मूळ-२ : काही अपवाद वगळल्यास, सर्व वाहिनीवंत (पाणी आणि अन्नरसाची ने-आण करणारे घटक असलेल्या) वनस्पतींत [⟶ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी विभाग वनस्पति, बीजी विभाग] त्यांना जमिनीत घट्ट धरून ठेवल्यास व पाण्याचे शोषण करण्यास आवश्यक असे अंतर्बाह्य विशेषत्व असलेले इंद्रिय असते व त्यास ‘मूळ’ ही संज्ञा आहे. वाहिनीवंत अबीजी वनस्पतींपैकी ⇨ सायलोफायटेलीझ व ⇨ सायलोटेलीझ ह्या प्रारंभिक वनस्पतींच्या गणांमध्ये अंतर्भूत असलेल्यांना मुळे नसून त्याऐवजी मुळांचे कार्य करणारे मुळांसारखे (मूलकल्प) साधे अवयव असतात व तसेच अवयव बऱ्याच अबीजी वनस्पतींतही आढळतात (उदा., शैवले, शेवाळी).

मुळांचा विकास : वाहिनीवंत वनस्पतींच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) प्रथम खोड व पान व त्यानंतर मूळ आले असावे. मूलक्षोड (मुळे किंवा तत्सम अवयव असलेला जमिनीत वाढणारा भाग) हे पहिले स्थैर्य देणारे इंद्रिय असून त्याच्या ⇨ अपित्वचेपासून (सर्वांत बाहेरच्या त्वचेपासून) निघणाऱ्या मूलकल्पांनी शोषणाचे कार्य प्रथम केले पुढे ह्या प्राथमिक अक्षाचा विकास चालू असताना मूळ व खोड यांची कार्ये स्वतंत्र झाली व त्याबरोबरच प्रभेदन (विशेषत्वामुळे येणारा संरचनेतील बदल) आणि शारीरिक लक्षणांत फरक झाला. सापेक्षतः मुळांचा विकास बराच मर्यादित झाल्याने ते साधे राहिले. त्यामुळे काही प्रारंभिक लक्षणे अद्यापही त्यात आढळतात. जमिनीतील परिस्थिती फारशी न बदलत राहिल्याने व मुळांचा क्रमविकास अलीकडे झाल्याने प्ररोहापेक्षा (खोड, पाने व पुनरूत्पादक अवयव यांपेक्षा) मूळ विकासात मागे राहिले.

सामान्य लक्षणे : मूळ कित्येक बाबतींत खोडापासून भिन्न असते. मुळांवर पाने, फुले, कळ्या, पेरी, कांडी व पर्णव्रणांक (पानाच्या तळाच्या खुणा) नसतात. त्यांच्या टोकाशी संरक्षक व टोपीसारखे आच्छादन (मूलत्राण) असते व त्यामागे काही अंतरावर सूक्ष्म केस (मूलरोम) असतात (आ. १). मूलत्राण व मूलरोम यांमधील भागात मुळाची लांबी जास्तीत जास्त वाढत राहाते, म्हणून या भागास मुळाचे वृद्धिक्षेत्र म्हणतात. तसेच मुळाच्या टोकाकडून मागे जावे तसे क्रमाने मोठ्या होत जाणाऱ्या (अग्रवर्धी अनुक्रम) शाखा (उपमुळे) असून त्यांचा उगम आतील ऊतकांपासून (समान रचना आणि कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांपासून) होता [अंतर्भव ⟶ परिरंभऊतककर]. खोड व मूळ यांच्या अंतर्रचनेतही फरक आहे [⟶ शारीर, वनस्पतींचे]. मुळाची वाढ त्यांच्या टोकास असलेल्या विभज्येपासून (सतत कोशिका विभाजनाने वाढ होणाऱ्या भागापासून) आणि अंतर्वेशी (शरीराच्या इतर अवयवांमधील) व पार्श्विक (बाजूच्या) विभज्येपासून [⟶ विभज्या] होते तसेच काही मुळांत द्विदलिकतांच्या (बीजात दोन दलिका असलेल्या वनस्पतींच्या) खोडाप्रमाणे द्वितीयक वृद्धीमुळे (नंतर बनलेल्या कोशिकांच्या निर्मीतीमुळे) जाडी वाढत राहते. सर्वसाधारणपणे मुळे प्रकाशविरुद्ध,जलसान्निध्याकडे व पृथ्वीच्या केंद्राकडे वाढत राहतात. [⟶ खोड]

