मूत्र : वृक्काद्वारे (मूत्रपिंडाद्वारे) उत्सर्जित होणाऱ्या द्रवाला त्यामधील विद्राव्य (विरघळणाऱ्या) पदार्थांसहित मूत्र म्हणतात. सर्वसाधारण भाषेत याचा उल्लेख ‘मूत’, ‘लघवी’ किंवा ‘लघ्वी’ व ‘इराकत’ किंवा ‘इरागत’ असाही करतात. वृक्के त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतमुळे (१) कोशिकागुच्छातून [वृक्क एककातील (मूत्र स्त्रवणाऱ्या भागातील) केशवाहिन्यांच्या जाळ्याच्या छोट्या गोळ्यातून], वाहणाऱ्या रक्ताचे निस्यंदन करणे (गाळणे), (२) मूत्रजनन नलिका भागात काही पदार्थांचे स्त्रवण करणे (रक्तातून नलिकेच्या पोकळीत टाकणे), (३) याच भागात पोकळीतील द्रवामधून निवडक पदार्थांचे रक्तामध्ये पुन्हा अभिशोषण करणे आणि (४) सोडियम आयनाबद्दल (विद्युत् भारित अणूबद्दल) हायड्रोजन आयनाची अदलाबदल करणे व अमोनियानिर्मिती या चार प्रक्रियांद्वारे शरीरांतर्गत समस्थिती नेहमी कायम ठेवतात. मूत्रातून शरीरातील चयापचयजन्य (शरीरात सतत होत असणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे तयार होणारे) पुष्कळ टाकाऊ पदार्थ उत्सर्जित होत असले तरी त्वचा, फुप्फुसे व आंत्रमार्ग (आतड्यांचा बनलेला अन्नमार्ग) उत्सर्जन कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावीत असतात. [⟶ उत्सर्जन].

मानवी मूत्रपिंडात प्रत्येकी १०,००,००० कोशिकागुच्छ असतात. एकूण कोशिकागुच्छांच्या निस्यंदक कला (पातळ पटले) कित्येक चौ. मी. क्षेत्र आच्छादू शकतील व त्यांतून होणारे निस्यंदन अतिसूक्ष्म प्रकारचे असते. जवळजवळ १५० लि. रक्त मानवी वृक्कात दर चोवीस तासांत शिरून बाहेर पडते व एवढ्या मोठ्या नित्यंदन कार्यातून त्याच काळात फक्त १·५ लि. मूत्र तयार होते. प्रत्येक अतिसूक्ष्म वृक्क एकक दर तासाला २ मिली. द्रवाचे निस्यंदन करते. चोवीस तासांत तयार होणाऱ्या एकूण मूत्रापैकी / ते / मूत्र दिवसा तयार होते आणि बाकीचे रात्री तयार होते. लहान मुले त्यांच्या वजनानुरूप तीन ते चार पट अधिक मूत्र उत्सर्जित करतात. चोवीस तासांतील मूत्राचे घनफळ प्यायलेले पाणी, अन्नातील पाणी आणि त्वचा (घाम), फुप्फुसे (उच्छ्‌वासनातील बाष्प) व आंत्रमार्ग (मलोत्सर्जन) या मार्गांनी झालेले पाण्याचे उत्सर्जन यांवर अवलंबून असते.

वृक्के ही स्थिर अवयव असून हृदय किंवा स्नायूप्रमाणे ती सतत स्नायूंच्या हालचालीशी संबंधित नाहीत परंतु त्यांचे सतत चालू असणारे तर्षणाचे कार्य [⟶ तर्षण] एवढे महत्त्वाचे आहे की, शरीर उपयोगात आणीत असलेल्या एकूण ११% ऑक्सिजन ती वापरतात.

मूत्र कसे तयार होते हे समजण्याकरिता वृक्काची सूक्ष्मशारीरिक रचना स्थूलमानाने समजण्यास हवी. अधिक माहिती ‘वृक्क’ या नोंदीत दिली आहे. वृक्काचा गाभा किंवा अंतस्थ भाग अनेक सूक्ष्म मूत्रजनन नलिका, रक्तवाहिन्या, तंत्रिका (मज्जातंतू) आणि लसीकावाहिन्या [⟶ लसीका तंत्र] मिळून बनलेला असतो. प्रत्येक मूत्रजनन नलिकेचे दोन भाग असतात (१) वृक्क एकक व (२) संग्राहक नलिका. वृक्क एककाचे (अ) वृक्क कणिका व (आ) सूक्ष्म मूत्रनलिका असे दोन भाग असतात. काही मालपीगी सूक्ष्म मूत्रनलिका (मार्चेल्लो मालपीगी या इटालियन शारीरविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या सूक्ष्म मूत्रनलिका) एका संग्राहक नलिकेशी जोडलेल्या असतात व बेलिनी नलिका (लोरेंत्सो बेलिनी या इटालियन शारीरविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी नलिका) या अंतिम नलिकेतून मूत्र वृक्कद्रोणात आणले जाते. तेथून ते मूत्रवाहिनीद्वारे मूत्राशयात येते व ठराविक प्रमाणात साचल्यानंतर त्याचे मूत्रमार्गाद्वारे उत्सर्जन होते. प्रत्येक वृक्क कणिका म्हणजे सूक्ष्म गोलाकार गोळा असून तिचा सर्वसाधारण व्यास फक्त ०·२ मिमि. असतो. तिचे (अ) केशिकागुच्छ : जवळजवळ ५० परिवलित केशवाहिन्यांचे जाळे आणि (आ) या जाळ्यांवरील पातळ कलाच्छादन (ज्याला वृक्क संपुट किंवा विल्यम बोमन या इंग्लिश वैद्यांच्या नावावरून बोमन संपुट म्हणतात) असे दोन भाग असतात. वृक्क संपुट हा सूक्ष्म मूत्रनलिकेचाच सुरूवातीचा बंद तोंडाचा रुंद भाग असून त्यात केशिकागुच्छ अंतर्वलित झालेला असतो. सूक्ष्म मूत्रनलिकांची रचना आणि सूक्ष्मशारीर बरेच जटिल (गुंतागुंतीचे) आहे. त्या मूत्रोत्पादनात महत्त्वाचे कार्य करतात.

मूत्रोत्पादन : मूत्रोत्पादनाची सुरुवात केशिकागुच्छात होते. तेथे रक्तरसापासून प्रथिनरहित अतिसूक्ष्म निस्यंद (निस्यंदन क्रियेत मिळणारे द्रव) वेगळा केला जातो. हा निस्यंद केशिकागुच्छाभोवतालच्या बोमन संपुटात येतो आणि तेथून तो सूक्ष्म मूत्रनलिकेच्या समीपस्थ भागात उतरतो. निव्वळ निस्यंदन हा द्रव नलिकेच्या पुढील पोकळीतून वाहू लागतो. सूक्ष्म मूत्रनलिकेच्या पुढच्या निरनिराळ्या भागांतून वाहताना द्रवाचे घनफळ व संरचना यांत तीव्र फेरफार होतात. हे फेरफार नलिकेच्या पोकळीतील अधिस्तर कोशिकांच्या (पेशींच्या) विशिष्ट प्रकारामुळे व रचनेमुळे होतात. सुरुवातीस पोकळीत उतरलेल्या निस्यंदातील काही घटक त्यामधून हळूहळू काढून घेतले जातात व ते पुन्हा रक्तात मिसळवले जाऊन शरीराबाहेर जाऊ दिले जात नाहीत. निस्यंदातून ग्लुकोज व ⇨ ॲमिनो अम्ले यांचे पूर्णपणे पुनरभिशोषण होते आणि हे पदार्थ फक्त अपसामान्य अवस्थेतच मूत्रात सापडतात. याउलट यूरियासारखे काही पदार्थ अत्यल्प प्रमाणात पुनरभिशोषित होतात. पुनरभिशोषित होणाऱ्या पदार्थांत पाण्याचाही समावेश होतो. एकूण निस्यंदाच्या मानाने मूत्र प्रमाण अगदी अंशात्मकच असावे एवढेच अभिशोषणाचे प्रमाण नेहमी असते. सूक्ष्म मूत्रनलिकांच्या अधिस्तर कोशिका पुनरभिशोषणाच्या कार्याबरोबरच परिनलिका रक्तप्रवाहातील रक्तातून काही पदार्थ काढून घेऊन ते पोकळीतील द्रवात मिसळतात. वरीलप्रमाणे (१) केशिकागुच्छातील निस्यंदन, (२) सूक्ष्म मूत्रनलिकांतील पुनरभिशोषण (पोकळीतील द्रवातून रक्तामध्ये) आणि (३) सूक्ष्म मूत्रनलिकांतील स्त्रवण (रक्तातून पोकळीतील द्रवामध्ये) या तीन स्वतंत्र प्रक्रिया मिळून मूत्र तयार होते.

