मुद्रणयोजन : (टायपोग्राफी). पुस्तकादी प्रकाशनांतील पृष्ठांची छपाई करताना अक्षरांचे वळण आणि एकूण मजकुराचा आकृतिबंध यांची कलात्मक योजना करणे,म्हणजे मुद्रणयोजन किंवा टायपोग्राफी असे स्थूलमानाने म्हणता येईल. मुद्रण हे वाचनास सोपे, डोळ्यांना सुखद व विषयानुरूप शैलीत असेल, तरच ते परिणामकारक ठरते. म्हणूनच अक्षरमुद्रांची निवड करून छापले जाणारे पृष्ठ हे त्यातील मजकुराच्या आशयाला अनुरूप आणि उठावदार करणारे असावे, असा मुद्रणयोजनामागील हेतू असतो. विद्यमान काळात मुद्रणयोजनतंत्रात प्रकाशजुळणी (फोटोकंपोझिंग) सारखी आधुनिक मुद्रणतंत्रे जशी अंतर्भूत होतात तसेच ग्रंथाचे किंवा पुस्तकाचे दृश्यरूप आकर्षक आणि परिणामकारक करणाऱ्या विविध वळणांच्या मुद्रा, कागद व छपाईची शाई यांसारखे घटकही येतात. छापील पृष्ठ व ग्रंथ यांची वेधक दृश्य-प्रतिमा तयार करणे हे, मुद्रणयोजनाचे कलात्मक लक्ष्य होय. अलीकडे मुद्रणयोजनेला मुद्रापूर्व नियोजन (प्री -प्रेस प्लॅनिंग) असेही म्हटले जाते.

उत्तम मुद्रारचनाकाराने ग्रंथलेखकाचे विचार परिणामकारक करण्याऐवजी जर मुद्रांच्या किंवा रचनांच्या चमत्कृतीवर भर दिला, तर मूळ उद्देश सुटून वाचक चमत्कृतीतच गुंतून पडेल म्हणून मुद्रारचनाकाराने हेच टाळवयास हवे. अक्षरांची सन्निध किंवा विरल रचना, मजकुरातून पांढऱ्या नद्या खाली वाहताना दिसणे परिच्छेदापूर्वी माया नसणे हे रचनेचे प्रमुख दोष ठरतात. या दृष्टीने मुद्राशैलीची निवड फार महत्त्वाची असते. ती स्वच्छ आणि विषयाला अनुरूप असावी व डोळ्याला खुपणारी नसावी. लांबीरुंदीची निवड तसेच ओळींची लांबी या बाबी, ते पुस्तक खिशात मावण्यासाठी आहे की शालेय आहे किंवा चरित्रग्रंथ आहे, यावरून ठरवायच्या असतात. मुद्रांचा आकार, पानांवरील काळ्या आणि पांढऱ्या भागांचा तोल. हे ठरविण्यासंबंधीच्या नियमांपेक्षा ह्या गोष्टींचा निर्णय ‘दृष्टी’ अधिक यथार्थतेने करते. डाव्या-उजव्या बाजूंच्या पानांनी मिळून एक क्षेत्र तयार होते. त्यावरील डावी, मधली व उजवीकडील माया शक्यतो सारखी असावी असा संकेत आहे. तसेच बांधणीत किती माया जाईल हेही पहावे लागते. चित्र आणि मुद्रा यांनी व्यापलेल्या भागातही संतुलन राखावे लागते, संबंध पानात जर एकच चित्र असेल, तर ते भौमितिक मध्याच्या थोडे वर असावे, असा संकेत आहे.