माध्यम व काही प्रकार : बहुतेक वनस्पतींची मुळे जमिनीत वाढत असली, तरी काहींची मुळे जमिनीवर हवेत वाढतात. त्यांना ‘वायवी’ म्हणतात. ⇨ ऑर्किडेसी अथवा आमर कुलातील काही वनस्पतींची [⟶ अपिवनस्पति] मुळे हवेत लोंबत राहतात (आ. २) व त्यांवरच्या जलशोषक अपित्वचेद्वारे हवेतील ओलावा शोषून घेतात. मिरवेल, अंजनवेल, नागवेल, पोथॉस ऑरिया इत्यादींची मुळे आधारास घट्ट चिकटून राहण्यास उपयुक्त असतात, त्यांना ‘आरोही मुळे’ (आ. ३) म्हणतात. वडाच्या पारंब्या प्रथम फांदीपासून निघून लोंबत वाढतात व नंतर जमिनीत पोहोचून स्तंभाप्रमाणे आधार देतात (आ. ४). तसेच केवडा, कांदळ इत्यादींच्या खोडांपासून निघणारी जाडजूड ‘आधार मुळे’ खोडास जमिनीवर आधार (आ. ५) देतात लाल सावरीच्या बुंध्याजवळ उभ्या फळ्यांप्रमाणे काही आधार-मुळे भोवती असतात (आ. ६). समुद्रकिनाऱ्यावर चिखलात वाढणाऱ्या चिपी, कांकरा, तिवर व कांदळ (आ. ७) यांसारख्या झाडांची काही उपमुळे खालून वर हवेकडे वाढतात व त्यांच्याद्वारे जमिनीखालच्या भागास श्वसनाकरिता हवेचा पुरवठा होतो, त्यांना ‘श्वसन-मुळे’ म्हणतात. जुसियाची फुगीर व ⇨ वायूतक (हवा खेळण्यास सोयीचा विरळ कोशिकासमूह) असलेली मुळे श्वसनास व पाण्यात तरंगण्यास उपयुक्त असतात त्यांना ‘तरंड-मुळे’ म्हणतात (आ. ८). बांडगूळ, हाडमोड, अमरवेल इत्यादींची जी मुळे आश्रय झाडांवर या वनस्पती वाढून त्यांचे अन्न शोषून घेतात. त्यांना ‘शोषक म्हणतात’ (आ. ९). गुळवेलीची व काही ऑर्किडांची लोंबती मुळे हरितद्रव्याच्या साहाय्याने प्रकाशात अन्ननिर्मीती करतात.

आयुर्मान : जास्तीत जास्त एकच वर्ष (व कमीत कमी एक ऋतू) जगणाऱ्या ⇨ ओषधींची मुळे ‘एकवर्षायू’ व त्यापेक्षा अधिक पण दोन वर्षापेक्षा कमी आयुष्य असणाऱ्या वनस्पतींची मुळे ‘द्विवर्षायू’ असतात (उदा., बीट, गाजर, सलगम इ.) ही द्विवर्षायू मुळे जीवनाच्या पहिल्या ऋतूत अन्नाचा साठा करतात प्ररोहाला पुढचा काल प्रतिकूल ठरून त्याचा नाश झाला, तरी ती मुळे जीवन-सातत्याला उपयुक्त ठरतात आणि पुढे अनुकूल कालात प्ररोहाच्या वाढीस व जीवनास उपयुक्त ठरतात. मुळातील संचित अन्नावर नवीन पाने, फुले, फळे व बीजे यांची निर्मीती होते. सतत वाढत राहून कार्य करणाऱ्या मुळांना ‘बहुवर्षायू’ म्हणतात (उदा., अनेक वृक्ष व झुडपे). काही वनस्पतींचा प्ररोह वर्षायू परंतु मुळे द्विवर्षायू (उदा., डेलिया) अथवा बहुवर्षायू (उदा., गुलबुश) असतात तसेच समशीतोष्ण प्रदेशात वर्षायू मुळे येणाऱ्या वनस्पती उष्ण कटिबंधात वाढविल्यास त्यांची मुळे वर्षापेक्षा अधिक जगतात.