कोष्टक क्र. १. रक्तरस व मूत्र यांतील घटकांचे शेकडा प्रमाण व सांद्रण वाढ
घटक रक्तरस (%) मूत्र

(%)

नलिकांतील सांद्रण वाढ (पटीत)
पाणी ९०–९३ ९५
प्रथिने, वसा (स्निग्ध पदार्थ) व इतर ⇨ कलिल पदार्थ ७–९
ग्लुकोज ०·१
सोडियम (Na) ०·३० ०·३५ अत्यल्प
क्लोराइड (Cl) ०·३७ ०·६
यूरिया ०·०३ ६०
यूरिया अम्ल ०·००४ ०·०५ १२
पोटॅशियम (K) ०·०२० ०·१५
अमोनिया (NH4) ०·००१ ०·०४ ४०
कॅल्शियम (Ca) ०·००८ ०·०१५
मॅग्नेशियम (Mg) ०·००२५ ०·००६
फॉस्फेट (PO4) ०·००९ ०·१५ १६
सल्फेट (SO4) ०·००२ ०·१८ ९०
क्रिॲटिनीन ०·००१ ०·०७५ ७५

मूत्र हा रक्तरसापासून वृक्काद्वारे तयार होणारा पदार्थ असल्यामुळे दोन्हीमधील घटकांची तुलना केल्यास सूक्ष्म मूत्रनलिकांच्या सांद्रणक्षमतेची उत्तम कल्पना येते. मागे कोष्टक क्र. १ मध्ये रक्तरस व मूत्र यांच्या घटकांतील फरक व सांद्रण वाढ दर्शवली आहे.

प्राकृतिक मूत्र : प्रत्येकी लिटर प्राकृतिक (सर्वसाधारण) मूत्रातील प्रमुख घटक कोष्टक क्र. २ मध्ये दिले आहेत.

कोष्टक क्र. २. (अ). प्राकृतिक मूत्रातील अकार्बनी घटक. कोष्टक क्र. २. (आ). प्राकृतिक मूत्रातील नायट्रोजनयुक्त घटक
घटक  ग्रॅम प्रत्येक लिटरमध्ये  घटक ग्रॅंम प्रत्येक लिटरमध्ये नायट्रोजन (अंदाजे) (ग्रॅममध्ये)
क्लोराइड (NaCl) ९·० यूरिया २५ १०
फॉस्फरस (P2O5) २·० यूरिक अम्ल ०·६ ०·२
एकूण सल्फर (SO3) १·५ अमोनिया ०·६ ०·४
सोडियम (Na2O) ४·० क्रिॲटिनीन १·५ ०·५
पोटॅशियम (K2O) २·० अनिश्चित नायट्रोजन ०·६
कॅल्शियम (CaO) ०·२
मॅग्नेशियम (MgO) ०·२
लोह ०·००३ एकूण ११·७

वरील प्रमुख घटकांशिवाय प्राकृतिक मूत्रात इतर अनेक पदार्थ अतिसूक्ष्म प्रमाणात असतात. अलीकडील जीवनरसायनशास्त्रातील प्रगतीमुळे त्यांचे मूत्रातील प्रमाणही ठरवता येऊ लागले आहे. प्रस्तुत नोंदीत त्याविषयी माहिती दिली आहे.

मूत्रपरीक्षा अथवा मूत्र विश्लेषण : प्रयोगशालेय मूत्र तपासणीस अथवा घटक संशोधनास मूत्रपरीक्षा म्हणतात. वैद्यकीय तपासण्यांमध्ये ही सर्वांत जुनी व अनेक शतकांपासून अस्तित्वात असलेली परीक्षा आहे. प्राचीन काळापासून मूत्रातील बदलांचा शारीरिक रोगाशी संबंध असल्याचे चातुर्याने ओळखले गेले होते. मधुर अथवा गोड मुत्र ⇨ मधुमेहाशी संबंधित असल्याचे रासायनिक विक्रियाकारक उपलब्ध होण्यापूर्वी केवळ रुचिपरीक्षेनेच ठरवले गेले होते. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या हिपॉक्राटीझ या सुप्रसिद्ध वैद्यांनी रुग्णांच्या मल, मूत्र, थुंकी व ओकाऱ्यांच्या तपासाणीकडे लक्ष वेधले होते. आधुनिक मूत्रपरीक्षेकरीता वृक्क, मूत्रमार्ग यांसंबंधी शारीर व शरीरविज्ञानविषयक माहिती असणे आवश्यक असते. यांशिवाय रुग्णाचा आजार, तो घेत असलेली औषधे, मूत्र गोळा केल्याची वेळ इ. माहिती असणेही आवश्यक असते.

मूत्रपरीक्षा चार प्रकारांत विभागता येते : (१) भौतिक अथवा स्थूल पदार्थरूप, (२) रासायनिक, (३) सूक्ष्मदर्शकीय आणि (४) सूक्ष्मजंतुशास्त्रीय.

(१) भौतिक अथवा स्थूल पदार्थरूप परीक्षा : (अ) घनफळ : दैनंदिन मूत्रोत्सर्जनाचे घनफळ समशीतोष्ण हवामानात सर्वसाधारणपणे ८०० ते २,५०० मिली. असते. प्राकृतिक अवस्थेत निरोगी शरीरात मूत्रोत्पादन रात्रीपेक्षा दिवसा अधिक होते. घनफळाच्या मापनामुळे बहुमूत्रता किंवा अल्पमूत्रता ही लक्षणे निश्चित करता येतात. चोवीस तासांतील एकूण मूत्र गोळा करून त्याचे मापन करतात. रुग्णालयात दाखल केलेल्या रोग्याच्या बाबतीत यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. उदा., मलविसर्जनाच्या वेळी होणाऱ्या मूत्रोत्सर्जनातील मूत्र अनवधानाने गोळा न होणे वगैरे. घनफळ मापन काही रोग्यांच्या निदानास मदत करते. उदा., बहुमूत्रता हे मधुमेह किंवा ⇨ बहुमूत्रमेहाचे लक्षण असू शकते अल्पमूत्रता ऊष्माघात, अतिसार, अती भाजणे इत्यादींचा परिणाम असते. अमूत्रता (१०० मिली. पेक्षा कमी/२४ तास) मूत्रविषरक्ततेत (मूत्रातील घटकांच्या रक्तातील उपस्थितीमुळे उद्‌भवणाऱ्या विषारी अवस्थेत) आढळते व ते एक बहुधा गंभीर लक्षण असते.

