हृषीकेश मुळगावकरमुळगावकर, हृषीकेश : (१४ ऑगस्ट १९२०–   ). भारताचे भूतपूर्व वायुसेनाध्यक्ष. जन्म मुंबई येथे. प्रख्यात शल्यतज्ञ शामराव हे त्यांचे वडील आणि आई सुलोचनाबाई. त्यांच्या पत्नी, ताराबाई या मुलांच्या विकासकार्यात विशेषरस घेणाऱ्या समाजसेविका आहेत. मुळगावकरांचे शिक्षण द मेलबर्न कॉलेज, लंडन व सेंट झेवियर महाविद्यालय. मुंबई येथे झाले. शिक्षण सुरू असतानाच डिसेंबर १९४० मध्ये रॉयल इंडियन एअर फोर्ससाठी विमानचालक म्हणून त्यांची निवड झाली. त्याच सुमारास संरक्षण सेवा महाविद्यालय, वेलिंग्टन (तमिळनाडू) येथून ते पदवीधर बनले, तसेच लढाऊ विमानचालक-प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी प्राविण्य प्राप्त केले.

दुसऱ्या महायुद्धकाळात [⟶ महायुद्ध दुसरे] व १९४४–४५ च्या सुमारास मुळगावकर यांनी ब्रह्मदेश आघाडीवर हरिकेन विमानचालक व स्पिटफायर लढाऊ विमानचालक म्हणून काम केले होते. त्याचप्रमाणे ⇨ भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी (१९४८–४९) काश्मीर खोऱ्यातील युद्धप्रसंगी विमान हल्ले, वाहतूक व निरीक्षण इ. कामे त्यांच्याच नियंत्रणाखाली चालत असत. त्यावेळच्या कार्यांबद्दल त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. जगातील पन्नासांपेक्षाही जास्त जातींची लढाऊ विमाने त्यांनी चालवली आहेत. ते स्वनातीत वेगाने लढाऊ विमाने चालविणारे पहिले भारतीय विमानचालक होत. भारतीय वायुदलात मिस्टियर नॅट आणि कॅनबरा या विमानांचा तसेच एस्. ए. ७५ या जमिनीवरून विमानवेधी अस्त्राचा समावेश होण्यापूर्वीच्या अभ्यासगटांत त्यांचा समावेश झाला होता. ते वरिष्ठ सभासद असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग त्या गटांना चांगला झाला होता. भारतातच निर्माण होणाऱ्या ए. व्ही. आर्. ओ. आणि मरुत या विमानांच्या अभ्यासगटाचेही ते एक व्यासंगी तसेच अभ्यासू सभासद आणि १९६८–७१ या काळात हवाईदलाच्या मध्य वायु कमानचे ते प्रमुख होते. त्यांच्या त्यावेळच्या कार्याबद्दलही त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक हा बहुमान देण्यात आला होता. राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, नवी दिल्ली या सर्वोच्च रक्षाविषयीच्या संस्थेचे ते दोन वर्षे संचालकही होते. त्यानंतर १९७६ मध्ये ते भारतीय वायुसेनेचे अध्यक्ष-एअर चीफ मार्शल-म्हणून नेमले गेले आणि १ सप्टेंबर १९७८ या दिवशी जवळजवळ ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकालानंतर ते निवृत्त झाले.

मुळगावकरांची शस्त्रांविषयीची आवड निवृत्तीनंतरही कायम असून तंत्रज्ञानाचीही त्यांना उत्तम जाण आहे. योगासने व अति पोहणे हे त्यांना फार प्रिय आहेत. सध्या ते बजाज टेम्पो या भारतीय आणि फेरान्टी या एडिंबरो येथील इलेक्ट्रॉनिक फॅक्टरीचे तंत्रविषयक सल्लागार असून कायनेटिक होण्डा अणि अवन्ती मायनिंग टूल्स अँड मशिन्स या संस्थांच्या संचालक मंडळावर संचालक म्हणून काम पहातात. त्यांचे वास्तव्य पुण्यालाच असते.

आपटे, मु. दि.