मूल तंत्र : (मूल संख्या). बीज रुजल्यावर सुरुवातीस [⟶ अंकुरण] प्रथम ‘मोड’ [ आदिमूल ⟶ बीज] येतो व तो जमिनीत वाढून त्यापासून जे मूळ बनते ते ‘प्राथमिक’ मूळ होय. नवीन वनस्पतीच्या जीवनास येथे आरंभ होतो. काही वनस्पतींत (एकदलिकित उदा., मका) ह्या मुळाची वाढ लवकर थांबते व खोडाच्या तळभागापासून अनेक नवीन मुळे येतात, त्यांना ‘आगंतुक’ मुळे म्हणतात. अनेक द्विदलिकित फुलझाडे [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] आणि प्रकटबीज वनस्पतींत प्राथमिक मूळ सतत वाढत राहून त्यावर अनेक उपमुळे येतात अशा प्रमुख मुळास ‘प्रधान मूळ किंवा सोटमूळ’ म्हणतात (आ. १). प्रधान मुळावर येणाऱ्या दुय्यम व तिय्यम शाखा व उपशाखांचे मिळून ‘प्रधानमूल तंत्र’ बनते. सर्व प्रकटबीज वनस्पतींत (उदा., सायकस, पाइन इ.) व द्विदलिकित फुलझाडांत प्रधानमूल तंत्र असते प्रधान मूळ हा मुख्य मध्यवर्ती अक्ष असून तो अधिक खोलवर जातो व त्याची जाडी इतरांपेक्षा अधिक असते तो काष्ठमय असून त्यावर तशाच मोठ्या व काष्ठमय फांद्या (उपमुळे) असतात [उदा., ⟶ वृक्ष], काहींत [उदा., ⟶ ओषधी] मुख्य अक्ष व त्यावरच्या फांद्या बारीक असतात.सर्व एकदलिकित फुलझाडे (उदा., गवते) व अनेक वाहिनीवंत अबीजी वनस्पती यांमध्ये बहुधा तंतूसारख्या आगंतुक मुळांचे तंत्र असते (आ. १०) अशी आगंतुक मुळे अनेक वनस्पतींच्या कोणत्याही भागापासून [ उदा., ⟶ बिग्‌नोनिया व ⟶ पानफुटीची पाने, कण्हेर व गुलाबाची कलमे इ.] येतात त्या प्रत्येकावर लहान उपमुळे असतात. कित्येक वनस्पतींच्या मूल तंत्रात फक्त अनेक तंतूसारखी मुळेच असतात आणि त्यांतील बहुतेक आगंतुक मुळे असतात त्यांची जाडी व लांबी सारखीच असते त्याला ‘ तंतू मूल तंत्र’ म्हणतात. कधी प्रधान मुळापासून निघालेली अनेक उपमुळे मर्यादित वाढीमुळे सारखीच राहतात व त्यांचे तंतू मूल तंत्र बनते. डेलियाचे मूल तंत्र याच प्रकारचे परंतु मांसल मुळांचे असते.