कोष्टक क्र. ३.मूत्राच्या रंगातील बदलांची संभाव्य कारणे
मूत्र रंग विकृतिजन्य किंवा इतर कारण 
लाल (१) रक्तारुण (हीमोग्लोबिन) : हिवताप ⇨ रक्ताधानजन्य प्रतिक्रिया
(२) मायोग्लोबिन : अती व्यायाम, स्नायुविकार
(३) पॉर्फोबिलीनोजेन
(४) पॉर्फिरिने : शिशाची विषबाधा, रक्तविलयनयुक्त मुक्त स्थितीत असलेली कावीळ
(५) औषधे : रिफॅंपिसीन, पिरिडियम.
नारिंगी (१) पित्तातील रंजकद्रव्ये : यकृतकोशिका विकृतिजन्य किंवा अवरोधजन्य कावीळ
(२) औषधे : पायरिडियम, फिनोथायाझिने.
पिवळा (१)अती सांद्रित मूत्र
(२) पित्तारुण (बिलिरुबीन) : कावीळ
(३) मूत्रपित्तारुण : यकृतशोथ (यकृताची दाहयुक्त सूज), रक्तविलयन वाढ
(४) औषधे : फेनॅसिटीन, कॅस्केरा, नायट्रोफ्यूरांटॉइन ब समूह जूवनसत्त्वे, टेट्रासायक्लिने, रिबोफ्लाविन
(५) गाजरांचे सेवन.
हिरवा (१) पित्तहरिती (बिलीव्हर्डीन) : रक्तविलयन वाढ
(२) सूक्ष्मजंतू संसर्ग : विशेषेकरून स्यूडोमोना.
निळा (१) काही मूत्रल (लघवी साफ करणारी) औषधे
(२) मिथिलीन ब्ल्यू वृक्क कार्य परीक्षेत वापरले असल्यास.
करडा (१) अम्लहेमॅटिन : रक्तविलयन वाढ
(२) मायोग्लोबिन : स्नायुविकार
(३) पित्तातील रंजक द्रव्ये : कावीळ
(४) काही सल्फा औषधे.
काळा किंवा करडा काळा (१) मेलॅनीन : कृष्णकर्क
(२) इंडिकाने : प्रथिनांचे आंत्रिय पूतिभवन (पुवात रुपांतर होणे)
(३) मूत्रपित्तारुण : रक्तविलयन वाढ
(४) मेटॅहीमोग्लोबिन : ॲसिटानिलाइड विषबाधा.

(आ) रंग व पारदर्शकता : प्राकृतिक मूत्राचा रंग त्यामधील यूरोक्रोम व यूरोइरिथ्रीन या रंजकद्रव्यांमुळे पिवळसर असतो. त्यात निरनिराळ्या छटा असू शकतात आणि मूत्र काही वेळ ठेवल्यानंतर रंग अधिक गडद बनतो. कारण रंगहीन मूत्र पित्तरंजक जनकाच्या (युरोबिलीनोजेनाच्या) ⇨ ऑक्सिडीभवनामुळे रंगीत मूत्रपित्तारुणात (युरोबिलिनात) रुपांतर होते. ताजे मूत्र पारदर्शक स्वच्छ असते. त्यात पू, सूक्ष्मजंतू, फॉस्फेटे व युरेटे असल्यास ते अपारदर्शक बनते. रंगातील बदलांची संभाव्य कारणे कोष्टक क्र. ३ मध्ये दिली आहेत.

(इ) विशिष्ट गुरुत्व : वृक्काच्या मूत्र सांद्रण क्षमतेच्या अंदाजाकरिता विशिष्ट गुरुत्व मापनाचा उपयोग होतो. मूत्रात प्रथिन, ग्लुकोज किंवा इतर बृहत्‌रेणवीय (मोठे रेणू असलेला) पदार्थ अधिक नसल्यास सकाळच्या पहिल्या मूत्र नमून्याचे वि. गु. जर १·०२५ आढळले, तर वृक्काचे हे कार्य योग्य प्रकारे चालत आहे, असे मानतात. सर्व साधारणपणे वि. गु.१·००२ ते १·०२५ असते व कधीकधी निरोगी अवस्थेतही ते १·०३५ पर्यंत वाढते. प्राकृतिक मूत्राचे विशिष्ट गुरुत्व मूत्रातील यूरिया व सोडियम यांच्या सांद्रणाच्या प्रमाणात असते. वि. गु. मापनाकरिता मूत्र गुरुत्वमापक नावाचे उपकरण मिळते. ते वापरताना काही विशेष काळजी घ्यावी लागते.

मूत्रात बुडवून वि. गु.मोजण्याच्या नव्या डूब-पट्‌ट्याही (मल्टिस्टिक्स-एस्. जी.) मिळतात. मधुमेहात मूत्रातील ग्लुकोजामुळे वि. गु. वाढलेले असते. बहुमूत्रता व मूत्राचे वि. गु. १·००६ पेक्षा कमी ही बहुमूत्रमेहाची लक्षणे असतात. सतत १·०१० वि. गु. वृक्क कार्य बिघाड निदर्शक असू शकते. विद्रावातील घन विद्रुत (विरघळलेल्या) पदार्थांचे प्रमाण त्याच्या प्रणमनांकाशी संबंधित असते, या तत्त्वावर गोल्डबर्ग यांच्या प्रणमनांकमापकाने मूत्राचे वि. गु. मापता येते [⟶ प्रणमनांकमापन]. तपासणीकरिता फक्त काही थेंब मूत्र पुरते हा या उपकरणाचा विशेष आहे.

(ई) अवसाद परीक्षा : मूत्र काही वेळ ठेवल्यानंतर तळाशी साचणाऱ्या गाळाला अवसाद म्हणतात. पांढऱ्या पिंजलेल्या कापसासारखा दिसणारा श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) तळाशी बसतो. मूत्राचे विशिष्ट गुरुत्व अधिक असल्यास तो मधेच तरंगतो किंवा पृष्ठभागी असतो. रक्तांश मूत्रात असल्यास पांढऱ्याऐवजी करडी छटा दिसते. मूत्रातील फॉस्फेटे, यूरेटे व यूरिक अम्ल यांचे प्राकृतिक मूत्रात अवसादन होते. फॉस्फेटे पांढरा, तर यूरेटे व यूरिक अम्ल गुलाबी छटा असलेले अवसाद निर्माण करतात. श्वेतकोशिका व सूक्ष्मजंतू अधिक प्रमाणात असल्यास मूत्र गढूळ दिसते. ढोबळ रक्तमेहात (मूत्रात रक्त उतरणाऱ्या अवस्थेत) अवसाद लाल असतो. साध्या डोळ्यांनी केलेली परीक्षा वरील माहिती पुरवते. याशिवाय अवसादाची सूक्ष्मदर्शकीय परीक्षाही करतात आणि तिच्या बद्दलची माहिती पुढे दिली आहे.

(२) रासायनिक परीक्षा : या परीक्षेकरिता सोप्या व जलद पद्धती अलीकडे उपलब्ध झाल्या असून मूत्रातील रासायनिक पदार्थांची तपासणी रुग्णशय्येजवळ विनासायास करता येऊ लागली आहे. त्यामुळे रुग्णाच्या शारीरिक तपासणीचाच ती एक आवश्यक भाग बनली आहे. प्रयोगशालेय पारंपरिक रासायनिक परीक्षांऐवजी पाश्चात्य देशांतून डूब-पट्‌ट्या वापरण्यात येत आहेत. विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या या पट्टीवर निरनिराळे विक्रियाकारक लावून ठेवलेले असतात. निरनिराळ्या कंपन्या त्या लॅबस्टिक्स, क्लिनिस्टिक्स, केमस्ट्रीप इ. एकत्व (पेटंट) नावांखाली विकतात. सोबत त्या वापरण्याविषयी माहिती व सूचना, तसेच तुलनात्मक रंगमापक पट्टीही दिलेली असते. डूब-पट्टी मूत्रात बुडवून काढून ठराविक वेळेनंतर रंग तपासणी करतात. एकाच पट्टीचा उपयोग करून अल्ब्युमीन, ग्लुकोज, कीटोने, रक्त, पित्तारुण, मूत्रपित्तरंजकजनक व नायट्रेटे हे पदार्थ मृत्रात आहेत किंवा नाहीत ते तपासता येते. अशा पट्‌ट्यांना ‘बहु-डूब-पट्टी’ म्हणतात. पट्ट्या वापरणे सोपे असले, तरी त्याकरिता दिलेल्या सूचना कटाक्षाने पाळणे आणि त्यांची साठवण व हाताळणी फार महत्त्वाची असतात. अल्पसा बदलही चुकीचा निष्कर्ष मिळण्यास पुरेसा असतो. मूत्रात सापडणाऱ्या काही महत्त्वाच्या रासायनिक पदार्थांविषयीची माहिती खाली दिली आहे.