धातुमुद्रांच्या व्यावहारिक उत्पादनाचा प्रारंभ मेंझ (जर्मनी) च्या गूटेनबेर्कने इ. स. १४३० मध्ये केला. पंधराव्या शतकातच निकोलस जेन्सन, व्हेनिसचा प्रख्यात मुद्रकार ऑल्दस मानूशिअस, इंग्लंडचा विल्यम कॅक्स्टन (१४७६), तर सोळाव्या शतकात क्लोद गारामाँ, अठराव्या शतकात विल्यम कॅझ्लन, बॅस्कर व्हिल, फूर्न्ये, जाम्बात्तीस्ता बोदोनी, दीदो तसेच अमेरिकेतील बेंजामिन फ्रँक्लिन आणि फ्रेडरिक गाउदी, आणि उर्वरित यूरोपातील ब्रूस रॉजर्झ, स्टॅन्ली मॉरिसन, एरिक गिल प्रभूतींनी रोमन मुद्रांचे क्षेत्र समृद्ध करून सोडले. हल्ली हरमन झाप, ॲड्रियन फ्रूतिगेर, नोव्हरीसे आल्दो वगैरे अनेक मुद्राकार या क्षेत्रात नव्या शैलीची भर घालीत आहेत तर नव्या शैलीनिर्मितीत पुण्याची इन्स्टिट्यूट ऑफ टायपोग्रॉफिकल रिसर्च या संस्थेलाही जगन्मान्यता लाभलेली आहे. तेथे सांप्रत सर्व भारतीय लिप्यांचे आरेखन कार्य चालू असते.

मुद्राशैली : (टाइप स्टाइल). इंग्रजी म्हणजे रोमन मुद्रांच्या जशा शेकडो शैली उपलब्ध आहेत तशा त्या भारतीय लिप्यांच्या नाहीत. याचे कारण बाराखडीतील अक्षरांचे लहान-मोठे आकार हे होय. जोपर्यंत मुद्रांचे उत्पादन ही केवळ हस्तकौशल्यावर आधारित बाब होती तोपर्यंत ही अडचण विशेष भासली नाही. पाश्चात्य मिशनरी लोकांकडून ही कला शिकून कलकत्त्यातील पंचानन कर्मकार आणि मनोहर, तसेच मुंबईतील गणपत कृष्णाजी व निर्णयसागरचे राणोजी रावजी आरू यांनी नागरी वा देवनागरी लिपीच्या [⟶ नागरी लिपि] अप्रतिक शैलीच्या मुद्रा एकोणीसाव्या शतकात करून दिगंत कीर्ती मिळविली. त्यांच्यासमोर बोरूने लिहिलेले वळणदार अक्षर हा एकमेव आदर्श होता व छपाईत हेच एकुलते एक वळण उपलब्ध होते. [⟶ सुलेखन].

निरनिराळ्या साधनांनी तयार केलेली अक्षरे समोर ठेवून पाश्चात्त्य मुद्राकारांनी शैली निर्मिल्या, इतकेच नव्हे, तर पंजा (पँटोग्राफ) हे साधन कोरण्यासाठी वापरून एकेका शैलीची लहानमोठ्या आकाराची मुद्रांची कुटुंबे मुद्रारचनाकारांना उपलब्ध करून दिली. भारतात मात्र त्यांचाही अभाव जाणवतो. दुसरी विदारक गोष्ट अशी, की येथील मुद्रा उत्पादकांनी (टाइप फाउंडर) परकीय मातृका (मॅट्रिस) भाड्याने घेऊन त्यावर पैसा तर मिळविलाच शिवाय हाताने नरखिळे (मुद्राकारक) कोरणाऱ्या देशी कारागिरांना उपाशी मारून ते कोरणाऱ्या कारागिरांची परंपराच बंद पाडली. याशिवाय निर्णयसागर, हुई (कलकत्ता) यासारख्यांच्या नव्या कोऱ्या मुद्रा एकदाच विकत घेऊन व विद्युत्‌लेपनतंत्राने त्यांच्या त्यांनी नकली मातृका तयार केल्या. या त्यांच्या उपक्रमामुळे त्यांच्या हातून नकळत देशाला मुद्राशैलीच्या बाबतीत दरिद्री बनविण्याचे कृत्य घडले. इतकेच नव्हे तर एस्. के. संत आणि वसंतराव ओतुरकरांसारख्या होतकरू मुद्राकारांची कोंडी होऊन त्यांना हे क्षेत्र सोडावे लागेल तथापि पुण्याच्या काही कोंडी होऊन त्यांनी हे क्षेत्र सोडावे लागले तथापि पुण्याच्या काही जिद्दी मुद्राकारांनी हाताने नर-खिळे कोरून व देवनागरीच्या नव्या विज्ञापन-मुद्राशैली (डिस्प्ले टाइप स्टाइल) निर्मून राष्ट्रीय पारितोषिके मिळविली. समाधानाची गोष्ट अशी की यूरोपात ज्यावेळी धातुमुद्राशैलीच्या उत्पादनाला उतरती कळा लागली होती, त्यावेळी पुण्याच्या एक्सपर्टो मुद्रासंस्थेने पंजा-साधनांच्या पद्धतीत प्रावीण्य मिळवून सर्व भारतीय लिप्यांच्या मातृकांचे उत्पादन सुरू केले आणि प्रकाशमुद्रणात (फोटोप्रिंटिंग) भारतीय लिप्या उपलब्ध करून देण्याच्या कामी हातभार लावला. परिणामतः प्रकाशमुद्रणामुळे नव्या मुद्राशैली उपलब्ध होण्यासाठी नवे दालन उघडले गेले.