मूल तंत्राचा विस्तार त्या त्या वनस्पतीच्या ⇨ आनुवंशिकतेवर व ती ज्या जमिनीत वाढते तिची सरंध्रता (भुसभुशीतपणा), वायुमिश्रण व पाण्याची उपलब्धता यांवर अवलंबून असतो. बहुधा मूलविस्तार मोठा असून तो बाजूस किंवा खोलपर्यंत कमीअधिक वाढतो व मूलरोमांचा संपर्क असंख्य मृत्तिकाकणांशी येतो. काही वनस्पतींचे मूल तंत्र इतके विस्तारित असते की, त्याखेरीज उरलेला वनस्पतीच्या प्ररोहाचा भाग फारच थोडा असतो. बहुतेक वृक्षांच्या मुळांचा प्रमुख भाग जमिनीच्या १ मी. खोलीपर्यंत आढळतो तथापि ती सर्व मुळे बाजूस इतकी पसरलेली असतात की, जमिनीवरच्या खोडावरच्या फांद्यांच्या टोकापेक्षा ती बरीच दूरवर पसरलेली (पण जमिनीखाली) असतात. मूल तंत्राचे एकंदर स्वरूप उपमुळांचा उगम व वाढण्याच्या प्रकारामुळे बदललेले आढळते परंतु त्या सर्वांचा समावेश वर उल्लेखिलेल्या दोन प्रमुख तंत्रांपैकी एकात होतो.

  मूळ व त्याचे प्रकार : (१) प्रधानमूल तंत्र (सूर्यफूल : (अ) मूलत्राण, (आ) मूलरोम, (इ) प्रधान मूळ, (ई) उपमूळ, (उ) अधराक्ष (२) वायवी मुळे (ऑर्किड) (३) आरोही मुळे (अंजनवेल) (४) (अ) पारंब्या (वड), (आ) स्तंभमूळ (वड) (५) आधार-मुळे (केवडा) (६) आधार-मुळे (लाल सावर) (७) श्वसन-मुळे (जुसिया) (९) शोषक- मुळे (अमरवेल) (१०) आगंतुक मूल तंत्र (गवत) (११) शंक्वाकृती मूळ (गाजर) (१२) भोवऱ्यासारखे मूळ (बीट)(१३) लुंठसम मूळ (मुळा)(१४) हस्ताकृती मूळ (सालंमीश्री)(१५) गाठाळ मुळे (आंबे हळद)(१६) मणिमालाकृती मुळे (मयाळ)(१७) वलयांकित मुळे (इपेकॅक)(१८) प्रवालसम मुळे (सायकस)(१९) कर्षण-मुळे (अळू)(२०) पिटिकायुक्त मुळे(भुईमूग)(२१) आगंतुक ग्रंथिल मुळे : अ-रताळे, आ-डेलिया


विशिष्ट प्रकार व कार्ये : प्ररोहास स्थैर्य देणे व जमिनीतून पाणी व खनिज लवणे शोषून घेऊन ती वर प्ररोहात पाठविणे हे मुळांचे सामान्य कार्य असल्याने त्याला अनुलक्षून असलेल्या काही प्रकारांबद्दल वर माहिती दिली आहे [⟶ वनस्पति व पाणी वनस्पतीचे खनिज पोषण]. यांशिवाय काही अन्य कार्येही मुळे करतात : अनेकदा प्रधान मूळ अन्नसंचयामुळे फुगून मांसल बनते उदा., गाजर, मुळा, बीट, गुलबुश, अजमोदा इत्यादी (आ. ११, १२, १३). इतर काही वनस्पतींत (उदा., डेलिया, सालंमिश्री, रताळे, शतावरी इ.) आगंतुक मुळे मांसल बनतात. फुगलेल्या मुळांना भिन्न आकार [उदा., शंक्वाकृती : शंकूसारख्या (आ.११), भोवऱ्यासारखा (आ. १२), लुंठसम : लाटण्यासारखा (आ. १३), हस्ताकृती : हाताच्या पंजासारखा (आ. १४), ग्रंथिल : गाठाळ (आ. १५), मालाकृती : मणिमालेसारखा (आ. १६) इ.] प्राप्त झाल्याचे आढळते. ⇨ इपेकॅकची मुळे (आ. १७) एकावर एक रचलेल्या गोल कड्यांप्रमाणे (वलयांकित) दिसतात. बीटाच्या मांसल मुळाचा काही भाग अधराक्षाचा (आदी मूलाच्या वरच्या भागाचा) असतो. अकँथोऱ्हायझा [⟶ पामी] या एका ताल वृक्षाच्या काही वायवी मुळांचे काट्यांत रूपांतर होऊन ते संरक्षणास उपयुक्त ठरतात. ⇨ सायकसाच्या खोडाच्या तळाशी साधारणपणे जमिनीलगतच अनेक लहान उपमुळे द्विशाखाक्रमाने वाढून प्रवाळासारखी (प्रवालसम, आ. १८) दिसतात. त्यामघ्ये काही अंतर्वनस्पती [दुसऱ्या वनस्पतीत फक्त आश्रय घेणारी वनस्पती ⟶ अपिवनस्पति] उदा., नॉस्टॉक-शैवले व काही सूक्ष्मजंतू आढळतात व त्यामुळे तसा आकार प्राप्त होतो. मात्र याचे औचित्य अद्याप वादग्रस्त आहे.