(अ) प्रथिने : मूत्रात प्रथिन प्रमाण २४ तासांच्या एकूण घनफळात ०·३ ग्रॅ. पेक्षा जास्त आढळल्यास त्या लक्षणाला ‘प्रथिनमेह’ म्हणतात. प्रथिन प्रकार बहुधा अल्ब्युमीन असतो. याचे मूत्रातील अस्तित्व ओळखण्यासाठी मल्टिस्टिक्स व अल्ब्युस्टिक्स नावाच्या पट्‌ट्या मिळतात. भारतात उकळण परीक्षा व सल्फोसॅलिसिलिक अम्ल परीक्षा वापरात आहेत. मूत्रातील प्रथिन सांद्रणाच्या मापनाकरिता जी. एच्. एझबाक या फ्रेंच वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारे एझबाक अल्ब्युमीनमापक नावाचे उपकरण उपलब्ध आहे. सर्वसाधारणपणे प्राकृतिक मूत्रात २४ तासांत १५० मिग्रॅ.पेक्षा जास्त प्रथिन आढळत नाही. यदृच्छ नमुन्यात त्याचे प्रमाणे २० मिग्रॅ./लि. एवढेच असते. प्रथिनमेहाचे दोन प्रकार ओळखले जातात : (१) शरीरक्रियात्मक आणि (२) विकृतिजन्य.

(१) शरीरक्रियात्मक प्रकारात प्रथिन प्रमाण अल्प असून ते अधूनमधूनच वाढते. सकाळच्या पहिल्या नमुन्यात प्रथिन नसते परंतु नंतरच्या १-२ तासानंतरच्या नमुन्यात ते मिळते. पुष्कळ वेळा शारीरिक व्यायामानंतर किंवा सरळ उभ्या अंगस्थितीत असताना केलेल्या मूत्रात मिळते परंतु आडवे पडून काही वेळानंतरच्या मूत्रात मिळत नाही. या प्रकाराला ‘उर्ध्वस्थितिज’ किंवा ‘अंगस्थितिजन्य’ अशी नावे आहेत. वृक्क नीलांतील रक्ताधिक्य यास कारणीभूत असावे.

(२) विकृतिजन्य प्रकारास ज्वरावस्था, वृक्कविकृती, अश्मरीजन्य (मुतखड्यामुळे उद्‌भवणारा) रक्तमेह, वृक्क क्षयरोग, पिष्टाभता (शरीरात निरनिराळ्या अवयवांत आणि उतकांत–समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहात–पिष्टाभ पदार्थांच्या कोशिकाबाह्य संचय होणारी विकृती) व वृक्काचे संसर्गजन्य रोग कारणीभूत असतात. अपवृक्कीय लक्षणसमूह (प्रथिनमेह, रक्तरसातील अल्ब्युमिनाची घट, रक्तातील कोलेस्टेरॉलात वृद्धी, शोफ-उतकांमध्ये वा शरीरातील पोकळ्यांमध्ये रक्तद्रवाचा अपसामान्य संचय होणे-ही लक्षणे असणारी केशिकागुच्छांची पारगम्यता वाढवणारी अज्ञातहेतुक विकृती) आणि पिष्टाभता यांत मूत्रातील प्रथिन प्रमाण १० ग्रॅ./ लि. एवढे अती वाढलेले आढळते. मधुमेही रुग्णात प्रथिनमेह पॉल किमेलस्टील (अमेरिकन विकृतिवैज्ञानिक) व क्लिफर्ड विल्सन (इंग्लिश वैद्य) यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या किमेलस्टील-विल्सन रोगाची सुरुवात दर्शवितो. या रोगात केशिकागुच्छांचे कर्कशीभवन (कठिनीभवन) होऊन प्रथिनमेह, रक्तदाबवृद्धी आणि शोफ ही लक्षणे उद्‌भवतात. गर्भारणात प्रथिनमेह गर्भविषरक्तता सूचक असू शकतो. बहुविध मज्जानर्बुद (हाडांच्या पोकळीतील पदार्थांतील कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे गाठी निर्माण होणे) या विकृतीत हेन्री बेन्सजोन्झ या इंग्लिश वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारे विशिष्ट प्रथिन मूत्रात सापडते. काच नलिकेत तापमापक जोडून तीमध्ये ॲसिटिक अम्लमिश्रित मूत्र घालून तो तापवतात. तापमान ४०° से. ते ६०° से. च्या दरम्यान असताना नलिकेत या प्रथिनाचा अवसाद दिसतो. द्रवाचा उकळबिंदू येताच तो जवळजवळ दिसेनासा होऊन द्रव थंड होताच तो पुन्हा दिसू लागतो.

(आ) ग्लुकोज व इतर कार्बोहायड्रेटे : मूत्रात जेव्हा ग्लुकोज, गॅलॅक्टोज, लॅक्टोज, पेंटोज यांपैकी एक किंवा अधिक कार्बोहायड्रेटांचे उत्सर्जन होते तेव्हा त्या लक्षणाला ‘कार्बोहायड्रेटमेह’ म्हणतात. सर्व साधारणपणे ‘शर्करामेह’ हा शब्द वापरण्यात असून तो बहुधा ‘ग्लुकोजमेह’ या अर्थाने वापरला जातो. कारण मूत्रात नेहमी आढळणारी शर्करा ग्लुकोज असते. मूत्रातील ग्लुकोज नियंत्रण तीन गोष्टींवर अवलंबून असते : (१) रक्तातील शर्करा सांद्रण, (२) केशिका-गुच्छीय निस्यंदन आणि (३) सूक्ष्म मूत्रनलिकांचे पुनरभिशोषण. या गोष्टी जर प्राकृतिक अवस्थेत असतील, तर निरोगी माणसाच्या मूत्रातील ग्लुकोज नेहमीच्या परीक्षांत सापडत नाही, एवढे अत्यल्प असते.

शर्करा शोधाकरिता एस्. आर्. बेनेडिक्ट या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी बेनेडिक्ट परीक्षा, हेर्मान फोन फेलिंग या जर्मन रसायनशास्त्राज्ञांच्या नावाने ओळखली जाणारी फेलिंग परीक्षा आणि डूब-पट्‌ट्या वापरतात. मल्टिस्टिक्स, डायास्टिक्स, क्लिनिस्टिक्स इ. नावांनी डूब-पट्‌ट्या मिळतात. या पट्‌ट्यांवर ग्लुकोज ऑक्सीडेज किंवा हेक्सोकिनेज एंझाइम (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे प्रथिन) विक्रीयाकारक म्हणून लावलेले असते. ग्लुकोजाकरिता ह्या पट्‌ट्या विशिष्ट व अचूक असतात.

मधुमेहाचे एक प्रमुख लक्ष्मण ‘ग्लुकोजमेह’ असते परंतु ते रोगाची निश्चितता ठरविण्यात अपुरे असते. त्याकरिता रक्तातील शर्कराप्रमाणाची तपासणी आवश्यक असते. ग्लुकोज हा प्रथिनाप्रमाणेच शरीरावश्यक पदार्थ असल्यामुळे सूक्ष्म मूत्रनलिकांतून त्याचे पुनरभिशोषण होते. या कार्यात बिघाड झाल्यास रक्तातील शर्करा प्रमाण प्राकृतिक असूनही मूत्रात ग्लुकोजमेह आढळतो. या विकृतीला ‘वृक्कीय ग्लुकोजमेह’ म्हणतात. हा प्रकार हानिकारक नसतो आणि इलाजांची गरजही नसते.

