मुरादाबाद : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३,३०,०५१ महानगरीय ३,४५,३५० (१९८१). हे लखनौपासून वायव्येस ३२८ किमी. आणि दिल्लीच्या पूर्वेस १६० किमी. अंतरावर रामगंगा नदीच्या तीरावर वसले आहे. रुस्तुम खान या मोगल अधिकाऱ्याने १६२५ मध्ये याची स्थापना करून येथे एक किल्ला व १६३१ मध्ये जामी मशीद बांधली. सुरुवातील हे ठिकाण ‘चौपाळा’ या नावाने संबोधले जाई. येथील धातूची-विशेषतः पितळेची-नक्षीदार भांडी विशेष प्रसिद्ध आहेत. यांशिवाय कापडनिर्मिती, छपाई, विद्युत्विलेपन इ. उद्योग शहरात चालतात. हे रस्ते व लोहमार्ग वाहतुकीचे केंद्र असून शेतमालाची मोठी बाजारपेठ आहे. १८६३ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय, दवाखाने, रूग्णालये, नेत्र रूग्णालय इ. शैक्षणिक व आरोग्यविषयक सुविधा शहरात उपलब्ध आहेत.