अळू (ॲरम), केशर, रानकांदा, नागदवणा, कांदा, लसूण इत्यादींच्या भूमिस्थित (जमिनीतील) खोडांपासून अनेक शाखाहीन आगंतुक जाड मुळे फुटून खाली वाढतात व वेळोवेळी खोडाजवळच्या भागात आकुंचन पावून खोड विशिष्ट पातळीत घट्ट ओढून धरतात. त्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावर तेथे आडव्या सुरकुत्या पडलेल्या दिसतात. काही सोटमुळांवरही (उदा., डेझी, बाथर) अशीच संकोचशील मुळे किंवा ‘कर्षण-मुळे’ (आ. १९) असतात. कित्येक शिंबावंत [शेंगा येणाऱ्या ⟶ लेग्युमिनोजी] वनस्पतींच्या मुळांवर बारीक गाठी (पुटकळ्या) येऊन त्यांतील विशिष्ट सूक्ष्मजंतू मूळच्या वनस्पतीला नायट्रोजनाचा पुरवठा करतात या मुळांना ‘पिटिकायुक्त’ मुळे (आ. २०) म्हणतात. कृषीमध्ये जमीन सुपीक (नायट्रेटयुक्त) करण्यास अशा पिकांचा (उदा., तूर, मूग, भुईमूग, सनताग इ.) वापर मधून मधून करतात. काही वनस्पतींच्या मुळांवर निसर्गतः कळ्या येतात आणि त्यांपासून नवीन प्ररोह (कोंब) वाढतात (उदा., रताळे, काही गुलाब, रासबेरी), तसेच काही मुळांवर जखमा करून किंवा छाटणी करून त्यांवर नवे कोंब येण्यास उद्युक्त करता येते अशा बाबतीत मुळांचे तुकडे लावून लागवड करता येते [⟶ प्रजोत्पादन]. वनस्पतींच्या भिन्न भागांपासून फुटण्याऱ्या आगंतुक मुळांचा फायदा त्या त्या वनस्पतीच्या विशिष्ट जाती किंवा प्रकार यांची सतत लागवड चालू ठेवण्याकरिता मनुष्याने पूर्वीपासून करून घेतला आहे [ उदा., ऊस, बटाटा, रताळे (आ. २१ अ) व डेलिया (आ. २१ आ), गुलाब इ.] वनस्पतीस अशा प्रकारच्या शाकीय प्रजोत्पादनाचा उपयोग प्रसारार्थ व सातत्य टिकविण्यास झाला आहे. कित्येक मांसल मुळे (गाजर, बीट, मुळा, रताळे) अन्नाकरिता व कित्येक औषधाकरिता (इपेकॅक, ज्येष्ठमध, गुलबुश, शतावरी, सालंमिश्री इ.) मनुष्याने उपयोगात आणली आहेत.

परांडेकर, श. आ.

