मेंदूप्रक्षाळण : (ब्रेनवॉशिंग). दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर चिनी व उत्तर कोरियन साम्यवाद्यांनी युद्धकैद्यांचे वैचारिक किंवा विचारप्रणालीय परिवर्तन घडवून आणण्याच्या हेतूने शारीरिक व मानसिक दडपण आणण्याचे जे विशिष्ट तंत्र वापरले, त्यास ‘ब्रेनवॉशिंग’ (मेंदूप्रक्षाळण) ही संज्ञा एडवर्ड इंटर या मनोवैज्ञानिकाने दिली. आता ही संज्ञा इतकी रूढ झाली आहे, की व्यक्तीच्या कोणत्याही अतर्क्य अशा विचारपरिवर्तनाला किंवा पवित्रा–बदलास (ती व्यक्ती जर त्यावेळी दुसऱ्याच्या ताब्यात किंवा प्रभावाखाली असेल तर) तिचे मेंदूप्रक्षाळण झाले असे म्हणतात. ह्या तंत्राला मानसशास्त्रज्ञ ‘कोअर्सिव्ह पर्सूएशन’ किंवा ‘जबरी विचारपरिवर्तन’ म्हणतात. हे तंत्र पोलिसांच्या तथाकथित ‘थर्ड डिग्री’ (चौदावे रत्न)- छळाच्या पद्धतीपेक्षा वेगळे असून अधिक परिणामकारक आहे. थर्ड डिग्री तंत्राने आरोपी फारतर गुन्ह्याची कबुली देईल पण त्याचे विचारपरिवर्तन होणार नाही.
या तंत्राचे व त्यामुळे होणाऱ्या मानसिक परिणामांचे विश्लेषण ‘डी.डी.डी. सिंड्रोम’ म्हणजे ‘डेबिलिटी’ अथवा दौर्बल्य, ‘डिपेन्डन्सी’ अथवा पराधीनता व ‘ड्रेड’ अथवा दहशत लक्षणसमूह असे केले जाते. चिनी साम्यवाद्यांनी युद्धकैद्यांच्या शारीरिक व मानसिक गरजा अतृप्त राखून त्यांच्यामध्ये मनोदौर्बल्य निर्माण केले. त्यांना दिवसेंदिवस विश्रांती किंवा झोपसुद्धा मिळू न देता दूरवर कूच करावयास किंवा अन्य श्रम करावयास भाग पाडून त्यांच्यात अतिथकवा (एक्झॉशन) आणला. त्यांना एकाकी ठेवून, अत्यल्प अन्नपाणी देऊन, सतत भुकेले-तहानलेले ठेवले. साध्यासुध्या औषधोपचारालाही नकार देऊन त्यांच्यामध्ये रोगराई व मृत्यूचे भय निर्माण केले. त्यांना सतत दीर्घकाळ प्रश्न विचारीत राहून त्यांच्या शारीरिक व मानसिक थकावटीत त्यांच्या कानावर सतत साम्यवादी मतप्रमाणालीच्या प्रचाराचा भडिमार केला व त्यांच्याकडून स्वतःची, अमेरिकन राष्ट्राची आणि यूनोची निंदानालस्ती करणारे कबुलीजबाब लिहून घेतले तसेच त्याचा आपल्या विचारप्रणालीच्या प्रचारकार्यात उपयोग करून घेतला. दौर्बल्य, पराधीनता व दहशत यांमुळे माणसाची बुद्धी काम करेनाशी होते, त्याच्या स्व-कल्पनेला (सेल्फ-कन्सेप्ट) जबरदस्त धक्का बसतो, त्याचे वैचारिक विघटन होते, आत्मविश्वास नष्ट होतो, मानसिक तोल ढळतो व तो सतत कानावर पडणाऱ्या प्रचाराला बळी पडून सांगाल तसे काम करावयास तयार होतो. याचबरोबर साम्यवाद्यांनी साधक अभिसंधान, धन व ऋण प्रबलन, प्रबलन-अभिभ्रम इ. मनोवैज्ञानिक शिक्षण तत्त्वांचा कुशलतेने उपयोग करून युद्धकैद्यांमध्ये इष्ट त्या मनोवृत्ती निर्माण केल्या. परिणामी या युद्धकैद्यांनी आपण स्वतः साम्यवादी असल्याची ग्वाही दिली, नभोवाणीवर साम्यवादी प्रचाराची भाषणे केली व युद्ध संपल्यावर सुटका होताच स्वतःच्या मायदेशी परत जाण्यास नकार दिला.
या मेंदूप्रक्षाळणामध्ये साम्यवाद्यांना कितपत यश मिळाले, याची शंकाच आहे. त्याना युद्धकैद्यांकडून आपण मानवजातीविरुद्ध गुन्हा केल्याचा कबुलीजबाब लिहून घेण्यात व आपल्या प्रचारकार्यामध्ये त्यांचा सहकार मिळविण्यात यश मिळाले हे खरे पण ते यश टिकाऊ नव्हते. युद्ध संपल्यानंतर युद्धकैद्यांना परत मायदेशी पाठवण्यासाठी जेव्हा हाँगकाँगला आणले गेले, तेव्हा साम्यवादी मतप्रणालीला चिकटून राहून मायदेशी जाण्यास नकार देणारे युद्धकैदी फारच थोडे निघाले. बहुतेक जण मायदेशी परत जाऊन पुन्हा पूर्वीच्या विचार प्रणालीकडे वळले. अधिक खोल विश्लेषण केल्यावर असे आढळून आले, की मेंदूप्रक्षाळणाला कायमचे बळी पडणारे लोक बहुशः त्या त्या देशांतील समाजाच्या निम्न स्तरामधील होते, ग्रामीण विभागात राहणारे होते, त्यांच्यात पहिल्यापासूनच, ‘आपण दलित आहोत’, ‘आपणावर समाज अन्याय करत आहे’ अशी भावना घर करून होती. ते नवतरुण होते व बुद्धीनेही कमी दर्जाचे होते. त्यामुळे मायदेशाच्या समाजाशी व चिचारधारांशी त्यांचे सात्मीकरण जवळजवळ झालेलेच नव्हते.
संदर्भ : 1. Brown, J.A. Techniques of Pursuation, Hammondsworth, 1963.
2. Farber, I. E. Harlow, H. E. West, L. G. “Brain Washing Condition and D. D. D. Syndrome”, Sociometry. 1960, 20 Pages 271-285.
3. Hunter, E. Brain Washing in Red China, New York, 1958.
4. Schein, E. H. Schneier, I. Barker, C. H. Coersive Pursuation, New York, 1961.
भोपटकर, चिं. त्र्यं.