मेडान : इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावरील सर्वांत मोठे शहर व उत्तर सुमात्रा राज्याची राजधानी. लोकसंख्या १९,६६,००० (१९८३), हे ईशान्य सुमात्रामध्ये डेली नदीकाठी, नदीमुखापासून आत २५ किमी. वर वसले आहे. नदीमुखावरील बलावान हे त्याचे सागरी बंदर आहे.

द्वितीय महायुद्धोत्तर काळात हे परिसरातील शेतमालाचे व्यापारकेंद्र बनले असून तंबाखू, रबर, पामतेल, कृत्रिम धागे, चहा आणि कॉफी यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात येथे चालतो. यंत्रे व फरश्यांचे उत्पादन महत्त्वाचे आहे. शहरात तंबाखू संशोधन केंद्र, कृषी संशोधन संस्था तसेच राज्य विद्यापीठ व इस्लामी विद्यापीठ अशी दोन विद्यापीठे आहेत. येथे विमानतळ असून हे पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. तोबा सरोवरप्रदेशाचे हे प्रवेशद्वार मानले जाते. राज्यपालाचे निवासस्थान, सुलतानाचा राजवाडा ही शहराची वैशिष्ट्ये. हवाईमार्ग, लोहमार्ग व सडका यांनी शहर ईशान्य सुमात्रातील अन्य भागांशी जोडलेले आहे.

मिसार, म. व्य.