प्रयोगशालेय शर्कराशोधक मूत्रपरीक्षा काळजीपूर्वक करावी लागते कारण ग्लुकोजशिवाय इतर कार्बोहायड्रेटे (इतर शर्करा) आणि इतर काही पदार्थ मिथ्या अस्तित्वदर्शी किंवा मिथ्या अभावदर्शी परिणाम दर्शवू शकतात. कोष्टक क्र. ४ मध्ये बेनेडिक्ट परीक्षा आणि ग्लुकोज ऑक्सिडेज डूब-पट्टी वापरून मिळणारे परिणाम दर्शविले आहेत.

कोष्टक क्र. ४ बेनेडिक्ट परीक्षा व ग्लुकोज ऑक्सि डेज डूब-पट्टी वापरुन मिळणारे परिणाम.
बेनेडिक्ट परीक्षा  ग्लुकोज ऑक्सिडेज डूब-पट्टी 
सापडणारा शर्करा प्रकार ग्लुकोज ग्लुकोज (अत्यल्प प्रमाणात असल्यासही)
गॅलॅक्टोज _
लॅक्टोज _
फ्रुक्टोज _
माल्टोज _
पेंटोज _
मिथ्या अस्तित्वदर्शी ॲस्कॉर्बि क अम्ल, होमोजेंटिसिक अम्ल, अनेक प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे, फिनोथायाझिने, सॅलिसिलेटे, ॲस्पिरीन, लिव्होडोपा, क्लोरलहायड्रेट हायड्रोजन पेरॉक्साइड किंवाहायपोक्लोराइटाचा मूत्र ठेवलेल्याभांड्याशी संपर्क.
मिथ्या अभावदर्शी _ ॲस्कॉर्बि क अम्ल, होमोजेंटिसिक अम्ल, सॅलिसिलेटे मोठ्या प्रमाणात.

(इ) कीटोने : ॲसिटोॲसिटिक अम्ल, ॲसिटोन आणि बीटा-हायड्रॉक्सीब्यूटिरिक अम्ल ही कीटोने मूत्रात काही विकृतींत सापडतात. यांपैकी मधुमेहामध्ये तीव्र चयापचयनजन्य उपद्रव उद्‌भवण्याचा संभव असतो व कीटोनरक्तता (शरीरात प्रमाणाबाहेर कीटोने निर्माण होणारी अवस्था) नावाच्या गंभीर उपद्रवात बेशुद्धी येते. या रोगात इतर कारणांमुळेही बेशुद्धी उद्‌भवत असल्यामुळे निदानाकरिता मूत्रपरीक्षा उपयुक्त ठरते. कीटोने मूत्रात आढळल्यास त्या लक्षणाला ‘कीटोनमेह’ म्हणतात. परीक्षेकरिता कीटोस्टिक्स किंवा ॲसिटेस्ट नावाच्या डूब-पट्‌ट्या मिळतात. ए. सी. एच्. रॉथेरा या इंग्लिश जीवरसायनशास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारी रॉथेरा परीक्षा, सी. जे.गेरहार्ट या जर्मन वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारी गेरहार्ट परीक्षा या परीक्षा विशिष्ट विक्रीयाकारके वापरून प्रयोगशाळेत करतात. या दोन्ही परीक्षा अस्तित्वदर्शी मिळाल्यास गंभीर कीटोनरक्तता असल्याचे समजून तातडीची उपाययोजना करणे जरूर असते.

(ई) रक्त व त्याचे अनुजात (त्यापासून तयार होणारे अन्य पदार्थ) आणि काही घटक : रक्ताचा प्रमुख घटक रक्तारुण (लाल कोशिकांतील ऑक्सीजनवाहक प्रथिन) असल्यामुळे त्याचे मूत्रातील उत्सर्जन एक गंभीर रोग लक्षण असू शकते. या लक्षणाला ‘रक्तारुणमेह’ म्हणतात. संपूर्ण रक्त किंवा पूर्ण लाल कोशिका उत्सर्जनाला ‘रक्तमेह’ म्हणतात. तपासणीकरिता हीमोस्टिक्स नावाच्या डूब-पट्‌ट्या मिळतात. रक्तारुणाच्या पेरॉक्साइडाच्या अस्तित्वात काही पदार्थांचे ऑक्सीडीकरण करण्याच्या गुणधर्मावर त्या आधारलेल्या असून ५०-१०० लाल कोशिका किंवा १५ मायक्रोग्रॅम /डेसिलिटर रक्तारुण एवढ्या अत्यल्प प्रमाणात देखील अस्तित्वदर्शी मिळतात. लाल कोशिकांचे अस्तित्व सूक्ष्मदर्शकीय तपासणीत निश्चित दिसते. याशिवाय संपूर्ण रक्त किंवा मुक्त रक्तारुणच मूत्रात आहे, हे ठरवता येते. स्त्री रुग्णामध्ये ऋतूस्त्राव मूत्रात मिसळला नसल्याची खात्री करून घ्यावी लागते. रासायनिक परीक्षेचा निष्कर्ष रुग्णाच्या मूत्रात आयोडाइडाचे सांद्रण असल्यास मिथ्या अस्तित्वदर्शी मिळतो.

(उ) पित्तातील रंजकद्रव्ये : पित्तारुण व मूत्रपित्तरंजकजनक ही पित्तातील रंजकद्रव्ये रक्तारुणातील हीम घटकाच्या चयापचयातून निर्माण होणारी अंतिम उत्पादने आहेत. पित्तारुणाच्या ऑक्सीडीभवनातून पित्तहरिती तयार होते. मूत्रपित्तरंजकजनकापासून मूत्रपित्तारुण तयार होते. प्राकृतिक मूत्रात पित्तारुण कधीही आढळत नाही परंतु मूत्रपित्तरंजकजनक अत्यल्प प्रमाणात असते. मूत्रातील पित्तरंजकद्रव्ये कावीळ या रोगाच्या प्रकारांच्या निदानास मदत करतात. कावीळ झालेल्या रुग्णातील पित्तारुणमेह यकृतकोशिका बिघाड वा पित्तावरोध दर्शवितो. अवरोधजन्य काविळीत मूत्रात मूत्रपित्तरंजकजनक अजिबात न मिळणे हे अत्यल्पही पित्तरंजकद्रव्य आंत्रमार्गात उतरत नसल्याचे म्हणजेच पूर्ण अवरोध असल्याचे दर्शविते.

पित्तरंजकद्रव्ये मूत्रास पिवळा किंवा करडा रंग देतात. साधी व सोपी परीक्षा म्हणजे काचनलिकेत मूत्र घेऊन ती थोडा वेळ हालविल्यास तीमध्ये टिकाऊ पिवळा फेस तयार होतो. त्याचा टिकाऊपणा पित्तलवणामुळे व रंग पित्तारुणामुळे मिळतो. मल्टिस्टिक्स डूब-पट्टीवर पित्तरंजकद्रव्यांचा परिणाम होणारे विक्रियाकारक लावलेले असतात परंतु पट्टीपेक्षा प्रयोगशालेय विक्रियाकारक वापरून (पित्तारुणाकरिता इक्टोटेस्ट गोळ्या आणि मूत्रपित्तरंजकजनकाकरिता पॉल अर्लिक या जर्मन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आल्डिहाइड परीक्षा) मिळणारे परिणाम जास्त विश्वसनीय असतात.

