मुद्रितशोधन : (प्रुफ करेक्शन). मुद्रिते वाचून त्यांतील चुकांचे दिग्दर्शन करणे म्हणजे मुद्रितशोधन होय. वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ-पुस्तके, पुस्तिका, विज्ञापन-पत्रिका, लहानमोठी हस्तपत्रके इ. प्रकारांतील कोणत्याही मजकुराचे अंतिम मुद्रण होण्यापूर्वी त्याचे मुद्रितशोधन करण्याची आवश्यकता असते. मुद्रितशोधनाचे हे काम मुद्रितशोधक (प्रुफ-रीडर वा करेक्टर) आणि मुद्रितसहायक किंवा मूळप्रतवाचक (कॉपी होल्डर) अशा दोन व्यक्तींद्वारा होत असते. कधी कधी मात्र दोघांचेही काम एकच व्यक्ती करते.
जुळाऱ्याने मजकुराची जुळणी केल्यावर तो मजकूर एका हातयंत्रावर चढवून त्यांची एक मुद्रणप्रत तयार करतात आणि ती मुद्रितशोधकाकडे देतात. या मुद्रणप्रतीला हस्तमुद्रित म्हणतात. हे हस्तमुद्रित मुद्रितशोधक मूळ हस्तलिखिताशी ताडून पाहतो आणि त्यात काही मुद्रणदोष आढळल्यास ते तो विशिष्ट चिन्हांद्वारे हस्तमुद्रितात दर्शवितो.
या मुद्रितशोधन-चिन्हांबाबत काही आंतरराष्ट्रीय संकेत ठरलेले आहेत तथापि त्यांत सर्वत्र एकसारखेपणा मात्र आढळत नाही. काही चिन्हांबाबत देशपरत्वे फरक दिसून येतो. भारतामध्ये केंद्रशासनाने वजनमापाप्रमाणेच ही चिन्हेही प्रमाणित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सांप्रत इंडियन स्टँडर्ड्स-इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या सूचनेनुसार केलेल्या मुद्रितशोधन चिन्हांचा वापर सर्वत्र करण्यात येतो.
कामाच्या सुकरतेसाठी काही मुद्रणालयांत स्थानीय संकेत (हाउस स्टाइल) या विशिष्ट पद्धतीचा वापर करण्यात येतो. या पद्धतीत जुळारी व मुद्रितशोधक यांना मार्गदर्शक तत्त्वे त्या त्या मुद्रणालयातील कामाच्या स्वरूपानुसार निश्चित केलेली असतात. मुद्रणविषयक तांत्रिक पद्धत आणि शुद्धलेखन व भाषाविषयक रीत अशा दोन बाबींचा त्या मार्गदर्शक तत्त्वांत समावेश असतो. तरीपण सर्वसंमत मुद्रितशोधन-चिन्हांशी त्यांचा बराच मेळ राखण्यात येतो.
जगात सर्वत्र मुद्रितशोधन चार टप्प्यांतून चालते. हस्तलिखिताची जुळणी झाल्यावर सर्वप्रथम मुद्रित मजकूर एका पाटा (गॅली) वर ठेवून काढण्यात येतो म्हणून त्याला पाटमुद्रित, सलग मुद्रित, कच्चे मुद्रित किंवा मुद्रणालयाचे मुद्रित असे म्हणतात. या मुद्रितात मुख्यत्वे शब्द अथवा ओळी सुटणे, शब्दांची अशुद्ध रूपे, टंक (मुद्राक्षर) तुटणे, शब्दांतील वर्ण गळणे, ओळी वाकड्या होणे, शब्द वा ओळी यांतील अंतर एकसारखे नसणे इ. जुळाऱ्याकडून होणाऱ्या चुकांची दुरूस्तीच अभिप्रेत असते. त्यानंतरच्या द्वितीय पाटमुद्रितामध्ये पूर्वी दर्शविलेल्या दुरुस्त्या कार्यान्वित केलेल्या आहेत किंवा काय, हे पहावयाचे असते. शिवाय अन्य दुरुस्त्याही सुचवावयाच्या असतात. त्यानंतरचा तिसरा टप्पा पृष्ठमुद्रिताचा असून त्यामध्ये ग्रंथकाराने दिलेल्या सूचनांचा प्रामुख्याने विचार करावयाचा असतो. शीर्षके, उपशीर्षके, त्यांचे टंकप्रकार, चित्रे, आकृत्या, कोष्टके व मागील-पुढील संदर्भ इत्यादींकडे कटाक्षपूर्वक लक्ष द्यावे लागते.
