मुधोळ : कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण व भूतपूर्व मुधोळ संस्थानाची राजधानी, लोकसंख्या २१,३५६ (१९८१). हे जमखंडीपासून दक्षिणेस १९ किमी.वर घटप्रभा नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. जुन्या काळी ‘मुदुवोलाल’ (सुंदर शहर) या नावाने ते ओळखले जाई. याच्याभोवती एक पडका तट आहे. हे शहर आदिलशाही, मोगल, मराठा व पेशवे यांच्या अंमलांखाली होते. १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात कर्नाटक राज्यात त्याचा समावेश झाला. शहराच्या मध्यवस्तीत असलेले संस्थानिकांचे निवासस्थान आणि इतर इमारती प्रेक्षणीय आहेत. शहराच्या उत्तर बाजूस एक पुरातन दर्गा आहे. कन्नड कवी रन्न याचे हे जन्मस्थान असून येथे त्याचा दगडी अर्धपुतळा व आश्रम यांचे अवशेष आढळतात. येथील नगरपालिकेची स्थापना १८७२ मध्ये झाली. शहरात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सार्वजनिक उद्यान इ. सुविधा आहेत. यांशिवाय येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय, निरीक्षणगृह, कापूस वटण व दाब गिरणी आहे. दर शुक्रवारी येथे बाजार भरतो. आसमंतात इमारती दगड व चुना मिळतो. ज्वारी, बाजरी, राळा, हरभरा, तूर ऊस, विड्याची पाने इ. येथील प्रमुख उत्पादने होत. मुधोळच्या महाराजांनी प्रचलित केलेला ‘मुधोळ हाउंड’ किंवा ‘मराठा हाउंड’ ही शिकारी कुत्र्याची जात प्रसिद्ध आहे.