अलीकडे मुळांच्या कार्याविषयी जे संशोधन झाले आहे त्यावरून असे दिसते की, मुळात ऑक्सिजन, जिबरेलीन, सायटोकायनीन, एथिलीन, ॲबसिसिक अम्ल ह्यांसारखी ⇨ हॉर्मोने असतात. म्हणजे अशा प्रकारच्या हॉर्मोनांचे संश्लेषण (घटक द्रव्यांपासून निर्मीती) मुळात होते आणि ⇨ प्रकोष्ठाद्वारे त्यांचे परिवहन झाडांच्या दुसऱ्या भागाकडे बऱ्याचदा होते. प्रसंगी ⇨ परिकाष्ठाद्वारेही ते घडून येते. सायटोकायनीन व जिबरेलीन यांचे संश्लेषण मुळांच्या अग्रस्थानी मुख्यतः होत असावे असे दिसून आले आहे. मक्यातील मूलत्राणात ॲबसिसिक अम्लाची निर्मीती होते, असे एच्. विल्किन्स व आर्. एल्. वेन यांना १९७४ मध्ये आढळून आले. प्ररोहाच्या कार्यशीलतेवर मुळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असतो. जरी मुळांच्या कोशिकांत प्ररोहाप्रमाणे संश्लेषणाचे सामर्थ असले, तरी काही विशिष्ट पदार्थांकरिता (उदा., थायामीन, निॲसीन, पिरिडॉक्सीन) प्ररोहांवर अवलंबून रहावे लागते. जमिनीतील परिस्थिती अनकूल असल्यास कधी कधी मुळात होणाऱ्या हॉर्मोन संश्लेषणात परिवर्तन झाल्यामुळे काही परिणाम घडून येतात. अशा वेळा मुळांद्वारे होणाऱ्या पाण्याच्या किंवा पोषणद्रव्यांच्या राशीवर हे परिणाम अवलंबून नसतात. आनुवंशिकीच्या साधनांद्वारे मूल तंत्राचा आकार, रूप व क्रिया ह्यांच्या बाबतीत योग्य हाताळणी केल्यास आणि नंतर निवड व शेतात मोठ्या प्रमाणावर चाचणी केल्यास पादप वृद्धी आणि ऊत्पादन ह्या बाबतीत भावी काळात अनपेक्षित पण फायदेशीर फलीते मिळण्याचा मोठा संभव आहे.

जटिल कार्बनी पदार्थांच्या संश्लेषणासाठी बहुतेक वनस्पतींना किंवा प्राण्यांना कार्बनाचा पुरवठा हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडाद्वारे होतो. पेरू देशातील अँडीज पर्वत प्रदेशातील विघटन होत असलेल्या (घटक द्रव्यांत तुकडे होत असलेल्या) पिटावर [⟶ पीट] वाढणारी स्टायलिटीस अँडिकोला ही वाहिनीवंत अबीजी वनस्पती आहे. जॉन किली व इतर शास्त्रज्ञांना अलीकडे संशेधनांन्ती असे आढळून आले आहे की, ह्या वनस्पतीच्या वायवी भागावर जाड उपचर्म असल्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड त्यातून आत जाऊ शकत नाही. शिवाय त्यांच्यात त्वग्रंध्रांचा (पानांच्या व कोवळ्या खोडाच्या त्वचेवरील सूक्ष्म छिद्रांचा) अभाव आहे म्हणून मुळांद्वारे कार्बन डाय-ऑक्साइडाचे शोषण होते.

ज्ञानसागर, वि. रा.

पहा : 1. Core. E. L. Plant Taxonomy, Englewood Cliffs, N. J., 1962.

          2. D’ Almeida, J. F. R. Mullan, D. P. Lessons in Plant Morphology, Bombay, 1946.

          3. Dittmar, H. J. Phylogeny and Form in the Plant Kingdom, New York, 1964.          4. Garg, B. K. New Light on Roots, Science Reporter, May, 1982.

          5. Harder. R. and others, Trans. Bell, P. Coombe, D. Strasburger’s Textbook of Botany, London, 1965.