ही जवळजवळ शेवटची तपासणी झाल्यावर पृष्ठसंच दोऱ्याने बांधून आणि तो चौकटीत घालून यंत्रांवर चढविण्यात येतो. त्यालाच इंग्रजीत ‘लॉक-अप’ करणे असे म्हणतात. त्यानंतर एक यंत्रमुद्रित काढण्यात येते. त्याला अंतिम यंत्रमुद्रित म्हणतात. या मुद्रितात पूर्वीच्या दुरूस्त्यांशिवाय संचाची संदर्भ खूण (फॉर्म सिग्नेचर), सुस्पष्ट मुद्रणचित्रे, आकृत्यांची सुस्थिती (रजिस्ट्रेशन) इ. बाबी पाहावयाच्या असतात. शेवटी मुद्रितशोधकाने हे मुद्रित मान्य केल्यावरच यंत्रचालक मुद्रणास प्रारंभ करतो.
हस्तजुळणीप्रमाणेच यंत्रजुळणीमध्येही मुद्रितशोधन करावे लागते. मोनोटाइप मुद्रितांचे शोधन हस्तजुळणी मुद्रितांप्रमाणेच असते. याच अखंड मोनोटाइप मुद्रितांच्या शोधनात संपूर्ण शब्द न दर्शविता त्याची आवश्यक तेवढीच अंशात्मक दुरुस्ती दर्शवावी लागतो. तसे न करता संपूर्ण शब्दच बदलला, तर जुळाऱ्याला व्यर्थ कष्ट पडतात. लायनो टाइपाच्या मुद्रितात अखंड ओळीतच जुळणी होत असल्याने त्यात दुरुस्तीला बराचा कमी वाव असतो. चुकीचा शब्द वा अक्षर आढळल्यास ती मातृकाच काढून टाकून तेथे नवी मातृका वापरावी लागते. तसेच ओळीतील अक्षरे सरळ रेषेत येतील, अशीही खबरदारी घ्यावी लागते.
ग्रंथ वा पुस्तकांच्या मुद्रणापेक्षा निमंत्रणे, जाहिराती, विवाह वा अभीष्टचिंतनपत्रिका, पुस्तिका, हस्तपत्रिका, व्यापारी-पत्रके, प्रचार साहित्य यांच्या मुद्रणात रचनातंत्राला विशेष महत्त्व असते. विशेषतः पत्रिकाप्रकारात तर महत्त्वाचा भाग योग्य ठिकाणी आला की नाही हे प्रामुख्याने पहावे लागते. तसेच त्यांतील मुद्रांचा वापर योग्य प्रकारे झाला की नाही, याबाबतही जागरुकता ठेवावी लागते. बँकांसारख्या संस्थांच्या अहवाल-पुस्तिकेतील मागील-पुढील संदर्भ, स्तंभ, आकडे, कोष्टके यांच्या बाबतीत मुद्रितशोधकास फारच दक्ष रहावे लागते. एकूण मुद्रितशोधकाला जुळणीची तसेच ज्याचे मुद्रण करावयाचे असेल त्याच्या विषयाची यथायोग्य माहिती असणे अगत्याचे असते.
पहा : मुद्रणयोजन (मुद्रितशोधन).
संदर्भ : 1. Lee, Marshall, Book making, New York, 1965.
2. Hart, Horace, Hart’s Rules, New York, 1983. ३. धायगुडे, य. ए. मुद्रित-शोधन, पुणे, १९६०.
जोशी, चंद्रहास
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..