मुझफराबाद : जम्मू व काश्मीर राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे श्रीनगरच्या वायव्येस सु. १३० किमी. अंतरावर असून झेलम व किशनगंगा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. १९४७ साली पाकिस्तानने जम्मू व काश्मीरवर केलेल्या आक्रमणानंतर हा तंटा संयुक्त राष्ट्रसंघाकडे नेण्यात आला [⟶ काश्मीर समस्या] आणि १९४९ सालापासून जी युद्धबंदीरेषा ठरली, तीनुसार भारतातील हे शहर सध्या पाकव्याप्त प्रदेशात आहे. येथून पश्चिमेस सु. ११ किमी. अंतरावरच पाकिस्तानची सरहद आहे. रावळपिंडी ते श्रीनगरचे खोरे या मार्गावरील हे व्यापारी आणि सैनिकी दृष्ट्या मोक्याचे ठिकाण आहे. मुझफराबादच्या परिसरात मका, भात, गहू, सातू, तेलबिया, डाळी इ. कृषिउत्पादने घेतली जातात. त्यामुळे हे शहर धान्यव्यापाराचीही मोठी पेठ आहे. शिसे, लोहधातू, चुनखडक इ. खनिजांसाठी हे प्रसिद्ध आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात शहराचे बरेच नुकसान झाले. येथील लोक पहाडी आणि पंजाबी भाषा बोलतात.
जाधव, रा. ग.