(३) सूक्ष्मदर्शकीय परीक्षा : केंद्रोत्सारक यंत्रात [द्रवात मिसळलेले घन पदार्थ त्यातून वेगळे काढणाऱ्या यंत्रात ⟶ केंद्रोत्सारण] एका स्वच्छ काचनलिकेत १५ मिलि.मूत्र ठेवून ती दर मिनिटास १,००० ते १,५०० फेरे या गतीने तीन मिनिटे फिरवल्यानंतर तिच्या तळाशी बसणारा अवसाद सूक्ष्मदर्शकीय तपासणीकरिता वापरतात. वरची निवळी ओतून देऊन फक्त ०·५ मिलि. भाग तपासणीस पुरतो. रक्तातील लाल कोशिका, श्वेत कोशिका, अधिस्तर कोशिका, सूक्ष्मजंतू, वृक्क सूक्ष्मनलिका साचा (सूक्ष्म मूत्रनलिकांत तयार होणारे त्यांच्या आकाराप्रमाणे आकार असलेले घट्ट स्राव किंवा तंतुमय पदार्थ), स्फटिक इत्यादींचे अस्तित्व सूक्ष्मदर्शकाखाली दिसते. कोशिकांची संख्यात्मक परीक्षाही करता येते. प्राकृतिक मूत्रात उच्च शक्ती क्षेत्र तपासणीत (वर्धन ४०० पट) पुरुषांमध्ये एकापेक्षा अधिक लाल कोशिका, श्वेत कोशिका किंवा अधिस्तर कोशिका आढळत नाही, तर स्त्रियांत जास्तीत जास्त चार श्वेत कोशिका आढळतात. सूक्ष्मजंतुमेह असणाऱ्या रोग्यांच्या मूत्रात सूक्ष्मजंतू स्पष्ट दिसतात. शिस्टोसोमा हिमॅटोबियम नावाचे पर्णकृमी जननमूत्रमार्गाची विकृती उत्पन्न करतात. [→खंडितकायी-कृमिरोग]. ईजिप्त, आफ्रिकेचे काही भाग, सौदि अरेबिया, इझ्राएल इ. ठिकाणी आढळणारी ही विकृती महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात आढळते. रक्तमिश्रित मूत्रातून या कृमीची अंडी उत्सर्जित होतात व ती सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. मूत्राच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीत दिसणारे काही पदार्थ आ. १ व आ. २ मध्ये दाखविले आहेत.

आ. १. मूत्र अवसादात सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे पदार्थ : (१) रक्तातील लाल कोशिका, (२) पू कोशिका, (३) अधिस्तर कोशिका, (४) काचाभ साचा, (५) कणमय साचा, (६) रक्तातील श्वेत कोशिकांचा साचा, (७) शुक्राणू, (८) शिस्टोसोमा, (९) रक्तातील कोशिकांचा साचा.

मूत्रातील निरनिराळे स्फटिक सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात. यापैकी कॅल्शियम ऑक्झॅलेट स्फटिक अम्लधर्मी मूत्रात प्राकृतिक आहेत. क्षारधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण तयार होण्याचा गुणधर्म असलेल्या) मूत्रात फॉस्फेट स्फटिक आढळतात. सिस्टीन, ल्युसीन व टायरोसीन स्फटिक विकृतिविज्ञानदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. सिस्टीन स्फटिक सिस्टीनमेहदर्शक असतात. ल्युसीन व टायरोसीन स्फटिक तीव्र यकृत उतकमृत्यू (तीव्र यकृत पीत अपवृद्धी) या विकृतीच्या निदानास पुष्टी देतात.

(४) सूक्ष्मजंतुशास्त्रीय परीक्षा : सर्वसाधारणपणे मूत्रात प्रत्येक मिलिलिटरमध्ये १, ००,००० सूक्ष्मजंतू असणे मूत्रोत्सर्जन तंत्राचा (संस्थेचा) सूक्ष्मजंतू संसर्ग दर्शवितात. या लक्षणाला ‘सूक्ष्मजंतुमेह’ म्हणतात. कधीकधी ही संख्या याहून जास्त असूनही संसर्ग नसणे व याहून बरीच कमी असूनही संसर्ग असणे शक्य असते. रुग्णाची मूत्रपरीक्षा (विशेषेकरून लघवी करताना मध्य प्रवाहातील नमुन्याची परीक्षा) पुष्कळ वेळा करणे जरूर असते. प्रयोगशालेय सूक्ष्मजंतू संवर्धनाकरिता (कृत्रिम रीतीने पोषक द्रव्ये पुरवून सूक्ष्मजंतूंची वाढ करण्याकरिता) गोळा करावयाचा मूत्र नमुना घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. पुरुषात शिश्नमणी (शिश्नाचा पुढचा फुगीर भाग) व स्त्रियांत योनिमार्ग कोणताही जंतुनाशक द्रव्य न वापरता साध्या नळाच्या पाण्याने स्वच्छ करून मध्य प्रवाहीतील मूत्र निर्जंतुक बाटलीत गोळा करावे लागते.स्त्रियांत भगोष्ठ [→ जनन तंत्र] दोन बोटांनी अलग करून सुरुवातीच्या प्रवाहातील मूत्र न घेता नंतरचे मूत्र घेणे चांगले. रजस्वला (विटाळशी) असताना शक्यतो नमुना घेणे टाळावे आणि घेणे अपरिहार्यच असल्यास योनिमार्गात निर्जंतुक बोळा ठेवून नंतर नमुना घेणे इष्ट असते. कधीकधी सूक्ष्मजंतू संदूषणाचा धोका पूर्णपणे टाळण्याकरिता अंतःक्षेपणाची (इंजेक्शनाची) पिचकारी आणि कटिसूचिवेधाकरिता [कटिस्थानातील मस्तिष्क-मेरुद्रव तपासणीसाठी सुईने काढण्याकरिता [→तंत्रिका तंत्र] उपयोगी असणारी सुई (आकारमान २०) वापरून अधिजघन शोषणाने नमुना गोळा करावा लगतो. पुष्कळ वेळा झोपेतून उठल्यानंतर सकाळच्या पहिल्या मूत्रातील नमुना संवर्धनास पुरेसा असतो. मात्र तो शक्य तेवढ्या लवकर प्रयोगशाळेत पोहोचणे आवश्यक असते. ते शक्य नसल्यास नमुना थंड करुन ० ते ४ से. तापमानात ठेवणे जरूर असते आणि तरीही तो १५ तासांच्या आत पोहोचवणे जरूर असते.

सूक्ष्मजंतू परीक्षेकरिता मायक्रोस्टिक्स -३ नावाच्या प्लॅस्टिकच्या डूब-पट्ट्या मिळतात व त्यांवरून तीन प्रमुख प्रकारचे सूक्ष्मजंतू संवर्धनामुळे जंतू प्रकार तर समजतोच पण शिवाय ते संवेदनशील असतील असे योग्य प्रतिजैव औषधही निवडता येते.

आ. २. मूत्र अवसादातील सूक्ष्मदर्शकीय तपासणीत आढळणारे निरनिराळ्या पदार्थांचे स्फटिक : (१) यूरिक अम्ल, (२) अमोनियम यूरेट, (३) कॅल्शियम ऑक्झॅलेट, (४) अमोनिया-मॅग्नेशियम फॉस्फेट, (५) ल्युसीन, (६) टायरोसीन, (७) सिस्टिन, (८) तारकाकृती फॉस्फेट.
आ. ३. मूत्राचे अधिजघन शोषण (मूत्राने भरलेले मूत्राशय) : (१) जघनास्थी, (२) सुई, (३) उदरभित्ती, (४) मूत्राशय.

वरील सर्वसाधारण आणि नेहमी वापरात असणाऱ्या मूत्रपरीक्षांशिवाय अलीकडील जीवरसायनशास्त्रातील प्रगतीमुळे बऱ्याच जीवरासायनिक पदार्थांचे मूत्रातील प्रमाण तपासता येऊ लागले आहे. त्यामुळे काही विकृतींच्यानिदानास मदत झाली आहे. उदा., तीव्र अग्निपिंडशोथ (उदराच्या वरच्या भागात असणाऱ्या आणि पचन क्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या ग्रंथीची दाहयुक्त सूज) या विकृतीत रोगी २-३ दिवसांनंतर रुग्णालयात दाखल झाल्यास त्याच्या रक्तरसातील वाढलेले ॲमिलेजाचे प्रमाण कमी होते परंतु मूत्रातील या पदार्थाचे प्रमाण वाढलेलेच आढळत असल्यामुळे रोगनिदानास मदत होते. कोष्टक क्र. ५ मध्ये मूत्रातील जीवरासायनिक पदार्थांचे प्राकृतिक प्रमाण दिले आहे.

