मुरूम -१ : (बुरुंब). एक प्रकारचा खडकाचा ठिसूळ झालेला भाग अथवा भुगा. खडकांवर वातावरणक्रिया होऊन खडकांचे यांत्रिक आणि रासायनिक अपघटन (खनिजाच्या संघटनात बदल) होऊन त्यांत भेगा पडतात, त्यांचे तुकडे पडतात, ते भुसभुशीत अथवा ठिसूळ होतात. अशा प्रकारच्या अपघटित खडकाला मुरूम असे म्हणतात. मुरूम सामान्यतः भू-पृष्ठावर आढळतो. बऱ्याच वेळा याचा थर मृदा वा शेतजमिनीच्या खाली व खालच्या पक्क्या घट्ट खडकाच्या वर आढळतो. वातावरणक्रियेने भूपृष्ठावरील खडकांपासून अखेरीस मृदा निर्माण होते. या प्रक्रियेतील मुरूम ही मधली अवस्था आहे. मुरूम हा शब्द तेलुगू भाषेतील मुरू कल्लु (मुरु = चुरा, तूटफूट व कल्लु = दगड) या शब्दांवरून आला असावा आणि तो वडार लोकांनी महाराष्ट्रात रूढ केला असावा. ज्या ठिकाणी ⇨ दक्षिण ट्रॅपचा बेसाल्ट खडक आढळतो तेथे म्हणजे विशेषतः महाराष्ट्रात, बेसाल्टावर वातावरणक्रिया होऊन मुरूम तयार होतो. याचे कोंड्या, उडद्या, काळा, तांबडा, दगडी, लोखंडी इ. स्थानिक प्रकार आहेत. याचा उपयोग घराच्या जमिनी, रस्ते, कालवे, मातीची धरणे इत्यादीमध्ये भर घालण्यासाठी केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनीक बांधकाम खात्याच्या विनिर्देशनानुसार मुरूम म्हणजे ज्यात सु. ०·०२५८ घ. मी. पेक्षा (घनफुटाहून) मोठे गोटे नाहीत, अशी अपघटित खडकांची अथवा कठीण झालेल्या मातीची राशी होय. टिकाव व खोरे यांच्या सहाय्याने मुरूम सहज खोदता येतो. मुरूमाचे कठीण, मध्यम व मऊ असे तीन पोटभेदही केलेले आहेत.