मुद्‌गल : कर्नाटक राज्याच्या रायचूर जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या ११,४५८ (१९८१). हे रायचूरच्या नैर्ऋत्येस सु. ९६ किमी. वर असून शहर व त्याच्या परिसरात अनेक ऐतिहासिक कोरीव लेख आहेत. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला काकतीय राजवटीच्या काळात मुद्‌गल हे महत्त्वाचे सैनिकी ठाणे होते. देवगिरीच्या पाडावानंतर या भागात मुसलमानी अंमल होता. बहमनी सत्ता व विजयानगर साम्राज्य यांच्या संघर्षात मुद्‌गलच्या परिसरात अनेक लढाया झाल्या. विजयानगर साम्राज्याचा लोप झाल्यावर मुद्‌गल-रायचूर हा प्रदेश आदिलशाहीच्या आधिपत्याखाली होता.

बालेकिल्ला, भोवतालचा मोठा कोट आणि पाण्याने भरलेला रुंद खंदक ही येथील किल्ल्याची वैशिष्ट्ये. बालेकिल्ल्यात वाडा, शिबंदीच्या कोठ्या, दारूची कोठारे, पाण्याच्या टाक्या असून, काही ठिकाणी हिंदू व इस्लामी शिल्पांचे संमिश्रणही झालेले दिसते. येथील ऐतिहासिक इमारती हिंदू वास्तुशिल्पाच्या निदर्शक असून नागदेवता, हनुमान यांच्या कोरलेल्या मूर्ती, देवळातील कोरीव खांब, दरवाजांचे आकार उल्लेखनीय आहेत. तथापि काही दरवाजांचे आकार, तोफेचे मोर्चे यांवरून मुसलमानी वास्तुरचनेचा प्रभावही दिसून येतो. मशिदीतील खांबांवरून तेथे पूर्वी हिंदू देवालय असावे असे दिसते. गावात इब्राहिम आदिलशहाने दिलेल्या जागेवर जेझुइट पाद्र्यांनी चर्च बांधले होते ते जीर्ण झाल्याने त्याच्या जागी नवीन चर्च बांधण्यात आले आहे.

देशपांडे, चं. धुं.