मुरमान्स्क : रशियाच्या याच नावाच्या प्रांताची (ओब्लास्ट) राजधानी. लोकसंख्या ४,१२,००० (१९८४). लेनिनग्राडच्या उत्तरेस १,००० किमी. वर कोला उपसागरावर वसले असून, आर्क्टिक विभागातील बारमाही खुले मोठे बंदर आहे. बॅरेंट्स समुद्रापासून ते ५५ किमी. अंतरावर आहे. उबदार गल्फ प्रवाहामुळे हिवाळ्यातही हे बर्फयुक्त राहते. हे सागरी मासेमारीचे रशियातील प्रमुख केंद्र आहे. मत्स्योत्पादनाशी निगडित असे व्यवसाय येथे विकसित झाले असून, त्यांत शहरातील निम्मा कामगारवर्ग गुंतलेला आहे. या व्यापारी बंदरातून फॉस्फरसाच्या विविध संयुगांना उपयुक्त अशी खनिजे तसेच लोहधातुक यांची निर्यात होते. शहरात सागरी व्यापार प्रशिक्षण शाळा, नौका दुरुस्ती केंद्र आणि मत्स्य व महासागरविज्ञान यांसंबंधीच्या संशोधन संस्था आहेत. पहिल्या महायुद्धात रशियन सैन्याला रसद पुरविण्यासाठी येथील बंदर विकसित करण्यात आले (१९१५). रशियन राज्यक्रांतीनंतर ते काही काळ दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात होते. दुसऱ्या महायुद्धकाळातही त्याचा लष्करी तळासाठी उपयोग करण्यात आला. त्यानंतर येथील बंदरसुविधांत सतत वाढ करण्यात येत आहे.
जाधव, रा. ग.