 

 

 

कोष्टक क्र. ५. मूत्रातील जीवरासायनिक पदार्थ (प्राकृतिक प्रमाण).
पदार्थ प्रमाण (शेवटच्या कीटोने या पदार्थाखेरीज प्रत्येकी २४ तासांतील)
अल्डोस्टेरॉन [⇨  अधिवृक्क ग्रंथिनिर्मित हॉर्मोन] १५ मायक्रोग्रॅम
अमोनिया २०–७० मिलि.–सममूल्य
ॲमिलेज (पिष्टमय पदार्थाच्या साखरेत रुपांतरण करण्यास मदत करणारेएंझाइम उदा., अग्निपिंड रसातील ॲमिलॉप्सीन) ,०००–३३,००० एकके
कॅल्शियम १००–३०० मिग्रॅ.
क्लोराइडे ३·५५ ग्रॅ.
तांबे ७० मायक्रोग्रॅमपेक्षाकमी
क्रिऑटिनीन १–२ ग्रॅ.
गोनॅडोट्रोपिने [ ⇨  पोष ग्रंथी अग्रखंडाचे हॉर्मोन] ८–१२ आंतरराष्ट्रीयएकके
१७ हायड्रॉक्सीकॉर्टिकोस्टेरॉइडे पुरुष ८–१२ मिग्रॅ., स्त्रि ४·५–१७ मिग्रॅ.
५–हायड्रॉक्सी-इंडॉल ॲसिटिक अम्ल १–१०मिग्रॅ.
१७ कीटोस्टेरॉइडे पुरुष १०–२० मिग्रॅ., स्त्री ५–१५ मिग्रॅ.
शिसे ८० मायक्रोग्रॅमपेक्षाकमी
पारा ०.५-९० मायक्रोग्रॅम
नायट्रोजन १०–१८ग्रॅ.
फॉस्फेट (अकार्बनी) ०·५-१·५ ग्रॅ.
पोटशियम १·४–३·५ ग्रॅ.
रक्तदाबवर्धक अमाइने : अड्रेनॅलीन १०–३० मायक्रोग्रॅम
नॉरॲड्रेनॅलीन ४०–८० मायक्रोग्रॅम
हायड्रोक्सीट्रिप्टॉमीन १००–३०० मायक्रोग्रॅम
सोडियम ७१ मायक्रोग्रॅमपर्यंतजास्तीत जास्त
यूरिया २० ते ३० ग्रॅ.
क जीवनसत्व २० ते ३० मिग्रॅ.स्वाभाविक आहार
किटोने ५० मिग्रॅ.पेक्षा कमी / प्रत्येक १०० मिलि. मूत्रात.

कुलकर्णी, श्यामकांत; भालेराव, य. त्र्यं.

वरील आधुनिक विश्लेषण जेव्हा अज्ञात होते तेव्हा मूत्र या द्रवामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे आपल्या पूर्वजांना पुरातन काळापासून केवळ स्वानुभवानेच माहीत असले पाहिजे. मूत्र निर्जंतुक असल्यामुळे जखमांवर आडल्या वेळी  युद्धभूमीवर त्याचा जंतुनाशक म्हणून उपयोग केला गेला आहे. कापल्या करंगळीवर मुतायला सांगितले, तर म्हणेल बारा वर्षे आटले आहे आणि ‘कापल्या करंगळीवर मुतायचा नाही ’ हे दुसऱ्याच्या मुळीसुद्धा उपयोगी न पडणाऱ्या व्यक्तीविषयीचे वाक्‌प्रयोग मूत्राचा औषधी उपयोग असल्याचे दर्शवितात.

सोळाव्या शतकात काशी येथे होऊन गेलेल्या पंडित भावमिश्र नावाच्या वैद्यांनी लिहिलेल्या भाप्रकाश या वैद्यकीय ग्रंथात मूत्रवर्गप्रकरणात सहाव्या श्लोकात मूत्राचे गुणधर्म असे सांगितले आहेत :

“नरमूत्रं गरं हन्ति सेवितं तद्रसायनम् |

रक्तपामाहरं तीक्ष्णं सक्षार लवणम् स्मृतम्”||

(मानवी मूत्र विषाक्तता घालविते. नियमित सेवनाने दीर्घायुष्य लाभते. ते रक्ताचे व त्वचेचे रोग बरे करते आणि चवीला तिखट व खारट असते).

भारतातील हजारो भारतीयांचा शिवांबू चिकित्सेवर (स्वमूत्रसेवनाच्या उपचारावर) विश्वास असल्याचे एका पाहणीत आढळले आहे. परागजी देसाई या वैद्यांनी लिहिलेल्या शिवांबू क्यूअर नावाच्या पुस्तकात शिवांबू अथवा स्वमूत्रसेवन हा एकमेव उपाय मानवाच्या सर्व रोगांवर – मग तो कोणत्याही नावाखाली असो – कर्करोग, क्षयरोग, कुष्ठरोग, मधुमेह, हृदय आणि वृक्करोग, हिवताप, विषमज्वर, पटकी – लागू पडतो ’, असे लिहिले आहे. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे शिवांबूचे कट्टर पुरस्कर्ते मानले जात.

याउलट काहीजण शिवांबूचे जबर विरोधकही आहेत. वृक्क शरीरक्रियावैज्ञानिकांच्या मताप्रमाणे मूत्रात चिकित्सात्मक उपयोग सूचित करणारा असा कोणताही गुणधर्म नाही. भाबड्या, वैद्यकशास्त्र व शरीरक्रियाविज्ञानाविषयी पूर्णपणे अज्ञानी लोकांच्या मनातून निर्माण झालेली ही एक निराधार कल्पना आहे. अनेक वैद्यांच्या मताप्रमाणे शिवांबूने बरे होणे हा केवळ समाधानक परिणाम असतो. शरीरक्रियाविज्ञानाचे एक प्राध्यापक जे. व्ही. भट यांच्या मते लोकांना औषधांचा व लस टोचण्याचा त्याग करून त्याऐवजी स्वमूत्रसेवनाकडे वळवणे अतिशय धोकादायकच ठरेल.

भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीय मूत्रपरीक्षा : पहाटेला उठून काचेच्या भांड्यात लघ्वी धरावी, पहिली धार न घेता मधल्या धारा घेऊन सूर्योदय झाल्यानंतर लघ्वीचे परीक्षण करावे.

रुप परीक्षा : लघ्वी पाण्यासारखी पांढरी असली तर वातदोष, फेसाळ असली तर कफदोष, लाल रंगाची असली तर पित्तदोष व रोग समजावे. मिश्र लक्षणांची लघ्वी मिश्र दोषांची व मिश्र दोषरोगांची समजावी. सन्निपात दोष असेल, तर लघ्वी काळ्या रंगाची असते. लघ्वी जर नील वर्णाची आणि रुक्ष असेल तर वातदोषाची, पिवळट व अरुण आणि तेलासारखी असेल तर पित्तदोषाची, स्निग्ध व चिखलाच्या पाण्यासारखी गढूळ असेल तर कफदोषाची आणि स्निग्ध, उष्ण व लाल रंगाची असेल तर रक्तदोषाची होय. अजीर्णजन्य रोगामध्ये मूत्र तांदुळाच्या धुवणाप्रमाणे असते. नवज्वरामध्ये धुरकट रंगाचे प्रमाण पुष्कळ असते.