माणसामाणसांतील वैशिष्ट्यांचा फरक हा जसा त्याच्या आवाजाचा सूर आणि शैली यांमुळे जाणवतो. त्याचप्रमाणे मुद्रणयोजनालादेखील स्वतःचे व्यक्तिमत्त्व, शैली व भाषा असते. अक्षरांतील किंवा ओळींतील अंतर, अक्षरांचा मोकळेपणा व तोल अशा बारीकसारिक गोष्टींचा परिणाम छपाईचा देखणेपणा आणि वाचनीयता यांवर होत असतो.

मुद्रा : याला इंग्रजीत टाइप व मराठीत मुद्रा असे शब्द असून ही मुद्रा धातूच्या एका आयताकार तुकड्यावर ढाळून वा कोरून उठविण्यात येते. या मुद्रेत अक्षरे, काना, मात्रा, उकार, वेलांट्या, रफार, विसर्ग, अवग्रह, अनुस्वार, विरामचिन्हे, आकडे अथवा अन्य अलंकरणात्मक नक्षीचे नमुने यांचा अंतर्भाव होतो. अशा प्रमाणित मुद्रेची उंची तिच्या मुखापासून तलापर्यंत शीर्षकांच्या मुद्रेसाठी (हेडिंग टाइपासाठी) ०·९१८ इंच (२३–३२ मिमी.) व ग्रंथातील मजकुरासाठी ०·९२० इंच (२३·३७ मिमी.) इतकी असते. तिची विविध अंगे असून त्या प्रत्येकाला स्वतंत्र नावे दिलेली असतात. ती अशी : (१) मुद्रा-मुख : (टाइप फेस). मुद्रेच्या अग्रभागी असलेले उत्थित अक्षर वा तत्सम चिन्हाकृती. याचाच मुद्रणासाठी वापर होतो. (२) अक्षरालंकार : (सेरिफ). मुद्रा-मुखाची वरील व खालील वाढीव टोके. मुद्रा-मुखाचे सौंदर्य वाढविणे हा याचा हेतू आहे. ही टोके ज्या मुद्रांना नसते त्यांना अलंकरणरहित (सान्स सेरिफ) किंवा गिल (सान्स) म्हणतात. (३) मुद्रा-मुहर : (काउंटर). मुद्रामुखाचा खोलगट भाग. (४) मुद्रा-ग्रीवा : (नेक किंवा बीअर्ड). मुद्रामुख व मुद्रा-स्कंध यांमधील तिरकस भाग. (५) मुद्रास्कंध : (शोल्डर) मुद्रा-ग्रीवा व मुद्रांग यांमधील भाग. (६) मुद्रांग : (बॉडी). मुद्रा-ग्रीवा व मुद्रा-तल यांमधील भाग. (७) मुद्रा-तल : (फूट) मुद्रेखालील तळाचा भाग. यावरच मुद्रा सरळ उभी ठेवता येते. (८) मुद्रा-खोबण : (ग्रूव्ह). मुद्रा हातात धरली असता ती सरळ आहे किंवा नाही हे जुळाऱ्याला (कंपॉझिटर) यामुळेच कळून येते. तसेच मुद्रा-खोबणीमुळे विविध आकारांच्या मुद्रा वेगवेगळ्या करता येतात. (९) मुद्रा-टाचण चिन्ह : (पिन). हे मुद्रेच्या एका बाजूला असून त्यात निर्मात्याने आपले बोधचिन्ह व मुद्रेचा आकार दर्शविलेला असतो. याला डोळा असेही म्हणतात. (१०) मृदा-स्पर्शिका : (निक). दोन मुद्रा-तलांना वेगळी करणारी खाच. हिच्यामुळे केवळ स्पर्शाने लहानात लहान मुद्रा सरळ उभी आहे. हे जुळाऱ्याला कळते.

