मुरडशेंग : (१) कळ्या, फूल व फळ यांसह फांदी (२) फूल (३) केसरदले व किंजमंडल (संवर्त व पुष्पमुकुट) काढलेले फूल (४) पक्वफळ टोकास आडवे कापलेले (५) बीज.

मुरडशेंग : (मुरुडशेंग, केवण हिं. मरोरफल्ली गु. मरडसिंगी क. भूतकरळु, कवर्गी सं. आवर्तनी, मृगशृंगा इं. ईस्ट इंडियन स्क्रू ट्री लॅ. हेलिक्टेरिस आयसोरा कुल-स्टर्क्युलिएसी). सुमारे १·५५–४·६५ मी. उंच व काहीसे पानझडी व मोठे झुडूप अथवा लहान वृक्ष असून ह्याच्या हेलिक्टेरिस या प्रजातीतील एकूण ६० जातींपैकी भारतात फक्त चार आढळतात. मुरडशेंग ही उपयुक्त औषधे आणि धागे यांकरिता महत्त्वाची अशी एकच जाती आहे. हिचा प्रसार भारतातील रुक्ष जंगलात सामान्य आहे बहुतेक ठिकाणी या झुडपांचे लहान मोठे संघ निम्नरोह (इतर वृक्षाखाली वाढणाऱ्या थराच्या) स्वरूपात आढळतात. छाटणी केल्यावर किंवा वरचा भाग जळून गेल्यास राहिलेल्या खुंटांपासून याची पुन्हा जलद, चांगली वाढ होते. त्रावणकोरच्या जंगलात सु. १२,००० हेक्टर क्षेत्र याने व्यापले आहे. याच्या दाट जाळ्या अभेद्य असतात. या झुडपाच्या कोवळ्या भागांवर बारीक लव असून जून खोडांवर करडी साल असते पाने साधी, ७–१२ X ६ सेंमी., एकाआड एक, दातेरी, तळाशी तिरपी, काहीशी हृदयाकृती आणि निमुळती असून त्यांची खालची बाजू लवदार व वरची बाजू खरबरीत असते. द्विलिंगी फुले प्रथम लाल, नंतर निळसर, सु. २·५–५ सेंमी. लांब, द्वयोष्ठक (दोन ओठांप्रमाणे) असून २–६ च्या झुबक्यात किंवा एकेकटी, पानांच्या बगलेत ऑगस्ट ते डिसेंबरात येतात. संवर्त पेल्यासारखा सुट्या पाकळ्या पाच पण त्या सारख्या नसतात केसरदलांचा दांडा किंजधराशी तळात जुळलेला असतो त्यावर ऊर्ध्वस्थ किंजपुट असतो. फुलांतील पाच पक्व किंजदले सर्पिल प्रकारे वळून व परस्परांस चिकटून त्यांचे फिरकीसारखे (मुरड घातल्यासारखे) शुष्क फळ धारदार फळ बनते त्यावरून इंग्रजी व मराठी नावे पडली आहेत. फळे ५–६ सेंमी. लांब, हिरवट तपकिरी व गोलसर असून पक्व झाल्यावर किंजदले पुन्हा सरळ होत असताना, तडकून बिया विखरून पडतात. प्रत्येक किंजदलाचा स्वतंत्र पेटिका फळाप्रमाणे स्फोट होतो. बिया अनेक, कोनयुक्त आणि बारीक असतात. याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे मुचकुंद कुलात अगर ⇨ स्टर्क्युलिएसीत वर्णिल्याप्रमाणे असतात. ह्या वनस्पतीचे दोन प्रकार आढळले आहेत. पानांची खालची बाजू गुळगुळीत असलेला प्रकार टोमेंटोजा या नावाने ओळखला जातो आणि हा उत्तर व मध्य भारतात विशेषेकरून आढळतो. ग्लॅब्रेसेन्स ह्या दुसऱ्या प्रकारात पानांच्या दोन्ही बाजू गुळगुळीत असतात ह्या प्रकारची झुडपे त्रावणकोरमध्ये लागवडीत आहेत.

ग्लॅब्रेसेन्स या प्रकाराचे बी पावसाळ्यात लावतात. याला सकस जमीन आणि वार्षिक पर्जन्यमान सु. ३०० सेंमी. लागते. वाळवंटी अथवा जांभ्या खडकाळ जमिनीत याची वाढ खुरटते, फांद्या अधिक येतात व साल पातळ बनते. दुसऱ्या वर्षानंतर फुले व फळे येऊ लागतात. मार्च ते सप्टेंबरमध्ये फुले आणि डिसेंबर ते जानेवारीत फळे येतात. साधारणपणे १–१·५ वर्ष वाढलेल्या झाडांच्या सालीपासून उत्तम प्रतीचा धागा मिळतो. २ वर्षे झालेल्या खोडापासून काढलेला धागा भरड आणि ठिसूळ असतो. जून खुंटापासन फुटलेल्या नवीन खोडांचा धागा त्याच वर्षाअखेर काढता येतो. अंतर्सालीतील ⇨ परिकाष्ठात असलेल्या घन आवरणाच्या घटकांचा [⟶ दृढोतक], धाग्याच्या दृष्टीने उपयोग होतो. हा धागा फिकट तपकिरी वा हिरवट करड्या रंगाचा, नरम, रेशमासारखा व चकचकीत आणि सु. १·२४–२·१७ मी. लांब असतो. तो तागापेक्षा कमी मजबूत असला, तरी अधिक टिकाऊ असतो. त्याचा वापर जाड्या भरड्या पिशव्या, कॅन्व्हास व सुतळीकरिता होतो. काथ्याच्या वस्तूंपेक्षा मुरडशेंगेच्या धाग्यांच्या वस्तू (पिशव्या व दोऱ्या) अधिक श्रेष्ठ मानतात. मुरडशेंगेच्या काटक्यांपासून कागद बनविता येतो.

कोवळ्या फांद्यांचा कोवळा चारा गुरांना पोषक ठरला आहे. सुकी फळे (मुरडशेंगा) पोटाच्या तक्रारीवर (उदा., मुलांची पोटफुगी, मुरडा इ.) गुणकारी असताता. मुळे व खोडे कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी), शोथशामक (आग कमी करणारी), स्तंभक (आकुंचन करणारी) व दुग्धऱ्हासक (दूध कमी करणारी) असतात. शरीरात कोठेही, विशेषतः छातीत, पू झाल्यास अथवा जठर विकारात मुळांचा रस हितकारी असतो कोकणात मधुमेहात मुळांचा रस देतात साल अतिसार, आमांश व पित्तामुळे आलेली मळमळ यांवर देतात. या वनस्पतींच्या लाकडाचा कोळसा बंदुकीच्या दारूकरिता वापरतात.

संदर्भ : C. S. I. R. The wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.

पराडकर, सिंधु अ. परांडेकर, शं. आ.