तापवून चित्रफलकावर लावणे व नंतर चित्रावर ज्वलनक्रिया करणे. ह्या पद्धतीला ‘इन्कॉस्टिक’ म्हणतात.
(१) रंगद्रव्ययुक्त मेण तापवून लावण्याची पद्धत : ह्या पद्धतीत रंगद्रव्ये, बंधकद्रव्ये व लाखद्रव्ये मेणात मिसळतात व ते मिश्रण तापवून अशा प्रकारचे मेणयुक्त रंग कुंचल्याच्या किंवा बोथट सुरीच्या (स्पॅच्यूला) द्वारा चित्रफलकावर लावतात. हे फलक लाकूड, कापड किंवा भिंतीच्या स्वरूपाचे असतात. भिंत रंगविण्यापूर्वी त्यावर मेणाचा थर देतात व चिकणरंग पद्धतीने रंगवून पुन्हा त्यावर मेण लावतात. रंगाचा तजेलदारपणा, टिकाऊपणा, पोताची विविधता व बिनचकाकीपणा हे ह्या पद्धतीचे विशेष गुण आहेत. ह्या गुणांमुळे आधुनिक चित्रकारांते लक्ष पुन्हा ह्या पद्धतीकडे वळले आहे. विशेषतः सुट्या चित्राकरिता आधुनिक बंधकद्रव्ये व तैलद्रव्ये ह्यांचा उपयोग करून ह्या पद्धतीवर प्रयोग चालू आहेत.
(२) मेणरंग-ज्वलनक्रिया (इन्कॉस्टिक) तंत्र : ह्या पद्धतीत रंगद्रव्ये व बंधक अशी लाखद्रव्ये गरम करून वितळलेल्या मेणात मिसळत. ते विशिष्ट धातूच्या रंगधानीत (पॅलेट) ठेवून ती रंगधानी जळत्या निखाऱ्याने युक्त अशा नळकांड्याच्या आकाराच्या वस्तूच्या (कंटेनर) आधारावर ठेवीत व नंतर कुंचल्याने किंवा बोथट सुरीने हे रंग लावीत. कुंचले हाताळणे सुलभ जावे म्हणून सोयीनुसार चित्रफलक तापवून गरम करीत. रंगचित्रणाची क्रिया पूर्ण झाल्यावर गरम उपकरण चित्राच्या सर्व भागावर समानतेने फिरवून-सर्वदूर अंतर सारखे ठेवून-ज्वलनक्रिया करण्यात येत असे. ह्या क्रियेमुळे मूळ चित्रात काहीही फरक न होता ते एकजीव व भक्कम होत असे. त्यानंतर ते तलम कापसाने पुसण्यात येत असे. ही चित्रे अतिशय तजेलदार रंगाची, विविध पोत व परिणाम यांनी युक्त व अत्यंत टिकाऊ असत.
ह्या पद्धतीचा उगम अभिजात ग्रीक काळात झाला. ग्रीकांच्या तंत्रासंबंधी तपशीलवार माहिती किंवा चित्रांचे अवशेष यांपैकी काहीही उपलब्ध नाही. पण त्यासंबंधीचे उल्लेख मात्र आढळतात. ह्या पद्धतीचा वापर प्रामुख्याने शवपेटीवरील व्यक्तिचित्रे रंगविण्यासाठी केला गेला. अशी चित्रे ईजिप्तमधील फायूम या प्रदेशात सापडली आहेत. ती ‘फायूम चित्रे’ म्हणून ओळखली जातात. उदा., पोर्ट्रेट ऑफ अ बॉय (दुसरे शतक) हे न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट’ मधील चित्र. ईजिप्तमध्ये (फायूम येथे) जरी ही चित्रे सापडली असली, तरी ती मुळात ग्रीक चित्रकारांनी रंगवली असावीत, असे मानले जाते. थोरल्या प्लिनीने (इ. स. सु. २४–७९) ह्या पद्धतीचे साकल्याने वर्णन केले आहे व पुढे थीओफ्रॅस्टस व डायसकॉरिडीझ ह्यांनीही ह्या पद्धतीचा उल्लेख केला आहे.
ह्या पद्धतीतील क्रिया सामग्री यांच्या बोजडपणामुळे व क्लिष्टतेमुळे, तसेच तैलरंग व इतर माध्यमांच्या शोधामुळे, ही पद्धत आठव्या-नवव्या शतकांत लोप पावली.
पण ह्या शैलीतील चित्रांचा अत्यंत टिकाऊपणा व वर उल्लेखलेले अन्य गुण लक्षात घेता, अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील चित्रकारांचे लक्ष पुन्हा या पद्धतीकडे वळले व त्यांनी काही भित्तिचित्रे ह्या पद्धतीत रगंविली. १८३१ च्या सुमारास यूलीउस श्नोर फोन कारोल्सफेल्ट ह्याने म्यूनिकमध्ये या तंत्राने काही दृश्ये रंगविली.
आधुनिक काळात ह्या पद्धतीच्या विशिष्ट गुणांमुळे सुट्या चित्रांकरिता तिचे पुनरूज्जीवन करण्याकडे चित्रकारांचे लक्ष वेधले आहे. आधुनिक विज्ञान व विद्युत् उपकरणांच्या विविध शोधांमुळे, रंगधानी तापवत ठेवण्याची व ज्वलनक्रिया सुलभ करण्याची क्रिया पुष्कळ सुकर झाली आहे. त्यामुळे चित्रकार ह्या पद्धतीकडे आकर्षित होत आहेत. एक अत्यंत टिकाऊ माध्यम म्हणून ह्या पद्धतीचे स्थान अढळ आहे.
संदर्भ : Pratt, Frances Frizell, Becca, Encaustic Materials and Methods, New York, 1949.
गोंधळेकर, ज. द. करंजकर, वा. व्यं.
“