देवनागरी मुद्राक्षरांचे विविध नमुने
७२ पॉ. डिग्री

मराठी विश्वकोश

४८ पॉ. डिग्री

सर्वविषयसंग्राहक आहे.

३६ पॉ. शंकर

मराठी विश्वकोश सर्वविषय संग्राहक आहे.

२० पॉ. छबुबाई

मराठी विश्वकोश सर्वविषयसंग्राहक आहे.

१६ पॉ. अविराज

मराठी विश्वकोश सर्वविषयसंग्राहक आहे.

१४ पॉ. ब्लॅक

मराठी विश्वकोश सर्वविषयसंग्राहक आहे.

१४ पॉ. साधा

मराठी विश्वकोश सर्वविषयसंग्राहक आहे.

१२ पॉ. ब्लॅक

मराठी विश्वकोश सर्वविषयसंग्राहक आहे.

१२ पॉ. साधा

मराठी विश्वकोश सर्वविषयसंग्राहक आहे.

१० पॉ. साधा

मराठी विश्वकोश सर्वविषयसंग्राहक आहे.

देवनागरी मुद्राक्षरांचे विविध नमुने

 

मुद्रारचनेचे इतर साहित्य : मुद्रारचनेसाठी मुद्रेप्रमाणेच ज्या इतरही साहित्याचा वापर करण्यात येतो ते साहित्य पुढीलप्रमाणे असते. चौरस : (क्कॉड आणि कोटेशन). उंचीत कमी परंतु मुद्रांच्याच लांबी-रुंदीचे हे तुकडे रिकामी जागा भरण्यासाठी लागतात. हे बहुधा /म (एम्), १-म, २-म व ३-म या आकारांचे असतात. ‘म’ म्हणजे मोज किंवा मुद्रांच्या लांबीचा चौरस. अर्थात जेवढ्या शैली तेवढे हे मोज लागतात. हे मोज पोकळ असतात. आवलि-पट्टिका : (लेड, स्लग व रूल). सहा बिंदूंहून कमी जाडीच्या मुद्रा-धातूच्या तुकड्यांना स्कंध पट्टी (लेड) म्हणतात. त्याहून जाड तुकड्यांना मुद्रापट्टी (स्लग) आणि अंतरासाठी मध्ये घासण्यात येण्याऱ्या पट्ट्यांना रेखापट्टी (रूल) म्हणतात. मुद्रा-संच : (फाँट). मुद्रणात जे वर्ण (चिन्हे) लागतात, त्यांची व्यवहारात लागणारी वारंवारता (फ्रीक्‌वेंसी) ही वेगवेगळी असते. त्यावरून साधारणपणे त्या त्या प्रमाणात एका संचात ते ते वर्ण भरतात. त्यांत मुळाक्षरे, अवयव, मात्रा, जोडाक्षरे, विरामादी चिन्हे, अंक व अलंकार असून त्यांचे संच बांधून विक्रीसाठी तयार ठेवतात. रोमनपेक्षा देवनागरीचे मुद्रासंच साहजिकच संख्येने मोठे असतात. मुद्रा-एकक : (पॉइंट). लांबीच्या एककाला ‘पॉइंट’. (मुद्रा-एकक) म्हणतात. म्हणतात. तो अंदाजे /७२ इंच किंवा ०·०१३८३ इंच असतो. प्रपाद : (पायका). रूंदीच्या मोजाला इंग्रजी ‘पायका’ म्हणतात. ते मोज / इंच म्हणजे ‘०·१६६०६६६इंच असते. या मोजणीसाठी’म-रूळ’ (एम्-रुल) ही मोजपट्टी तयार मिळते. ओळींची रूंदी प्रपादात (पायकात) सांगतात. हल्ली मात्र सर्व मोजमापे सेंटिमीटर मिलिमिटरमध्ये सांगण्याचा नवा प्रघात रूढ होत आहे.