तैल परीक्षा : तिळाच्या तेलाच्या साहाय्याने करावयाची परीक्षा : काचेच्या भांड्यात लघ्वी घेउन गवताच्या काडीने तेलाचा थेंब अतिशय हळूवारपणे लघ्वीवर ठेवावा, जर त्या थेंबाचे तेल लघ्वीवर ताबडतोब पसरले, तर रोगी साध्य आहे असे समजावे आणि ताबडतोब पसरले नाही, तररोगी कष्टसाध्य आहे. जर तो लघ्वीवर ठेवलेला थेंब तळात गेला तर रोगी असाध्य समजावा.

लघवीवर ठेवलेला तेलाचा बिंदू उत्तर दिशेकडे पसरला, तर ती व्यक्ती निरोगी असते ईशान्येकडे जर तो बिंदू पसरला, तर एक महिन्याने त्या व्यक्तीचा मृत्यू आहे असे समजावे. मूत्रावर ठेवलेला बिंदू सर्पाच्या आकारासारखा नागमोडी झाला, तर वाताची दृष्टी; छत्राकार झाला, तर पित्ताची दुष्टी समजावी. अशा तऱ्हेची आणखीही लक्षणे दिलेली आहेत.

पटवर्धन, शुभदा अ.

पशूंचे मूत्र : मनुष्यमात्राप्रमाणे सर्व पशूंचे मूत्र हे वृक्काचे उत्सर्जन असून शरीराच्या चयापचय क्रियेमुळे तयार होणारे अनावश्यक व अपायकारक पदार्थ त्यामधून शरीराबाहेर टाकले जातात. जंतुजन्यरोगामध्ये तयार होणारी जंतुविषेही मूत्रावाटे बाहेर टाकली जातात. मूत्र हे मूलतः नायट्रोजन गंधक यांच्या चयापचयामुळे निर्माण होणारे पदार्थ, कार्बनी लवणे आणि रंजकद्रव्ये यांचा विद्राव आहे. मूत्राचा रंग पिवळट असून तो यूरोक्रोम या रंजकद्रव्यामुळे येतो. निरनिराळ्या जातींच्या जनावरांच्या मूत्राचा वास वैशिष्ट्यपूर्ण असतो. बहुतेक पशूंमध्ये मूत्र व घाम यांचे परिमाण एकमेकांवर अवलंबून असते. एकाचे परिमाण वाढल्यास दुसऱ्याचे कमी होते. तथापि कुत्रा व मांजर यांना हा सर्वसाधारण नियम लागू नाही. सामान्यतः शाकाहारी जनावरांचे मूत्र क्षारधर्मी असते आणि मांसाहारींचे अम्लीय असते. आहारातील सायट्रिक, टार्टारिक इ. कार्बनी अम्लांचे कार्बोनेटामध्ये रूपांतर होऊन विद्रावाच्या स्वरूपात मूत्रातून बाहेर टाकले जात असल्यामुळे शाकाहारी जनावरांचे मूत्र क्षारधर्मी असते. बहुतेक पशूंचे मूत्र पाण्याप्रमाणे पातळ असते. मात्र घोड्याचे मूत्र थोडे दाट आणि गढूळ असून अळशीच्या तेलासारखे दिसते याचे कारण वृक्काच्या कटिरामध्ये (मूत्रनलिकेध्ये मूत्र जाण्याआधी वृक्काच्या ज्या खोलगट भागामध्ये साठते त्या भागात) व मूत्रवाहिनीच्या वरील भागात असलेल्या श्लेष्मल ग्रंथीचा स्राव त्यामध्ये मिसळला जातो. तसेच घोड्याच्या मूत्रामध्ये कॅल्शियम कार्बोनेटाचे स्फटिक निलंबित (लोंबकळत्या) स्वरुपात असल्यामुळे ते खडूळ असते. काही वेळा त्याला अमोनियाचा दर्प असतो व त्याचा रंग पिवळट पांढरा किंवा पिवळट तांबडा असतो. गायीबैलांच्या मूत्रामध्ये यूरियाचे प्रमाण बरेच असते. तसेच खाद्यामध्ये तृणधान्याचे प्रमाण अधिक असल्यास मूत्रामध्ये हिप्युरिक अम्लाचे प्रमाण वाढते. शेळ्यामेंढ्यांच्या मूत्रामध्ये यूरिया व हिप्युरिक अम्ल यांचे प्रमाण ३ : २ असे राहते. डुक्कर हा सर्वभक्षी प्राणी असल्यामुळे त्याचे मूत्र शाकाहारी आहार दिल्यास क्षारधर्मी आणि मांसाहार दिल्यास अम्लीय राहते. कुत्र्याला हरतऱ्हेचे खाद्य दिले जात असल्यामुळे त्याच्या मूत्रामधील घटकांचे सरासरी प्रमाण देणे कठीण आहे. मांसाहारी खाद्य दिल्यास मूत्रामध्ये यूरिक अम्ल असते. हिप्युरिक अम्ल थोड्या प्रमाणात असते, तर इंडिकान आणि फॉस्फोरिक अम्ल नेहमी असते. पित्ताऋण हे रंजकद्रव्य कुत्र्याच्या मूत्रामध्ये नेहमी आढळून येते.

एका दिवसात (२४ तासांमध्ये) उत्सर्जित केल्या जाणाऱ्या मूत्रांचे परिमाण ऋतुमान, खाद्य,पिण्यात आलेल्या पाण्याचे प्रमाण, दुग्धोत्पादन, कामामुळे होणारे श्रम, वय व जनावराचे आकारमान यांवर अवलंबून असते. निरनिराळ्या जनावरांच्या मूत्राचे परिमाण व त्याचे विशिष्ट गुरुत्व कोष्टक क्र. ६ मध्ये दिले आहे.

कोष्टक क्र. ६. निरनिराळ्या जनावरांच्या मूत्राचे परिमाण व विशिष्ट गुरुत्व.
पशूचे नाव मुत्राचे परिणाम (लिटरमध्ये) विशिष्ट गुरुत्व
घोडा २ ते ११ १·०२५ – १·०६०
गायबैल ५ ते २२ १·०३० – १·०४५
शेळी व मेंढी ०·५ ते १ १·०१५ – १·०४५
डुक्कर २ ते ६ १·०१० – १·०५०

पशूंमध्ये त्यांच्या रक्तद्रवापेक्षा मूत्राची रेणुसंहती (रेणूचे प्रमाण) अधिक असते. हे मूत्राच्या गोठणबिंदूवरून सहज लक्षात येते. घोड्याच्या मूत्राचा गोठणबिंदू – १·७७ ते – २ से. आहे, तर कुत्रा व मांजर यांच्या मूत्राचा अनुक्रमे – १·५७ ते ३·६३ से. व -५ से. असा आहे (रक्तद्रवाचा गोठणबिंदू – ०·५९ से.). मनुष्याच्या मुत्रामध्ये आढळून येणारी कार्बनी व अकार्बनी लवणे व इतर घटक कमीअधिक फरकाने पशूंच्या मूत्रामध्येही आढळून येतात.

कोंबड्यांच्या वृक्कामधील केशिकागुच्छ अल्पविकसित असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात मूत्राचे उत्सर्जन मूत्रजनन-नलिकांमधून होते. मूत्राचा रंग पिवळट पांढरा असतो व ते दाट, अर्धघन स्थितीमध्ये असून त्यामध्ये यूरेटांचे प्रमाण पुष्कळच असते.

दीक्षित, श्री. गं.

संदर्भ : 1. Bobeck. J. K. Ed., Best and Taylor’s Physiological Basis of Medical Practice, Baltimore, 1973.

2. Chamberlain, E. N.; Ogilvie, C. Symptoms and Signs in Clinical Medicine, Bristol, 1974.

3. Duke, H. H. Physiology of Domestic Animals, London, 1971.

4. Macleod, J., Ed., Clinical Examination, Edinburgh, 1984.

5. Miller, W. C.; West, G. P. Block’s Veterinary Dictionary, London, 1962.

6. Swach, M.; Mason, S., Ed., Hutchinson’s Clinical Methods, London, 1984.

7. Widmann, F. K. Clinical Interpretation of Laboratory Tests, Singapore, 1984.