मेडावर, सर पिटर ब्रायन : (२८ फेब्रुवारी १९१५ – ). ब्रिटिश जीववैज्ञानिक व वैद्यकीय शास्त्रज्ञ. उपार्जित प्रतिरक्षात्मक (रोगप्रतिकारक्षमताविषयक) सहिष्णूतेच्या शोधाकरिता मेडावर यांना ⇨ सर फ्रँक मॅकफार्लेन बर्नेट यांच्याबरोबर १९६० सालचे शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले.

मेडावर यांचा जन्म रीओ दे जानेरो (ब्राझील) येथे झाला. शिक्षण मार्लबरो कॉलेज व मॅग्डालीन कॉलेज (ऑक्सफर्ड, इंग्लंड) येथे झाले. पदवी संपादन केल्यावर सर हॉवर्ड फ्लोरी यांच्या विकृतिविज्ञान (रोगाचा उद्‌गम, स्वरूप व प्रसार यांच्या अभ्यासाच्या शास्त्राच्या) प्रयोगशाळेत काही दिवस काम केल्यामुळे त्यांना वैद्यकीय जीवविज्ञानात संशोधन करण्याची आवड उत्पन्न झाली. १९३५ मध्ये त्यांना मॅग्डालीन कॉलेजमध्ये ख्रिस्तोफर वेल्श शिष्यवृत्ती मिळाली व तेथेच वरिष्ठ प्रयोग-निर्देशक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९३८ मध्ये त्यांना त्या कॉलेजचे फेलोपद मिळाले. त्यानंतर ते ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राणिविज्ञानाचे व्याख्याते (१९३८–४७), बर्मिंगहॅम विद्यापीठात प्राणिविज्ञानाचे मॅसन प्राध्यापक (१९४७–५१), लंडन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात प्राणिविज्ञानाचे जॉर्डेल प्राध्यापक (१९५१–६१) आणि लंडन येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थचे संचालक (१९६२–७१) होते. १९७१ मध्ये ते क्लिनिकल रिसर्च सेंटरच्या शस्त्रक्रियाविज्ञानाच्या विभागाचे प्रमुख झाले. ते रॉयल इन्स्टिट्यूशनमध्ये प्रायोगिक वैद्यकाचे प्राध्यापकही आहेत.

प्रारंभी त्यांनी ⇨ ऊतकसंवर्धनातील वृद्धि-नियंत्रक घटकांसंबंधी संशोधन केले पण दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांचे लक्ष वैद्यकीय जीवविज्ञानाकडे वळाले. जायबंदी झालेल्या तंत्रिका (मज्जा) पक्क्या एकत्रित करण्यासाठी व तंत्रिका प्रतिरोपण त्याच्या योग्य स्थानी धरून ठेवण्यासाठी जैव आसंजक (चिकटविणारा पदार्थ) म्हणून उपयोगी पडणारा फायब्रिनोजेन या रक्त साखळविणाऱ्या प्रथिनाचा संहत (प्रमाण जास्त असलेला) विद्राव त्यांनी तयार केला.

युद्धात मरण पावलेल्या अनेक व्यक्तींतील भाजण्याकडे झालेल्या भयानक जखमांमुळे वैद्यकीय संशोधन परिषदेच्या विनंतीवरून मेडावर यांनी भाजलेल्या व्यक्तीवर दुसऱ्या व्यक्तीच्या त्वचेच्या केलेल्या प्रतिरोपणाचा शरीरात स्वीकार न होण्याच्या कारणांचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. त्यांना असे दिसून आले की, प्रत्येक व्यक्तींत स्वतःचे प्रतिरक्षा तंत्र विकसित होते आणि प्रतिरोपण टिकण्याचा कालावधी त्वचा देणारी व्यक्ती व घेणारी व्यक्ती यांमध्ये किती निकटचे नाते आहे यावर अवलंबून असतो. एकयुग्मजीय वा एकसम जुळ्यांतच नव्हे, तर द्वियुग्मजीय वा भ्रात्रीय जुळ्यांमध्येही [⟶ गर्भधारणा व गर्भबाहुल्य] परस्परांमधील प्रतिरोपण यशस्वी होते, असे मेडावर यांना आढळले. गुरांमधील जुळ्या भ्रूणांत ऊतकांचा (विशेषतः रक्तातील तांबड्या कोशिकांच्या-पेशींच्या-पूर्वगामींचा) परस्परांत विनिमय होतो, असे पूर्वीच आर्. डी. ओएन यांनी दाखविले होते. यावरून बर्नेट यांनी असे सुचविले की, गर्भधारणेच्या वेळी प्रतिरक्षात्मक तंत्र विकसित होत नाही, तर ते क्रमाक्रमाने उपार्जित किंवा संपादित केले जाते. यामुळे जर एखाद्या प्राण्याच्या भ्रूणामध्ये भावी दात्याचे एखादे ऊतक अंतःक्षेपित केले, तर जन्मानंतर तो प्राणी त्या दात्याच्या कोणत्याही प्रतिरोपणास सहिष्णू व्हावयास पाहिजे. मेडावर यांनी या गृहीतकाची चाचणी घेण्यासाठी उंदरांच्या भ्रूणांत अन्य उंदरांच्या ऊतकांचे अंतःक्षेपण केले आणि त्यावरून या बाह्य ऊतकाला प्रतिकार करणारी ⇨ प्रतिपिंडे निर्माण करण्याची क्षमता भ्रूणात नसते पण त्याला त्या ऊतकाच्या बाबतीत प्रतिरक्षात्मक सहिष्णूता प्राप्त होते, हे त्यांनी पडताळून पाहिले. अशा उंदरांमध्ये दात्या उंदराच्या त्वचेचे प्रतिरोपण यशस्वी होते, असे त्यांना दिसून आले. यावरून कृत्रिम रीत्या उपर्जित प्रतिरक्षात्मक सहिष्णूता उत्पन्न करता येते, असे त्यांनी सिद्ध केले. उपर्जित सहिष्णूतेच्या शोधामुळे प्रतिरोपण क्षेत्रातील उपरुग्ण संशोधनास मोठी प्रेरणा मिळाली. सध्या मेडावर याच सिद्धांताच्या आधारे कर्करोगावरील लसीसंबंधी संशोधन करीत आहेत.

नोबेल पारितोषिकाखेरीज रॉयल सोसायटीचे रॉयल पदक (१९५९) व कॉप्ली पदक (१९६९), नाइट ही किताब (१९६५), युनेस्कोचे कलिंग पारितोषिक (१९८६) वगैरे सन्मान त्यांना मिळाले आहेत. रॉयल सोसायटी, अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस वगैरे अनेक मान्यवर संस्थांचे ते सदस्य आहेत. द युनिकनेस ऑफ द इंडिव्हिज्युअल (१९५९), द फ्युचर ऑफ मॅन (१९६०), द होप ऑफ प्रोग्रेस (१९७२), ॲडव्हाइस टू ए यंग सांयटिस्ट (१९७९), द लिमिट्स ऑफ सायन्स (१९८४) वगैरे कित्येक प्रभावी ग्रंथ त्यांनी लिहिलेले असून विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्यातील त्यांची कामगिरी प्रसिद्ध आहे.  

कानिटकर, बा. मो. भालेराव, य. त्र्यं.