मुद्रागणित : व्यावसायिक मुद्रकाला किंवा मुद्रारचनाकाराला हे गणित यावेच लागते. यावरून प्रत्येक ओळीत अथवा पानात किती शब्द मावतात याचे गणित करून व हस्तलिखित वा टंकमुद्रित प्रतीवरून एकुण पुस्तक किती पांनाचे होईल, तसेच त्याचे उत्पादन मूल्य काय होईल, हे सांगता येते. ती मोजे अशी : ८ मुद्रा- एकक मुद्रेचे (पाँइंट टाइप) १ इंचात, ९ सेटएम्‌ मावतात. १० मुद्रा-एकक मुद्रेचे (पॉइंट टाइप) १ इचात, ७·२ सेटएम्‌ मावतात.१२ मुद्राएकक मुद्रेचे (पाँइंट टाइप) १ इंचात, ६ सेटएम् मावतात.

मुद्रांचा सुविहितपणा : मुद्राच्या शैलीवरून मुद्राचे गर्व ठरविण्यात येतात. कोणत्या साहित्यासाठी  कोणती शैली योजावी, हे मुद्रारचनाकाराने ठरवायचे असते. मुदणसंस्था आपल्या कारागिरांच्या मार्गदर्शनासाठी ‘शैली पुस्तक’ (स्टाइल बुक) छापतात व त्यांना ते संदर्भासाठी उपलब्ध करून देतात. या पुस्तकामुळे अव्यवस्थित रचनेला आपोआप पायबंद बसतो. शैली-मिश्रण करताना ठराविक गटाच्या मुद्रांचीच सरमिसळ करतात. उदा. इंग्रजीच्या अलंकृत (सेरिफ) शैलीत देवनागरीच्या फाट्याच्या शैलीचे निर्णयसागर वळण शोभते पण ते इंग्रजी गॉथिक/गिलसा (अलंकरणरहित समदंड) वळणाबरोबर शोभत नाही. ‘संत’ किंवा ‘योगेश’ शैली ही गॉथिक/गिलसा या इंग्रजी वळणात चपखल शोभते. भलत्याच शैलींचे मिश्रण अडाणीपणाचे ठरते.

मुद्रितशोधन : (प्रूफ करेक्शन) मुद्रणयोजनात मुद्रितशोधनाला अत्यंत महत्व आहे. मुद्रितशोधक बहुश्रृत असावा लागतो व त्याला मुद्रणकलेच्या सर्व अंगांची माहिती असावी लागते. तसेच त्याला मुद्रांच्या विविध शैली व आकार, चिन्हे, माया, जुळणी, हातजुळणी व यांत्रिक जुळणीची पूर्ण माहिती असणे आवश्यक असते. [⟶ मुद्रितशोधन].

इतर महत्त्वाची अंगे : मुद्रणयोजनातील काही महत्त्वाची अंगे पुढीलप्रमाणे आहेत : इंग्रजीचा वर्णक्रमविवेक (स्पेंलिग रूल) संयुक्त वर्णाचा (लिगेचर) उपयोग शब्दविभाजन म्हणजे ओळीच्या शेवटी शब्द कोठे तोडावेत (वर्ड सेग्मेंटेशन) ठळक (जाड) मुद्रा (टाइप) लंबमुद्रा (रोमन टाइप) किंवा तिर्यक (इटॅलिक) अशा मुद्रांचा वापर अक्षरानुरूप अंकांची शैली परंपरामान्य शब्दसंक्षेप उदा. सो l ‍. (साहेब), इ. (इत्यादी), उदा., (उदाहरणार्थ) वगैरे विराम चिन्हांचा उपयोग, पानांची व स्तंभांची मापे ओळीतील अंतर शब्दातील अंतर परिच्छेदाच्या प्रारंभाचे मोज ओळीच्या शेवटी खंड चिन्हांचा वापर शीर्षकाचे स्थान-शैली-मांडणी तळटीपांची पद्धत आद्याक्षर योजना अक्षरांतील अंतर अधोरेखनाची स्थाननिश्चिती तिर्यक मुद्रेची स्थाननिश्चिती संदर्भ चिन्हांचा उपयोग, अवतरण चिन्हांचे तारतम्य ओळीची सम्यकता (अलाइनमेंट) अवतरणांची सम्यकता डावी सम्यकता (लेफ्ट अलाइनमेंट) उजवी सम्यकता ( राईट अलाइनमेंट) दृक केंद्र (ऑप्टिकल सेंटरिंग) चित्रांचे स्थान चारहीकडील माया (स्पेस) इत्यादी. या सर्व घटकांवर छपाईची सुबकता व परिणामकारकता अवलंबून असते.

जाहिरातींची मुद्रारचना : शीर्षक मुद्रा (डिस्ले टाइप) हसू, रडू वा ओरडू शकतात. धक्का देऊ शकतात तशाच रचनासुद्धा ओरडू शकतात, धक्का देऊ शकतात म्हणूनच अक्षररचनेत अनुरूप आशयाची अभिव्यक्ती दाखविल्यास प्रसिद्धीचे साहित्य परिणामकारक ठरू शकते.

जाहिरातरचनेत आकर्षकता व वाचनीयता तर हवीच; परंतु त्याचबरोबर स्पष्टता व परिणामकारकता देखील हवी असते. आकार, मोकळेपणा, रंग, चित्रे आणि मुद्राशैली यांचा सुयोग साधणे आवश्यक असते.[⟶ जाहिरात].

पहा : आखणी; आरेख्यक कला; उत्कीर्णन; मुद्रण; मुद्रानिर्मिति.

संदर्भ : 1. Arnold, Edmund C. Functional Newspaper Design, New York, 1956.

2. Biggs, J. R. Basic Typography, Oxford, 1969.

3. Day, Kenneth, Book Typography, London, 1966.

4. Ettenberg, Eugence M. Type for Books and Advertising, New York, 1947.

5. Lee, Marshal, Book Making, New York, 1965.

6. Luckiesh, M.; Moss, F. K. Reading as a visual Task, New York, 1942.

7. Lutra S. K. Applied Art Handbook, Bombay, 1966.

8. Morision, S. On Type Designs : Past and present, 1962.

9. Updike, Daniel B. Printing Types, Cambridge, 1962.

10. Warren, Chappell, A Short History of the Printed Word, 1970.

११. दर, कृष्ण प्रसाद, आधुनिक छपाई, अलाहाबाद, १९५२.

वाकणकर, ल. श्री.; जोशी, चंद्रहास

चित्रपत्र :

मुद्रणयोजन